Tarun Bharat

वनडेनंतर टी-20 मध्येही भारताचे क्लीन स्वीप

शेवटच्या सामन्यात 17 धावांनी विंडीजवर विजय, सूर्यकुमारचे तडफदार अर्धशतक, गोलंदाजांचा भेदक मारा, हर्षलचे 3 बळी

वृत्तसंस्था/ कोलकाता

सामनावीर व मालिकावीर सूर्यकुमार यादवचे तडफदार अर्धशतक, वेंकटेश अय्यरची फटकेबाजी आणि हर्षल पटेलसह गोलंदाजांनी केलेला भेदक मारा यांच्या बळावर भारताने शेवटच्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवित वनडेनंतर टी-20 मालिकेतही विंडीजवर 3-0 असा एकतर्फी मालिकाविजय साकारला.
 भारताने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 5 बाद 184 धावा तडकावल्या. त्यानंतर पूरनने शानदार अर्धशतक झळकवले तरी अन्य फलंदाजांकडून भरीव योगदान न झाल्याने  विंडीजला 20 षटकांत 9 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारता आली. पूरनने 47 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 61 धावा फटकावल्या. भारताच्या हर्षल पटेलने भेदक मारा करीत 22 धावांत 3 बळी मिळविले तर दीपक चहर, शार्दुल ठाकुर, वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. टी-20 पदार्पण करणाऱया अवेश खानला एकही बळी मिळाला नाही.

सूर्यकुमारने 31 चेंडूंच्या खेळीत 65 धावा झोडपताना 1 चौकार आणि 7 षटकार ठोकले. यातील तीन षटकार त्याने शेवटच्या षटकात फटकावले. आणखी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो डावातील शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. वेंकटेश अय्यरसमवेत त्याने चौथ्या गडय़ासाठी केवळ 37 चेंडूत 91 धावांची भागीदारी करीत संघाला पावणेदोनशेपार मजल मारून दिली. शेवटच्या पाच षटकात भारताने तब्बल 86 धावा तडकावल्या. अष्टपैलू वेंकटेश 35 धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार, 2 षटकार लगावले. मध्यफळीत अल्पशी पडझड झाल्यानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी 32 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली असली तरी त्यांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. सात चेंडूंच्या फरकाने दोघेही बाद झाले. विंडीजची फिरकीद्वयी हेडन वॉल्श ज्युनियर व (1-30) व रॉस्टन चेस (1-23) यांनी मधल्या षटकांत उत्तम मारा केला होता.

लेगस्पिनर हेडनच्या फिरकीविरुद्ध फटका मारण्याच्या प्रयत्नात लाँगऑफवर श्रेयस झेलबाद झाला तर चेसने वेगात बदल करून इशान किशनचा त्रिफळा उडविला. इशानने 31 चेंडूत 34 तर श्रेयसने 16 चेंडूत 25 धावा फटकावल्या.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर नवा संघ वाटणाऱया भारताच्या डावाची सुरुवात इशान किशन व ऋतुराज गायकवाड यांनी केली तर श्रेयसला तिसऱया क्रमांकावर खेळविण्यात आले. कर्णधार रोहित चौथ्या क्रमांकावर खेळण्यास आला. महाराष्ट्राची ‘रनमशिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया गायकवाडने गेल्या वर्षी जुलैमध्ये लंकेविरुद्ध पदार्पण केले होते. नंतर त्याने आयपीएलमध्येही धावांची बरसात केली होती. पण या डावात त्याला फार वेळ टिकाव धरता आला नाही. त्याने एक शानदार चौका लगावला. पण तो होल्डरच्या गोलंदाजीवर 4 धावांवरच बाद झाला. इशानला पहिल्या दोन सामन्यात फारशी चमक दाखविता आली नव्हती. त्याने रोमारिओ शेफर्डच्या एका षटकात चार चेंडूत 3 चौकार ठोकत चांगली सुरुवात केली होती. बऱयापैकी सेट झाल्यानंतर त्याने तिशीची मजल मारली असताना चेसने त्याचा त्रिफळा उडवित त्याची खेळी संपुष्टात आणली. कर्णधार रोहित शर्माही दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. ड्रेक्सने त्याला 7 धावांवर त्रिफळाचीत केले तेव्हा भारताची स्थिती 4 बाद 93 अशी झाली होती. यानंतर मात्र सूर्या व वेंकटेश यांनी तडाखेबंद फटकेबाजी करीत भारताला दोनशेच्या जवळपास मजल मारून दिली. विंडीजतर्फे होल्डर, शेफर्ड, चेस, वॉल्श, डॉमिनिक ड्रेक्स यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 5 बाद 184 ः गायकवाड 4 (8 चेंडूत 1 चौकार), इशान किशन 34 (31 चेंडूत 5 चौकार), श्रेयस अय्यर 25 (16 चेंडूत 4 चौकार), रोहित शर्मा 7 (15 चेंडू), सूर्यकुमार यादव 65 (31 चेंडूत 1 चौकार, 7 षटकार), वेंकटेश अय्यर नाबाद 35 (19 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), अवांतर 14. गोलंदाजी ः होल्डर 1-29, शेफर्ड 1-50, चेस 1-23, वॉल्श 1-30, ड्रेक्स 1-37, ऍलेन 0-5

विंडीज 20 षटकांत 9 बाद 167 ः मेयर्स 6, होप 8, पूरन 47 चेंडूत 61, पॉवेल 14 चेंडू 25, पोलार्ड 5, होल्डर 2, चेस 12, शेफर्ड 21 चेंडूत 29, ऍलेन 5, ड्रेक्स 4, वॉल्श 0, अवांतर 10. गोलंदाजी ः चहर 2-15, वेंकटेश अय्यर 2-23, ठाकुर 2-33, हर्षल पटेल 3-22, अवेश खान 0-42, बिश्नोई 0-29.

Related Stories

नामिबियाचा नेदरलँड्सवर धक्कादायक विजय

Patil_p

अमेरिकन टेनिस स्पर्धेत व्हीनसला वाईल्ड कार्ड

Amit Kulkarni

ओसाकाचे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद

Patil_p

मरेची विजयी सलामी, किर्गिओसची स्पर्धेतून माघार

Patil_p

लियॉनमुळे भारतावर पराभवाचे सावट

Amit Kulkarni

मिताली राज मानांकनात पुन्हा अग्रस्थानी

Patil_p
error: Content is protected !!