Tarun Bharat

वसती बसेस बंद झाल्याने दक्षिण भागातील ग्रामस्थांचे हाल

कापोली-नंदगड-गोदगेरी वसती बसेस बंद : ‘परिवहन’चे दुर्लक्ष, बसअभावी विद्यार्थ्यांचे वेळापत्रकच कोलमडले

बातमीदार /खानापूर

खानापूर तालुका विस्ताराने मोठा आहे. डोंगराळ प्रदेश असल्याने दूरवर गावे वसली आहेत. दुर्गम भागातील गावांच्या लोकांना तालुक्मयाचे ठिकाण असलेल्या खानापूर व बेळगाव येथे जायचे असल्यास पूर्वी अनेक गावातून पहाटे निघणाऱया वसती बसफेऱया होत्या. परंतु अलीकडील निम्म्याहून अधिक गावातील वसती बसफेऱया बंद केल्याने त्या ग्रामस्थाचे हाल होत आहेत.

कणकुंबी, गोदगेरी, कापोली, भुरुणकी, मेरडा पूर्व भागातील हंदूर व बोगूर यासह अन्य ग्रामीण भागात यापूर्वी वसती बस होत्या. त्यामुळे या ग्रामीण भागातील लोकांना व विद्यार्थ्यांना पहाटे खानापूरला तसेच बेळगावला येता येत होते. त्यामुळे कार्यालयीन कामे व शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनाही सोयीचे होते. मात्र अलीकडे या वसती बसेस बंद करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. सकाळी खानापुरातून बस गेल्यानंतरच खानापूरला येता येते. त्यानंतर बेळगाव व इतर ठिकाणी जाण्यासाठी खानापुरातून बस धरावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर ग्रामस्थांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

दहा वर्षापासून बससेवा बंद

गोदगेरी गावासाठी खास वसती बससेवा होती. गेली 30 वर्षे ही सेवा निरंतर सुरू होती. त्यामुळे गोधोळी, नागरगाळी, हलगा, हलशी भागातील नागरिकांना पहाटे 6 वाजता बेळगावला जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध होती. सायंकाळी त्याच बसफेरीने आपल्या गावाला पोहोचण्याची व्यवस्था होती. त्यामुळे गोदगेरी बस फेरी या भागातील लोकांची चांगली सोय होती. दहा वर्षापासून ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागातील जनतेला खासगी वाहनाने खानापूरला यावे लागते. त्यानंतर बेळगावला जाण्यासाठी इतर वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

मेरडा, नंदगड-कापोली बसही बंदच

पूर्वी हलशी गावाला येण्यासाठी बैलहोंगल आगाराची बैलहोंगल-हलशी बस होती. तसेच कारवार-बेळगाव या रस्त्यादरम्यान हलशीमार्गे बसफेरी होती. पण त्याही दोन्ही बसफेऱया अचानकपणे बंद करण्यात आल्या आहेत. मेरडा गावासाठी खास एक बसफेरी होती. तीही अलीकडे बंद करण्यात आली आहे. तसेच नंदगडमार्गे कापोली गावासाठी बसफेरी होती. तीसुद्धा बंद करण्यात आली आहे. वरील बसेस बंद केल्यामुळे नागरगाळी, हलगा व हलशी गावाला बसच्या सुविधा बऱयाच प्रमाणात कमी झाल्या आहेत.

हलशीला भेट देणाऱयांची संख्या मोठी

हलशी हे गाव ऐतिहासिक कदंबाची राजधानी आहे. येथील कदंबकालीन मंदिरे, त्यावरील शिल्पकला पाहण्यासाठी व त्या संबंधित अभ्यास करण्यासाठी धारवाड, बेळगाव, कारवार जिल्हय़ातून अनेक पर्यटक व विद्यार्थी येथे येत असतात. परंतु हलशी गावाला खानापूरहून शटल बसची सुविधा नसल्याने प्रवासीवर्गांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

नंदगड वसती बस बंद

नंदगड हे खानापूर तालुक्मयातील अधिक लोकसंख्या असलेले गाव. येथील अनेक लोक विविध कामानिमित्त बेळगावला जात असतात. पूर्वी बेळगाव आगाराची वसती बस नंदगडसाठी होती. त्यामुळे पहाटे सहा वाजता नंदगडहून सुटणारी बस सव्वा सात वाजता बेळगावला पोहोचत होती. त्यामुळे या भागातील विद्यार्थी व नोकरदारांना सोयीचे होते. परंतु अलीकडे ही बसफेरीसुद्धा बंद झाल्याने नंदगड भागातील जनतेचे हाल होत आहेत.

Related Stories

‘ई-आस्ती’च्या नोंदीसाठी अभियंते करणार मालमत्तांची चाचपणी

Patil_p

रोहयोत गैरव्यवहार : 2 कोटींची वसुली रखडली

Amit Kulkarni

शुभम शेळके यांना दोन्ही प्रकरणात जामीन

Amit Kulkarni

बेळगाव शहरात प्रगतीपरची सत्ता

Omkar B

‘खानापूर बंद’ शंभर टक्के यशस्वी

Amit Kulkarni

महिलांसाठी निराधार केंद्र सुरू करण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni