Tarun Bharat

वजन आणि माप खात्याची मोठी कारवाई

पन्नास लाख रूपयांचा माल जप्त

प्रतिनिधी /मडगाव

वजन आणि माप खात्याने गेले काही दिवस सलग कारवाई करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. वजन आणि माप खात्याने दक्षिण गोव्यात मडगाव, काणकोण,  झुवारीनगर, वेर्णा, सांगे इत्यादी भागात विविध आस्थापनावर छापे मारून वजन माप खात्याच्या अधिनियम 2009आणि नियम 2011 पॅकेज्ड कमोडिटीजचे उल्लंघन केल्याबद्दल मोठी कारवाई करताना 50 लाख रूपयांचा माल जप्त केला आहे.

वजन आणि माप खात्याने गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून वजन आणि मापांच्या वापरासंदर्भात मोठय़ा प्रमाणावर मोहीम राबवण्यात आली. ज्यात वजन आणि मोजमाप कायदा 2009च्या तरतुदीनुसार वजन-माप यंत्रे जप्त करण्यात आली. त्याच बरोबर पॅकेज्ड कमोडिटीज नियम 2011 नुसार पॅकबंद वस्तू जप्त करण्यात आल्या.

मडगाव आणि झुआरीनगर येथे वजन आणि माप खात्याचे सहाय्यक नियंत्रक देमू एन. मापारी यांनी निरिक्षक नितीन पी. पुरूषण यांच्या देखरेखीखाली अचानक छापे मारले. त्यावेळी त्यांना मेलशॉन डायस, अझेन रियो रॉड्रिग्स, स्वेझेल उर्मिडा कुलासो (सर्व निरीक्षक) आणि रामदास गावडे व युजेबियो गोम्स यांचे सहकार्य लाभले.

23 फेब्रुवारी 2022 रोजी मडगाव शहरातील 20 दुकानांची तपासणी करण्यात आली आणि मोबाईल व ऍक्सेसरीज संदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. 3 मोबाईल पॅकेजेस आणि 60 मोबाईल ऍक्सेसरीज पॅकेजेस जप्त करण्यात आले.

25 फेब्रुवारी 2022 रोजी वेर्णा येथे 5 दुकानांची तपासणी करण्यात आली आणि दोन प्रकरणे दाखल करण्यात आली, एक असत्यापित वजनाचे साधन जप्त करण्यात आले आणि 43 मोबाईल उपकरणे जप्त करण्यात आली. मोबाईल उपकरणावर अनिवार्य घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. याच दिवशी झुआरीनगर परिसरातील 15 दुकानांतील वजन आणि माप यंत्रांाची तपासणी करण्यात आली आणि दोन पॅकबंद वस्तूंवरही गुन्हे दाखल करण्यात आले. एक असत्यापित वजनाचे साधन जप्त करण्यात आले. त्याच बरोबर 53 दरवाजाच्या सामानाच्या पॅकेजेसचा समावेश आहे. ब्रँडेड दरवाजाचे कुलूप अनिवार्य घोषणा न दिल्याबद्दल तसेच किरकोळ किंमती आणि उत्पादनाचा महिना आणि वर्ष बदलण्यात आल्याने ती जप्त करण्यात आली.

म्हापसा आणि डिचोलीत कारवाई

वजन आणि माप खात्याचे सहाय्यक नियंत्रक गुलाम ए. गुलबर्ग यांनी निरीक्षक विकास कांदोळकर यांच्यासह देवानंद फडते, महादेव धारगळकर आणि संदीप कुडतरकर यांच्या सहकार्याने म्हापसा आणि डिचोली परिसरात कारवाई केली. त्यांनी मये, मेणकुरे, साळ आणि दोडामार्ग परिसरात छापे मारून एकूण 9 प्रकरणे दाखल केली. त्यात दूध संस्था, बार आणि रेस्टॉरंट, भाजीपाला आणि जनरल स्टोअर, आणि टाइल्सचे दुकान आणि 8 पेग माप, 3 क्षमतेचे माप, तीन वजनाची उपकरणे (सर्व असत्यापित आणि व्यापाराच्या जागेत वापरण्यासाठी ठेवलेले) आणि अनिवार्य घोषणा नसल्याबद्दल टाइल्सचे 550 पॅकेज जप्त केले.

26 फेब्रुवारी 2022 रोजी, बार आणि रेस्टॉरंट, जनरल स्टोअर्स, सुपरमार्केट, चिकन शॉप, भाजीपाला दुकान, कुरिअर फर्म आणि हार्डवेअर शॉप विरुद्ध शिवोली परिसरात दहा गुन्हे दाखल करण्यात आले आणि 4 पेग माप, 7 वजनाची साधने (सर्व असत्यापित आणि वापरासाठी ठेवली) जप्त करण्यात आली.

