Tarun Bharat

लोकोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे ध्येय

Advertisements

आदर्श ग्रामातील कार्यक्रमात माजी मंत्री रमेश तवडकर यांचे उद्गार, वाढदिनानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा

प्रतिनिधी /काणकोण

आपण राजकारणात सामाजिक नैतिकता सांभाळली. कसलाच डाग लावून घेतला नाही. कार्यकर्त्यांचे बळ आणि संघटनशक्ती हेच प्रमुख मानून मार्गक्रमण करत राहिलो. त्यामुळे येणाऱया काळात संघटनेच्या बळावर 2000 कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करतानाच आदर्श युवा संघाचा लोकोत्सव अंातरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आपले ध्येय आहे. बलराम शिक्षणसंस्था देशातील एक आदर्श संस्था म्हणून आपल्याला पाहायची आहे. आदर्श ग्राम कायमस्वरूपी बनवायचा आहे. आपला वाढदिवस हे एक निमित्त असून त्याद्वारे कार्यकर्त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम आपण करत असतो, असे माजी मंत्री रमेश तवडकर यांनी आदर्श ग्रामात आयोजित समारंभात बोलताना सांगितले.

माजी आमदार आणि मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तर व्यासपीठावर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, गावस देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्या डॉ. पुष्पा अय्या, श्रीस्थळचे सरपंच दत्ता गावकर, बलराम शिक्षणसंस्थेचे खजिनदार गणेश गावकर, पत्रकार प्रभाकर ढगे, जयंत जोशी, वामन वैद्य, उपासो गावकर, बलराम उ. मा. विद्यालयाच्या प्राचार्य कविता गावकर, बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर, बलराम डे केअर शाळेचे मुख्याध्यापक अशोक गावकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या तसबिरीला हार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. स्व. मनोहर पर्रीकर हे आपले आदर्श असून आपण कधीच लाचारी पत्करली नाही आणि रणागंणातून कधी पळून गेलो नाही. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि श्रद्धा हेच आपले बळ आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे आपले काम चालूच राहील. त्यासाठी राजकारणच करायला हवे असे नाही, असे मत तवडकर यांनी व्यक्त केले. आपला समाज शिकला पाहिजे, आदिवासी समाजाला न्याय मिळायला हवा. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच आपण बलराम शिक्षणसंस्थेची स्थापना केली, असे सांगून त्याचे फळ मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले..

दूरदर्शी नेता : फळदेसाई

अशक्य ती गोष्ट शक्य करण्याची ताकद असलेला दूरदर्शी असा नेता अशा शब्दांत माजी आमदार फळदेसाई यांनी तवडकर यांच्याविषयीचे आपले मत मांडले आणि कणखर नेतृत्व देणाऱया या कार्यकर्त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर बलराम शिक्षणसंस्था हे बलराम विद्यापीठ व्हावे, अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली. तवडकर हे डोळस व्यक्तिमत्त्व असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी तंतोतंत जपला आहे. पराजय पचविण्याची ताकद त्यांच्यात आहे. पायाला भिंगरी बांधल्यागत ते कसे काम करतात ते आपण पाहिलेले असून नेहरू युवक केंद्राकडून घडलेले ते व्यक्तिमत्त्व असल्याचे मत घाटवळ यांनी व्यक्त केले.

सविता तवडकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. तर श्रीकांत तवडकर, चंद्रकांत वेळीप, मधुकर वेळीप, उल्हास वेळीप, धनंजय वेळीप, विराज वेळीप, संजय गावकर, गंगेश गावकर, उल्हास गावकर, सुनीती टेंगसे यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. यावेळी उपासो गावकर, दत्ता गावकर, गणेश गावकर, पत्रकार ढगे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन दामोदर वेळीप यांनी केले, तर अशोक गावकर यांनी आभार मानले. यावेळी तवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला तसेच बलराम शिक्षणसंस्थेच्या देणगी कुपनांचा निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमाला काणकोण पालिकेचे नगरसेवक, भाजपाच्या मंडळ समितीचे सदस्य तसेच सांगे, केपे या भागांतील तवडकर यांचे कार्यकर्ते, समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

डेअरीची संजीवनी होऊ देणार नाही- राजेश फळदेसाई

tarunbharat

…तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यावा : चोडणकर

Omkar B

फोंडा उपनगराध्यक्षांवरील अविश्वासाचा निकाल लटकला

Amit Kulkarni

गोव्याच्या सीमा खुल्या पण महाराष्ट्राच्या सीमा बंदच

Abhijeet Shinde

राज्यात नारळ विकास मंडळ स्थापणार

Omkar B

डोंगरीचे प्रसिद्ध इंत्रुज मेळ उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!