Tarun Bharat

वन्य प्राण्यांचा मानवावरील हल्ल्याचा प्रश्न ऐरणीवर

राखीव जंगलामुळे प्राण्यांच्या संख्येत वाढ : महिन्याभरापासून हत्तीकडून भात पिकांचे नुकसान : अस्वल, गव्याच्या भीतीपोटी जंगलात जाणे बनले कठीण,गेल्या 28 वर्षापासून हत्तीकडून भात पिकाचे नुकसान

आप्पाजी पाटील / नंदगड

कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशीमुळे खानापूर तालुक्मयातील जंगल भागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वाढत्या जंगलामुळे प्राण्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांसाठी जंगलात काही ठिकाणी तळी खोदली आहेत. पण अन्न व पाण्याच्या शोधात हत्ती, अस्वले, गवे आदी प्राणी जंगलाबाहेर म्हणजेच शेतवाडीत, प्रसंगी गावात येत आहेत. या प्राण्यामुळे भात, ऊस या पिकांचे नुकसान होतच आहे. शिवाय या प्राण्यांकडून माणसावर हल्ले होण्याचे प्रसंग घडत आहेत. गेल्या महिनाभरापासून हत्तरवाड भागात हत्तीकडून भात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे जंगली जनावरांच्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 गेल्या महिनाभरात हत्तरवाड भागातील सुमारे 25 हून अधिक शेतकऱयांच्या शेतातील हातातोंडाला आलेले उभे भात पीक हत्तीकडून खाऊन, तोडून नुकसान करण्यात आले आहे. वर्षभर बियाणे, खते व मजूर घालून हजारो रुपये खर्च करून ऐन सुगीत भात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱयांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही शेतकऱयांनी नुकसानभरपाईसाठी वनखात्याकडे पंचनामा केल्यानंतर संबंधित खात्याकडे अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वीचा अनुभव पाहता लाखो रुपयांचे नुकसान होते. शासनाकडून नुकसानभरपाई मात्र अत्यल्पच मिळते. त्यामुळे काही शेतकऱयांनी नुकसान भरपाईसाठी अर्जही टाळले आहे. शिवाय हत्ती, गवे, अस्वल या जनावरांच्या भीतीपोटी शेतात जाणे आता बंद केले आहे.

गवे-अस्वलांच्या संख्येत वाढ

खानापूर तालुक्मयात एकीकडे हत्ती, गव्याकडून शेतातील पिकांचे नुकसान तर दुसरीकडे अस्वलासारख्या हिंस्त्र प्राण्यांकडून मनुष्यावर हल्ले होताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षात वाघ व बिबटय़ांची संख्या थोडय़ाफार प्रमाणात वाढली असली तरी त्यांच्याकडून मानवांच्या जीविताला कोणताही धोका नाही. क्वचित ठिकाणी वाघ, बिबटय़ा व हत्तीनी हल्ला केल्याच्या घटना घडतात. हे प्राणी विशेषतः जंगल प्रदेशातून बाहेर पडत नाहीत. पण अलीकडे जंगल प्रदेशात गवे व अस्वल यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून अस्वले सुद्धा शेतात काम करणाऱया शेतकऱयांवर हल्ले करीत आहेत. पश्चिम भागातील कणकुंबी, बेटणे, आमटे, विभागात अस्वलांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत त्या भागातील अस्वलांच्या हल्ल्यात चौघांचा बळी गेला. तर नागरगाळी परिसरात एका शेतकऱयाला व एका शाळेच्या विद्यार्थ्याला काजूच्या बागेत गेल्यानंतर अस्वलांनी जखमी केले होते. चार वर्षांपूर्वी हत्तरवाड येथील एका वृद्ध महिलेला या  अस्वलाने जखमी केले होते. तर गवाळी, कोंगळा, आमगाव परिसरात दिवसाढवळय़ा माणसांच्या नजरेला अस्वले पडतात. त्या भागातील अस्वलाच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याच्या घटना घडतात. तीन वर्षांपूर्वी कौंदल येथील एका शेतकऱयावर अस्वलाने हल्ला करून त्याला जखमी केले होते. मात्र रक्तस्त्राव मोठय़ा प्रमाणात झाल्याने दोन दिवसात त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण खानापूर तालुका हादरून गेला होता.

नंदगड जवळील तट्टी नाल्याच्या सरकारी बांध परिसरातील अस्वलांचा वावर आहे. तसेच शिवोली, अलैहोळ ,वड्डेबैल परिसरात अस्वलांचा वावर वाढला आहे. हेम्माडगा, लोंढा, नागरगाळी भागातली वन्यप्राण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. अस्वलांचा वावर असलेल्या भागातील लोक आपल्याबरोबर कोयता व कुराड घेऊन शेतवाडी जातात. परंतु पै पाहुण्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांकडे कोणतेच शस्त्र नसते. ते बिनधस्तपणे जात असतात. प्रसंगी अस्वलाने हल्ला केल्यास त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नसल्याने प्रति हल्ला करणे किंवा त्यातून सुटका करून घेणे कठीण होऊन बसल्याने प्राणास मुकावे लागते. त्यामुळे जंगली प्राण्यांकडून पिकाचे केले जाणारे नुकसान आणि माणसावर होणारे हल्ले, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Stories

लोकमान्यतर्फे गणेशभक्तांना आरती ऍपची भेट

Patil_p

चिकोडी नगराध्यक्षपदी प्रवीण कांबळे बिनविरोध

Patil_p

बेंगळूरमध्ये १२,३२५ सक्रिय कंटेनमेंट झोन

Archana Banage

अर्ध्या वेतनावर किती दिवस काम करू?

Amit Kulkarni

अपघातानंतर गुड्स बोलेरो सर्व्हिस रोडवर उलटली

Amit Kulkarni

रेल्वेकडून संरक्षक कठडय़ाच्या कामाला सुरुवात

Amit Kulkarni