Tarun Bharat

वंचितांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी लिहिणे आवश्यक

Advertisements

कडोली साहित्य संमेलनात औरंगाबाद येथील लेखक डॉ. बालाजी जाधव यांचे मत

प्रतिनिधी/ बेळगाव

समाजात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते, तेव्हा साहित्यिकांनी आपली लेखणी परजली पाहिजे. वंचित लोकांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी लिहिणे आवश्यक असून भाषा, धर्म, जात, प्रांत असे सर्व भेद ओलांडून जे पुढे जाते तेच साहित्य होय, असे मत औरंगाबाद येथील लेखक डॉ. बालाजी जाधव यांनी व्यक्त केले.

मराठी साहित्य संमेलन कडोली, सर्व संघ-संस्था व कडोली ग्रामस्थ, सांगाती साहित्य अकादमी, बेळगाव, अक्षरयात्रा ‘तरुण भारत’ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कडोली येथे 35 वे मराठी साहित्य संमेलन पार पडले. यावेळी अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.

ते म्हणाले, एका छोटय़ाशा झाडाखाली सुरू झालेल्या या संमेलनाने आता मोठा विस्तार केला आहे. शिस्तप्रिय माणसेच जगावर राज्य करू शकतात आणि शिस्तबद्ध नियोजन हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे. साहित्य संमेलनाचा यज्ञकुंड सुरू ठेवायचा असेल तर या संमेलनांचा आदर्श अखिल भारतीय संमेलनाने घ्यावा.

साहित्यावरील विश्वास, लोक चळवळीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. चळवळीसाठीच साहित्य निर्माण झालेले असते. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, त्याही आधी चाणक्मय, बुद्ध या सर्वांनीच चळवळीसाठी साहित्य लिहिले. बुद्धांना सुद्धा संस्कृतमध्ये लिहावे, असे सांगण्यात आले होते. परंतु, माझा समाज लोकभाषा समजतो म्हणून मी पाली भाषेतच लिहिणार, असे सांगून त्यांनी तीच भाषा वापरली. 12 व्या शतकात चक्रधर, बसवण्णा, ज्ञानेश्वर, एकनाथ यांनी खूप लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचा विचार आपण लवकर करायला हवा.

साहित्यिक कधी लिहितो, असा प्रश्न विचारून समाजात प्रश्न उठतात, तेव्हा साहित्यिक लिहितो. समाज जेव्हा थकतो तेव्हा त्याचे मागासपण काढण्यासाठी साहित्यिक लिहू लागतो. ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे वंचित लोकांच्या दुःखासाठी तरी आपण लिहिले पाहिजे. ज्या साहित्यातून भावना कळतात, ते साहित्य प्रांत ओलांडून पुढे जाते.

12 व्या शतकात बसवेश्वरांनीसुद्धा लोकांसाठी साहित्य लिहिले. माणसाला माणूस म्हणून पाहण्यासाठी लेखन ही साहित्याची प्रेरणा आहे. प्रत्येक प्रस्थापितांना लेखनाची किंमत द्यावीच लागते. वरील सर्व संतांनी ती किंमत दिलेली आहे, असे सांगून ते म्हणाले, साहित्य केवळ लेखणी होऊन चालत नाही. तर साहित्यावर हल्ले होताना तलवारी घेणेसुद्धा आवश्यक असते. जो समाज स्वभाषेचे महत्त्व ओळखत नाही, तो कमकुवत होतो, असे तुकोबा म्हणत असत. त्यामुळे भाषेचे महत्त्व खूप आहे.

जी माणसे स्थलांतर करतात, ती आपल्यासमवेत भाषा, संस्कृती घेऊन जातात. याचे संपूर्ण महत्त्व कळणारी एक व्यक्ती म्हणजे तुकोबा होय. साहित्यामध्ये सत्तेला उलथवण्याची ताकद असते. परंतु, हुकूमशाहीचे राज्य येते तेव्हा पहिल्या हत्या साहित्यिकांच्या होतात, हा दाखला देताना त्यांनी दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांकडे निर्देश केला.

कीर्तन करण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये असते. साहित्य बुडणाऱयांना वाचवणारे, तारणारे हवे. समाजाला उन्नत करणारे, मातीशी इमान राखणारे लेखन करणे अपेक्षित आहे. लेखकाच्या साहित्यामध्ये बुद्धाची करुणा आणि तुकोबाचा कळवळा असायला हवा. साहित्यामधील सर्व प्रवाह आपण समजावून घेऊयात. वामन कर्डक यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली ते ग. दि. मा. ना पटले नाही. म्हणून त्यांनी नकार दिला. तेव्हा वामनरावांनी बारा गीते लिहिली. कर्डक कोण, हे महत्त्वाचे नाही तर त्यांचे लेखन महत्त्वाचे! हे समजून घेणे आवश्यक आहे. त्या बारा गीतांसह तेव्हा 125 आठवडे तो सिनेमा चालला. याची आठवण त्यांनी करून दिली व व्यक्तीपेक्षा त्याचे साहित्य नेहमी महत्त्वाचे, असे नमूद केले.

साहित्यातील विविध प्रवाह आपण समजावून घेऊया, नद्या जशा सागराला मिळतात, तसेच साहित्यातील सर्व प्रवाह मानव जातीच्या उत्थानासाठीच एकत्र आले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. जाधव यांनी समारोप केला.

तत्पूर्वी स्वागताध्यक्ष सुधीर कुट्रे म्हणाले की, आजवर अनेक साहित्यिकांनी पाजलेले बोधामृत यामुळे साहित्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

Related Stories

सुवर्णसौधला लागून असलेल्या रस्त्या खुला करा

Patil_p

पूर्वीच्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवड?

Amit Kulkarni

प्रबुद्ध भारत आयोजित स्टेप 2021 चर्चासत्र परिषदेला प्रारंभ

Patil_p

कोरोनाकाळात खासगी हॉस्पिटल्सनी सहकार्य करावे

Amit Kulkarni

कांदा दरात 300 रुपयांची घसरण : आवकही वाढली

Amit Kulkarni

पॅसेंजरचा प्रवास अद्याप दूरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!