Tarun Bharat

वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी भुयारी मार्ग करा

रेल्वे दुपदरीकरणाचा वन्यप्राण्यांना फटका : वन्यप्राणीप्रेमींतून भुयारी मार्गाची मागणी : बेळगाव विभागात गतवर्षी 112 गवीरेडय़ांचा अपघाती मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव 

वन्यप्राण्यांची संख्या वाढविण्याबरोबर त्यांचे संरक्षण व्हावे याकरिता वनखाते प्रयत्नशील आहे. रेल्वेगाडय़ांची संख्या वाढविण्याबरोबर गाडय़ांचा वेग वाढविण्यासाठी रेल्वे ट्रकच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जंगल परिसरात रेल्वे ट्रक ओलांडताना वन्यप्राण्यांना अडचणी निर्माण होत असून भरधाव रेल्वे अपघातात अनेक मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. सुसाट धावणाऱया रेल्वेंच्या धडकेत या निष्पाप प्राण्यांचे बळी जात आहेत. वाढते अपघात टाळण्यासाठी जंगल भागात जागोजागी भुयारी मार्गांची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे. 

मागील काही वर्षात वन्य प्राण्यांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. वनक्षेत्रातून रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांना नैसर्गिकरीत्या व निर्धोकपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वनक्षेत्रातून जाणाऱया रेल्वे मार्गांवर भुयारी मार्गांची उभारणी करण्याची गरज क्यक्त होत आहे.

वन्यप्राण्यांना रेल्वे रूळ ओलांडताना अडथळा येऊ नये याकरिता भुयारी मार्ग व ध्वनि रोधक यंत्रणा बसविण्यात यावी, वनक्षेत्रात रेल्वे रूळ व रस्ते व महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडकेने अनेकदा वन्यप्राणी जखमी होतात किंवा दगावतात. हे प्राणी रूळावर व रस्त्यांवर येऊ नयेत म्हणून रूळाच्या व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी जाळय़ांचे कुंपण घातले जाते. मात्र, त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर रोखला जातो. वाढते अपघात टाळण्यासाठी जंगल भागात जागोजागी भुयारी मार्गांची निर्मिती करावी, अशी मागणी वनखात्याने केली आहे.

बेळगाव विभागातील जोयडा, जांबोटी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी जंगल भागात वन्यप्राण्यांचा मोठय़ा प्रमाणात अधिवास आहे. या परिसरात वाघ, अस्वल, हत्ती, गवीरेडे, सांबर, साळींदर, कोल्हे, बिबटे, तरस आदींची संख्या जास्त आहे. या वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या भागातून रेल्वेमार्ग जातो. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

मार्ग सुरक्षितेला प्राधान्य द्या

महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने आणि हॉर्नच्या आवाजाने प्राणी बुजतात. त्यामुळेही अपघात होण्याचा धोका असतो. त्याचाही विचार करून पुलाखाली भुयारात ध्वनि रोधक यंत्रणा बसवावी.  वनक्षेत्रातील कोणत्याही भागात रूळ व रस्ता पुलाचे काम करताना वन्यजीवांचा येण्या-जाण्याचा मार्ग सुरक्षित करण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

 रेल्वे प्रशासन लक्ष देणार का?

बेळगाव विभागात गतवर्षात तब्बल 112 गवीरेडय़ांचा अपघाती मृत्यू झाला होता. वाढत्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक असून हे अपघात रोखण्यासाठी    उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ जंगलात सैरावैरा धावत असतात. दरम्यान, काही प्राणी वाहनांच्या खाली येऊन मृत्युमुखी पडतात तर काही जखमीही होत असतात. या गंभीर बाबीकडे वनखाते व रेल्वे प्रशासन जातीने लक्ष देणार का, असा प्रश्न प्राणीप्रेमींतून उपस्थित होत आहे.

Related Stories

हलगा-मच्छे बायपाससाठी पुन्हा हुकूमशाही

Amit Kulkarni

‘तंत्रज्ञान’ माणसाला मिळालेले अमूल्य वरदान!

Amit Kulkarni

शहापूर गटारींच्या खोदाईमुळे नागरिकांना त्रास

Patil_p

शिवसेनेतर्फे वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

Patil_p

दहावी पुरवणी परीक्षेच्या मूल्यमापनाला सुरुवात

Omkar B

जुन्या धारवाड रोडवरील सर्व्हिस रस्त्यावरील लोखंडी सळय़ा उघडय़ावर

Amit Kulkarni