देवी शांतादुर्गेला नारळ ठेवून प्रचाराला शुभारंभ
प्रतिनिधी /म्हापसा
सामान्य जनतेच्या भावनांची कदर न करता त्यांच्या हातचा कामधंदा तसेच व्यवसाय हिसकावून घेत त्यांना देशोघडीला लावणाऱया भाजपच्या मुख्यमंत्र्यांसहित सर्वच्या सर्व आमदारांना घरी बसवा तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारला बहुमताने सिंहासनावर बसवून राज्यात खऱया अर्थाने लोकशाही प्रधान सरकार स्थापन्यात जनतेने मदत करण्याचे आवाहन कळंगुटचे माजी आमदार तथा गेल्या भाजपा सरकारात मंत्री राहिलेल्या मायकल लोबो यांनी कळंगुटात केले.
या भागातील श्री. शांतादुर्गा संस्थानात देवी शांतादुर्गेच्या चरणी नारळ ठेवत सामुहिक गाऱहाणे घातल्यानंतर माजी मंत्री लोबो यांनी आपल्या प्रचाराची कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, आजी-माजी स्थानिक पंचायतीचे सरपंच, विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोलकर, तसेच जवळचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्री शांतादुर्गा देवस्थाननंतर खोब्रावाडा कळंगूट येथील जागृत श्री बाबरेश्वर चरणीही महागाऱहाणे घालीत लोबो यांनी प्रचाराच्या दुसऱया फेरीची बुधवारी सुरुवात केली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान गोव्यातील खाण व्यवसायापासून ते स्थानिक पर्यटक टॅक्सी चालकांच्या पोटावर लाथ हाणून गोवा माईल्सचे भऊत राज्यातील कानाकोपऱयात आणून सोडलेल्या भाजपच्या मागे आता तेच भूत परतवून लावण्याची वेळ आली असल्याने लोबो यांनी यावेळी सांगितले. मात्र कळंगुटात याआधी कधीच न घडलेला नवीन इतिहास लिहिण्याची तसेच विजयाची हॅट्रिक साधण्याची वेळ येऊन ठेपली आहे त्यासाठी जागृत तसेच स्वाभिमानी कळंगुटच्या मतदारांनी काँग्रेसच्या मागे तटस्थपणे उभे राहण्याची हाक लोबो यांनी मारली.