काणकोण व सांगेत कारवाई

वजन आणि माप खात्याचे काणकोणचे निरीक्षक सतीश डी. गावस यांनी सुजन राणेसरदेसाई (निरीक्षक), श्रीमती रंजना एम. बोरकर (सहाय्यक नियंत्रक), देखरेखीखाली आणि केवल गांवस देसाई सिलव्हानो कॉस्ता आणि विवेक वाडेकर यांच्या सहकार्याने 26 फेब्रुवारी 2022 रोजी काणकोणमधील 50 व्यापाऱयांची वजन आणि मापन यंत्राची तपासणी केली. काणकोण मार्केट आणि आठवडी बाजार येथे सामानाची पॅकेजिंग या संदर्भात दोन प्रकरणे दाखल करण्यात आली. आवश्यकतेनुसार अनिवार्य घोषणा धारण न केल्यामुळे व्यापाराच्या जागेत वापरण्यासाठी ठेवलेले असत्यापित वजनाचे साधने आणि टाइल्सचे 1430 पॅकेज जप्त करण्यात आले. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2022 रोजी सांगेत कारवाई करताना दोन प्रकरणे नोंद करण्यात आली.

ही कारवाई चालू राहणार

वजन आणि माप खात्या तर्फे संपूर्ण गोव्यात ही अचानक मोहीम राबविण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात मासे विक्रेते व वितरकांची तपासणी केली जाणार असल्याने त्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे अधिकृत वजन आणि माप यंत्रे नसेतील त्यांनी खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

ग्राहकांनी प्रमाणपत्राची पडताळणी करावी

वजन आणि माप खात्याने सर्व ग्राहकांना कळविले आहे की, त्यांनी वजनकाटय़ाने कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, त्यांनी प्रथम तोल यंत्राची पडताळणी केली आहे की नाही याची तपासणी करावी आणि वैध मापनशास्त्र विभागाने दिलेले पडताळणी प्रमाणपत्रही पाहावे आणि नतंरच सामान खरेदी करावे.

सर्व ग्राहकांना याद्वारे सूचित केले जाते की कोणतीही पॅकेज केलेली वस्तू खरेदी करण्यापूर्वी, त्यांनी खाली नमूद केलेली अनिवार्य घोषणा तपासून घ्यावी जसे कीः

1) निर्मात्याचे नाव आणि पूर्ण पत्ता/पॅकर/आयातक;

2) सामान्य नाव

3) आयात केलेल्या पॅकेजेसच्या बाबतीत मूळ देश

4) उत्पादनाचा महिना आणि वर्ष/प्री-पॅकिंग तारीख/आयात तारीख

5) कमाल किरकोळ किंमत

6) व्यक्तीचे नाव आणि पूर्ण पत्ता आणि कार्यालय, ईमेल, पत्ता आणि संपर्क क्रमांक ज्यावर ग्राहकांच्या तक्रारी असल्यास संपर्क साधता येईल. ‘जागो ग्राहक जागो’ ही मोहीम अधिनियम 2009 आणि नियम 2011चे उल्लंघन निर्मूलन होई पर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्णय वजन आणि माप खात्याने घेतला आहे. असंख्य दुकानदार हे ग्राहकांना हातोहात फसवित होते. त्यांच्यावर या कारवाईमुळे अंकुश लागेल. तसेच पॅकेज्ड कमोडिटीजवर होणारी फसवणूक थांबणार असल्याचा विश्वास खात्याने व्यक्त केला आहे.

Related Stories

संयुक्त संसदीय समिती नेमा :प्रवीण चक्रवर्ती

Amit Kulkarni

स्टॉलवर ‘तरुण भारत’चा अंक पाहून वाचक झाले आनंदित

Patil_p

राज्यातील निवडणुकांच्या तोंडावर, गोव्याचे मुख्य निवडणुक अधिकारी आणि कू यांनी सुरू केले अभियान, मतदानाला देणार प्रोत्साहन

Abhijeet Khandekar

यंदा स्वरमंगेश संगीत व नृत्य महोत्सव होणार नाही

Patil_p

कोरोनाचे थैमान, 713 नवे बाधित

Patil_p

बाणावली आरोग्य केंद्रात डॉक्टरांची 24 तास उपलब्धता हवी : वेंझी व्हिएगस

Amit Kulkarni
error: Content is protected !!