Tarun Bharat

वजन घटवण्यासाठी भालाफेक करणारा नीरज सुवर्ण विजेता!

पानिपतच्या नीरज चोप्राने रचला सोनेरी इतिहास! भारतीय ऍथलेटिक्सचा नवा मसिहा!

टोकियो / वृत्तसंस्था

नीरज ऍथलेटिक्सकडे वळला, त्यावेळी त्याचे उद्दिष्टय़ कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे, त्यात चमकावे, राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे अजिबात नव्हते तर नीरज ऍथलेटिक्सकडे वळला होता तो चक्क वजन घटवण्यासाठी! आणि हाच नीरज शनिवारी भालाफेकीत ऑलिम्पिक सुवर्ण जिंकला, तो क्षण साऱया विश्वाने अनुभवला!

कोरोना निर्बंधामुळे नीरजची ही जिनियस कामगिरी अनुभवण्यासाठी स्टेडियम फुल पॅक नव्हते. मात्र, मोजके पदाधिकारी, प्रशिक्षकांच्या हजेरीत आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे, अवघ्या देशवासियांचे लक्ष टीव्हीवर लागून असताना नीरजने ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली व सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.

नीरजला सुवर्ण जिंकण्यासाठी 88.07 मीटर्सची आपली सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती देखील करावी लागली नाही. त्याने केलेली 87.58 मीटर्सची फेक त्याला 12 स्पर्धकांमध्ये सुवर्ण जिंकून देण्यासाठी पुरेशी ठरली. अर्थात, या साऱया महानतेपूर्वी, तो ज्या बॅकग्राऊंडमधून इथवर पोहोचला, ते देखील महत्त्वाचे!

नीरजचे एकत्रित कुटुंब 17 सदस्यांचे! त्यात छोटासा नीरज खेडय़ातील झाडा-फांद्यावर चढताना आणि जनावरांमागे दिसून यायचा. नीरजचे वडील सतीश कुमार चोप्रा या मुलात शिस्त यावी, म्हणून प्रयत्नशील असायचे आणि यातून त्याला त्याच्या खेडय़ापासून 15 किलोमीटर अंतरावरील पानिपतमधील शिवाजी स्टेडियमला पाठवले गेले. तेथेच खरा इतिहास घडला!

2016 मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपचे सुवर्ण जिंकत त्याने लक्ष वेधून घेतले होते. 20 वर्षाखालील त्या वयोगटातील नीरजचा 86.48 मीटर्सचा विक्रम आजही अबाधित आहे. याशिवाय, नीरजने 2018 राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. 2017 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तो टॉप फिनिश करण्यात यशस्वी ठरला. तसेच तो 2018 अर्जुन पुरस्कार जेता देखील आहे.

नीरजला आपल्या कारकिर्दीत अनेक उतारही अनुभवावे लागले. ज्या उजव्या हाताने तो भालाफेक करतो, त्या हाताच्या ढोपरावरच शस्त्रक्रिया देखील करावी लागली. यामुळे, नीरज वर्षभर बाहेर होता. पण, तो मैदानात पुन्हा उतरला तो नव्या उर्मीनेच. हीच नवी उर्मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 11 ऍथलिट्सवर भारी ठरली आणि नीरज सुवर्णजेता ठरला!

Related Stories

चेन युफेईला महिला बॅडमिंटन एकेरीचे सुवर्ण

Patil_p

भारतीय हॉकी संघाकडून ऑस्ट्रेलिया पराभूत

Patil_p

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरमध्ये ब्रेसवेलचा समावेश

Patil_p

बिग बॅश स्पर्धेत मंदाना, दिप्ती खेळणार

Patil_p

फिफाच्या मानांकनात भारत 105 व्या स्थानी

Amit Kulkarni

दुसऱया कसोटीत पुन्हा विंडीजची स्थिती केविलवाणी

Patil_p