Tarun Bharat

वटपौर्णिमेमुळे कुडाळ बाजारपेठेत गर्दी

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

प्रतिनिधी / कुडाळ:

लॉकडाऊन काहीसे शिथिल करण्यात आले. वाहने रस्त्यांवर फिरू लागली. लोकांची गर्दी ठिकठिकाणी दिसू लागली आहे. शुक्रवारी वटपौर्णिमा असल्याने गुरुवारी कुडाळात ग्राहकांनी गर्दी केली होती. वाहनेही मोठय़ा संख्येने होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहने मोठय़ा संख्येने पार्क केल्याने पादचाऱयांसह जा-ये करणाऱया  वाहनांना त्रास होत होता. वाहतूक कोंडी होत होती.

मुंबईतून तसेच अन्य भागातून मोठय़ा संख्येने चाकरमानी येथे येण्यासाठी सरकारच्या अटी-शर्ती मान्य करून पास घेऊन येत आहेत. येथे आल्यानंतर मात्र त्याचे कितपत पालन केले जाते, हा प्रश्न आहे. क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी वेगवेगळय़ा सुविधांची मागणी करीत आहेत चाकरमान्यांच्या अशा मागण्यांनी स्थानिक कमिटयासह नागरिक हैराण झाले आहेत. यापेक्षा आलेले सगळे मुंबईतून आलेले असल्याने गावात तसेच जिल्हय़ात कोरोना फैलावणार की काय अशी भिती प्रत्येकाच्या मनात होती. आज कोरोना पॉझिटिव्हची संख्या शंभरी गाठत आली आहे.

असे असताना लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या काही सवलतींचा आधार घेऊन सवलतींसाठी असलेल्या अटी-शर्तींकडे कानाडोळा करीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्याची प्रचिती गुरुवारी शहरात आली. बाजारात होणारी गर्दी, लोकांचे बिनधास्त फिरणे, याचा विचार केला, तर आपल्याकडे कोरोना आणि कोरोनाचे गांभीर्य लोकांना आहे की नाही, याचा विचार करावा लागेल, अशी स्थिती आहे.

एकंदरीत सरकारने काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन सर्वसामान्यांना मोकळीक देऊन यापुढे तुमची काळजी तुम्हीच घ्यायची आहे, असा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. मात्र, त्याचे पुरेपूर पालन होताना दिसत नाही.

पोलिसांकडून मास्क वापराची सूचना

कुडाळ-गांधीचौक येथे असलेला पोलीस कर्मचारी कोणी मास्क लावलेला नसेल, तर त्याला ‘दुकानातून मास्क घेऊन त्याचा वापर करा. नंतर मोटारसायकल घेऊन जा’, असे सांगत होता, तर चालत जाणाऱयांना मास्क तोंड व नाकासाठी आहे. हनुवटीसाठी नाही, याची आठवण करून देत होता. त्याचे सर्वजण कौतुक करीत होते.

Related Stories

खून प्रकरणातील दुसऱया आरोपीसही पोलीस कोठडी

Patil_p

कोकणच्या सुपुत्राचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका!

Patil_p

ऋतिक सावंतची किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

Anuja Kudatarkar

येत्या दोन ते तीन दिवसात नुकसान भरपाई जाहीर करणार : मुख्यमंत्री

Archana Banage

रिफायनरी समर्थकांनी घेतली खा.सुनिल तटकरेंची भेट

Patil_p

मुंबईतील व्यापाऱ्यांचा खून करून पैसे वाटून घेण्याची ‘डिल’ ; त्रिमूर्ती ज्वेलर्समध्येच शिजला कट

Archana Banage