घरात एकटीच राहत होती महिला, कुटुंबियांकडून घातपाताचा संशय


प्रतिनिधी /सांगे
सांगेतील वरकटो येथील दुकानवजा घरात एकटय़ाच राहणाऱया 58 वषीय भारती राजेंद्र सामंत या महिलेचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याचे आढळून आले असून हा नैसार्गिक मृत्यू की, घातपात याचा तपास सांगेचे पोलीस करत आहेत. या मृत्युबद्दल कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे वरकटो परिसरात खळबळ माजली आहे तसेच तर्क-वितर्कांना ऊत आला आहे. पोलिसांनी ठसेतज्ञांना पाचारण करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरकटो येथे दुकानवजा घरात मयत भारती एकटीच राहत होती. सोळा वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर भारती या घरात असलेल्या खोलीत दुकान चालवत होती व तेथेच राहत होती. स्वतःच्या प्रेमळ वागण्यामुळे तिने शेजाऱयांना आपलेसे केले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत तिचे दुकान उघडे होते. सोमवारी दुकान बंद राहिल्याने ती आपल्या नातेवाईकाकडे गेली असावी असा समज शेजाऱयांना झाला. पण मंगळवारी सकाळीही दुकान बंद असल्याने शेजाऱयांनी फोन लावला असता घरात फोनची रिंग वाजत असल्याचा आवाज ऐकू आला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरात काही तरी घडले असावे असा समज करून शेजाऱयांनी पोलिसांना माहिती दिली.
सांगे पोलिसांनी दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप तोडून दुकान उघडले असता आतमध्ये भारतीचा मृतदेह दिसून आला. तिच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. मृतदेहाच्या शेजारी सोनसाखळी पडली होती. घरातील कपाटाचे दरवाजे पोलिसांना उघडे आढळून आले, मात्र कानातील सोन्याचे दागिने तसेच होते. बाकीच्या वस्तू त्या त्या ठिकाणी सुरक्षित होत्या. सांगे पोलिसांनी भारतीचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. वेर्णा येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या तज्ञांनी मृतदेहाची पाहणी केली असून सांगे पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिश राऊत देसाई यांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी हॉस्पिसियोत पाठवून दिला आहे.
याविषयी पत्रकारांशी बोलताना भारतीचा भाऊ गणबा राऊत देसाई म्हणाला की, माझ्या बहिणीच्या बाबतीत घातपात झाला असावा. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरटय़ाची बहिणीशी झटापट झाली असावी व त्यात बहिणीचा मृत्यू झाला असावा. यापूर्वी चोर घरात घुसल्याची तक्रार तिने आमच्याशी केली होती, असेही त्याने सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून रविवारी रात्री ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. भारतीच्या पायातील चप्पल तसेच होते. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा आता शवचिकित्सेतूनच होणार आहे.