Tarun Bharat

लोकराजा कृतज्ञता पर्व राज्यभर होणार

पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती; राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम

प्रतिनिधी / कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त लोकराजा कृतज्ञता पर्व संपूर्ण राज्यभर होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच स्मृती शताब्दी वर्षानिमित्त 18 एप्रिल ते 22 मे दरम्यान विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हय़ातील सर्व संस्था, संघटना, नागरिक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्व आयोजनाबाबत बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजसिंह चव्हाण, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, रमेश जाधव उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वातून शाहू महाराजांचे विचार, कार्य दूरदृष्टी याचा वर्षभर जागर करण्यात येणार आहे. पर्वातंर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले आहेत. पर्वातंर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत मान्यवर, जनतेमधून संकल्पना पुढे आल्यास त्याचाही विचार करणार आहे. राज्यात छत्रपती शाहू महाराजांनी ज्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत अशा ठिकाणीही कार्यक्रम घेण्यात येतील. शाहूमिलमध्ये स्वच्छता मोहीम राबवून स्मृती- शताब्दी पर्वातील काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतील. तसेच शाहू मिल स्मृती स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारें जगातील एकमेव राजे आहेत. पुरोगामी विचारांचा जागर करणारे ते राजा असल्याने लोकराजा कृतज्ञता पर्वामध्ये शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. स्मृती-शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव केला जाणार आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात राज्यातील नामवंत शेतकऱयांची कृषी कार्यशाळा घेण्यात यावी. दिल्लीतही कार्यक्रम व्हावा, शाहू महारांजानी भेट दिलेल्या ठिकाणी कार्यक्रम व्हावेत, पर्वाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरही कार्यक्रम आयोजन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शाहू मिल आणि शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंचे संरक्षण, शाहू चरित्रग्रंथ अभ्यासक्रमात समावेश व्हावा. खासबाग मैदावार महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी स्पर्धाचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोगोचे आनावरण 

बैठकी दरम्यान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती-शताब्दी कृतज्ञता पर्वाच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

राष्ट्रपतींना निमंत्रण 

6 मे रोजी कोल्हापुरात होणाऱया कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रित करण्याचे नियोजन सुरु आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही निमंत्रित करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. देशाचा प्रथम नागरिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास या पर्वाला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त होणार आहे.

राज्यभरात विविध उपक्रम

कृतज्ञता पर्व दरम्यान कोल्हापूर जिह्यासह राज्यभरात विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. पोवाडा, संगीत, मर्दानी खेळ, चित्ररथ, व्याख्याने, प्रदर्शन व इतर विविध उपक्रम राज्यभर आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.

स्वच्छता मोहिम, नाम फलकांचे अनावरण

राजर्षी शाहू महाराजांनी जोतिबा यात्रेनंतर छत्रपती ताराराणी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथोत्सवाची सुरुवात केली होती. याच दिवशी या उपक्रमाला सुरुवात करून सर्व वारसास्थळे आणि इतर वास्तूंची स्वच्छता मोहीम, नाम फलकांचे अनावरण करण्यात येणार आहे.
एकाच वेळी शंभर ठिकाणी व्याख्यान

राज्यभर 5 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा, विचारांचा, दृष्टीकोनाचा परिचय करुन देण्यासाठी एकाच वेळी शंभर ठिकाणी शंभर वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. या व्याख्यानातून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती देऊन त्यांच्या विचारांचा वारसा जोपासला जाईल.

6 मे रोजी कृतज्ञता फेरी

स्मृती शताब्दी दिनी शहरात सकाळी शाहू जन्मस्थळ, नवा राजवाडा, रेल्वे स्टेशन, शाहू मिल, साठमारी, कुस्ती मैदान, बावडेकर आखाडा, गंगावेस तालीम, शिवसागर, रजपूतवाडी व भवानी मंडप येथून कृतज्ञता फेरी काढण्यात येवून ही फेरी शाहू समाधी स्थळ येथे पोहोचेल.

शंभर सेकंद श्रद्धांजली

शाहू जन्मस्थळ येथे स्मृतीदिनी पुष्पांजली वाहिल्यानंतर शंभर सेकंद सर्व शहर श्रद्धांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. या शंभर सेकंद काळात नागरिक जेथे असतील तेथे स्तब्ध थांबून शाहू महाराजांना श्रद्धांजली वाहतील.

 समता रॅलीचे आयोजन 

1 मे ते 5 मे दरम्यान कोल्हापूरमधून समता रॅलीचे आयोजन केल आहे. कोल्हापूर ते खेतवाडी, मुंबई अशा समता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून राज्यात व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.

Related Stories

फाटकवाडी धरण ओवरफ्लो

Kalyani Amanagi

आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

Archana Banage

कोल्हापूर : वाघुर्डेतील किल्ला स्पर्धेत अनिकेत पाटील प्रथम

Abhijeet Khandekar

उदगाव येथे कोरोना मृत्यूदेह नेण्यासाठी सहा हजार मागणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Archana Banage

रत्नागिरी : मुन्नाभाई ‘आयएएस’अधिकाऱ्याला अटक

Archana Banage

तरुण भारतचे वृत्त ठरले खरे; चंदगडातील शिवसेना शिंदे गटात सामील

Abhijeet Khandekar