Tarun Bharat

लोकसभेत काँग्रेसचे 7 खासदार निलंबित

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया टप्प्यात विरोधी पक्ष दिल्लीतील हिंसाचारावर चर्चेच्या मागणीसाठी अडून बसला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी सलग चौथ्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ घालत कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला आहे. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले आहे. सभागृहातील गोंधळ तसेच धक्काबुक्कीच्या घटनांमुळे व्यथित अध्यक्षांनी काँग्रेसच्या 7 खासदारांना निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. हे खासदार अध्यक्षांच्या आसनानजीक जात घोषणाबाजी करण्यासह फलक झळकवत होते.

गौरव गोगोई, टी.एन. प्रधान, डीन कुरीकोस, आर. उन्नीथन, मणिकम टागोर, बेनी बहन आणि गुरजीत सिंग ओजला या काँग्रेसच्या खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी पीठासीन अध्यक्ष भर्तृहरि महताब यांनी ओम बिर्ला यांचा उल्लेख केला होता. मागील तीन दिवसांपासून सभागृहाचे कामकाज रोखले जात असल्याने लोकसभा अध्यक्ष तसेच पूर्ण देश दुःखी असल्याचे महताब यांनी म्हटले होते.

संसदीय कामकाज मंत्री जोशी यांनी काँग्रेसच्या 7 खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडलेला प्रस्ताव सभागृहात आवाजी मतदानाने संमत झाला आहे. हा निर्णय लोकसभा अध्यक्षांच नसून सरकारचा असल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. सरकारच्या या हुकुमशाहीसमोर काँग्रेस झुकणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  

राज्यसभेत शून्यकाळात सभापती व्यंकय्या नायडू यांनीही घोषणाबाजीवर नाराजी व्यक्त केली आहे. ही संसद असून बाजार नसल्याचे त्यांनी खासदारांना सुनावले आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस, तृणमूल, सप, बसप, द्रमुक, माकप समवेत अन्य पक्षांनी दिल्लीतील हिंसाचारावर चर्चेची मागणी केली होती. विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

महिला खासदारासोबत गैरवर्तन

लोकसभेत मंगळवारी संध्याकाळी महिला खासदाराला झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे अध्यक्ष ओम बिर्ला नाराज झाले आहेत. या नाराजीतूनच त्यांनी सभागृहात प्रवेश केलेला नाही. त्यांच्याजागी पीठासीन अध्यक्ष किरीट सोळंकी यांनी सभागृहाच्या कामकाजाचे संचालन केले आहे.

…तर सभागृह चालू देणार नाही

दिल्लीतील हिंसाचारावर चर्चा होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे विधान लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केले आहे. तर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत 11 तर राज्यसभेत 12 मार्च रोजी चर्चा आयोजित केली जाऊ शकते असे स्पष्ट केले आहे.

कोरोना चाचणी करवून घ्या

इटली हा देश कोरोना विषाणूने ग्रस्त आहे. काँग्रेस खासदार सोनिया गांधी आणि राहुल हे अलिकडेच इटलीतून भारतात परतले आहेत. या दोन्ही नेत्यांची कोरोना विषाणूशी संबंधित चाचणी केली जावी अशी विनंती केंद्र सरकारला करत असल्याचे राजस्थानच्या नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी म्हटले आहे. बेनीवाल यांनी याप्रकरणी माफी मागावी तसेच त्यांना निलंबित केले जावे अशी मागणी संतप्त काँग्रेस खासदारांनी केली आहे.

गौरव गोगोई अडचणीत

उर्वरित कार्यकाळासाठी गौरव गोगोई यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणण्याची मागणी केंद्र सरकार करणार असल्याचे समजते. लोकसभा अध्यक्षांनी गोगोईंच्या पेपर स्नॅचिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. अध्यक्षीय आसनासमोरील कागदपत्रे हिसकाविणे तसेच गैरवर्तनाची ही घटना सभागृहाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असावी असे उद्गार पीठासीन अध्यक्ष मीनाक्षी लेखी यांनी काढले आहेत.

Related Stories

IT रिटर्न्स भरण्यासाठी मुदतवाढ

datta jadhav

केंद्र सरकारचा ट्विटरला अखेरचा इशारा

datta jadhav

गहलोत सरकारकडून पुढील आठवड्यासाठी राजस्थानच्या सीमा बंद

Rohan_P

झारखंडमध्ये ग्लायडर कोसळले, एकाचा मृत्यू

Patil_p

‘हिंदू युवा वाहिनी’ उत्तर प्रदेशात पुन्हा सक्रीय

Patil_p

जम्मू काश्मीर सरकारने दिला ‘हा’ अजब आदेश

Rohan_P
error: Content is protected !!