दुसऱया टप्प्यातील काम सहा वर्षांत पूर्ण, वर्षभरात महामार्ग शंभर टक्के पूर्ण करण्याचे उध्दीष्ठ


प्रतिनिधी /वास्को
वरूणापुरी मांगोरहील ते हेडलॅण्ड सडापर्यंतच्या सुमारे पाच किलो मिटर अंतराच्या चौपदरी महामार्गाचे सोमवारी संध्याकाळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 2003 नंतर दुसऱया टप्प्यातील हा महामार्ग आता खुला झालेला असून पुढील वर्षभरात या महामार्गाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे उध्दीष्ठ ठेवण्यात आलेले आहे. या दुसऱया टप्प्यातील कामाला सहा वर्षांपूर्वी सुरवात करण्यात आली होती.
या उद्घाटन समारंभाला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, मंत्री माविन गुदिन्हो, खासदार विनय तेंडुलकर, भाजपाचे नेते दाजी साळकर, जयंत जाधव मुरगावचे नगरसेवक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच रस्ता बांधकाम कंपनी गॅमन इंडियाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. या महामार्गावरच गांधीनगर येथे महामार्गाच्या उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रम घडवून आणण्यात आला.
यावेळी महामार्गाचे औपचारीक उद्घाटन केल्यानंतर उपस्थित लोकांना संबोधीत करताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी अनेक अडचणींवर मात करून या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात यश आल्याने आपल्याला अतीव समाधान लाभल्याचे नमुद केले. ते म्हणाले की या महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे काही काळ काम बंदही पडले. मात्री आम्ही जिद्द सोडली नाही. या अडचणींवर सर्वांच्या सहकार्याने मात करणे शक्य झाले. आतापर्यंत या महामार्गाचे काम 70 टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरीत काम वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. पुढील कामात तीन ठिकाणी रेल्वे उड्डाण पुल उभारण्यात येतील असे केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले.
महामार्गाच्या अन्य कामांसाठी तीनशे कोटींचे प्रस्ताव, सिग्नलमुक्त महामार्ग प्रकल्पासाठी 400 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता
केंद्रीयमंत्री गडकरी यांनी यावेळी या महामार्गाच्या केलेल्या पाहणीत काही ठिकाणे अपघात प्रवण असल्यचे आढळून आल्याने हे धोके त्वरीत दूर करण्याच्या कामाला लागावे अशी सुचना महामार्गाच्या अधिकाऱयांना केली. काही ठिकाणी अतिक्रमणेही झालेली असून यात शासकीय अतिक्रमणांचा समावेश आहे. अतिक्रमणे कुणाचीही असली तरी आगाऊ नोटीसा बजावून हे अतिक्रमणे हटवण्याची कामगीरी पार पाडावी अशी स्पष्ट सुचनाही मंत्री गडकरी यांनी अधिकाऱयांना दिली. या महामार्गाच्या अधिक कामासाठी आपल्याकडे तीनशे कोटींचे प्रस्ताव आलेले असून त्यांना मंजूरी दिली जाईल असे ते म्हणाले. या महामार्गावरील एमईएस कॉलेज नाका ते वेर्णा दरम्यानच्या रस्त्यावर सिग्नलमुक्त प्रकल्पासाठीही महामार्ग खात्याने 400 कोटीच्या प्रस्तावांना मान्यता दिलेली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांचेही भाषण झाले.
वेर्णापासून हेडलॅण्ड सडापर्यंतच्या कामाला चोवीस वर्षांचा काळ
वेर्णा ते मुरगाव बंदर दरम्यानच्या साधारण तेरा किलो मिटर अंतराच्या या गोव्यातील पहिल्या चौपदरी महामार्गाच्या कामाला 1998 साली वेर्णाहून सुरवात झाली होती. या कामाची सुरवात सिमा रस्ता संघटन या संस्थेने केली होती. मात्र, सिमा रस्ता संघटनने या रस्त्याच्या कामातून माघार घेतल्याने अर्धवट राहिलेले काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 2003 साली वरूणापुरीपर्यंत पूर्ण केले होते. त्यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्रीपदी श्रीपाद नाईक होते. त्यानंतर बारा वर्षांनी या महामार्गाचे रखडत रखडतच पुढे गेले. मुळ बायणा किनाऱयावरून जमीनीवरून जाणारा हा रस्ता राज्य सरकारने मांडलेल्या नव्या कल्पनेमुळे गांधीनगर ते बोगदापर्यंत उड्डाणपुलाव्दारे जोडण्यात आला. वेर्णा ते हेडलॅण्ड सडापर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी चोवीस वर्षांचा काळ वाट पाहावी लागली आहे. आता हा रस्ता पूर्ण झाल्याने बायणा किनाऱयाचे आकर्षणही वाढलेले आहे. या आकर्षणाचा लाभ पर्यटनालाही होणार आहे. या महामार्गावरील पथदीपांच्या झगमगाटामुळे बायणा किनाराही झळाळून निघणार आहे. विशेष म्हणजे हेडलॅण्ड सडा भाग आता थेट मांगोरहिल भागाला जोडला गेलेला आहे. मुरगाव बंदर तसेच हेडलॅण्ड सडा बोगदा भागातील दक्षिण गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतुकही याच महामार्गावरून होणार असल्याने वास्को शहरावरील वाहतुकीचा ताण बराच कमी होणार आहे. हा महामार्ग अद्याप मुरगाव बंदराला थेट जोडण्यात आलेला नाही. महामार्ग बंदराला जोडण्याचे काम तिसऱया टप्प्यातील काम ठरणार असून हे काम सध्या बंदच आहे. हे काम पुन्हा सुरू होऊन पूर्ण होण्यासाठी एक वर्षांहून अधिक काळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.