Tarun Bharat

वस्त्रहरणकारांचे ‘विठ्ठल विठ्ठल’ लवकरच रसिकांच्या भेटीला!

       प्रकाश नाचणेकर  /राजापूर  

‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषा सातासमुद्रापार पोहोचवणारे राजापूर तालुक्यातील माडबन गावचे सुपुत्र गंगाराम गवाणकर यांचे ‘विठ्ठल विठ्ठल’ हे नवीन नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मिठगवाणे, जानशी गावातील स्थानिक कलाकार हे नाटक सादर करणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. त्यामुळे राजापूरवासीयांना या नाटकाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

‘वस्त्रहरण’ नाटकाचा पहिला प्रयोग 15 फेब्रुवारी 1980 रोजी झाला होता. या नाटकाला मंगळवारी 42 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गवाणकर यांनी वस्त्रहरण नाटकाचा आजवरचा प्रवास आणि नव्याने येऊ घातलेल्या ‘विठ्ठल विठ्ठल’ या नाटकाची वाटचाल ‘तरुण भारत’समोर मांडली. मुळात 1975 साली वस्त्रहरण रंगभूमीवर आले. मात्र पहिले दोन प्रयोग झाल्यावर नाटक थांबले. त्यानंतर 1980 साली ओम नाटय़गंधा या संस्थेने या नाटकाचा पहिला व्यावसायिक प्रयोग 16 फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित झाले. परंतु या नाटकातील मुख्य भूमिका साकारणारे मच्छींद्र कांबळी त्या दिवशी उपलब्ध नसल्याने पहिल्याच नाटकात मुख्य भूमिका स्वतः गंगाराम गवाणकर यांनी साकारली. त्यामुळे वस्त्रहरण नाटकाच्या पहिल्या प्रयोगात माझेच वस्त्रहरण होण्याची वेळी आली होती, असे ते मिश्कीलपणे म्हणाले. त्यानंतर या नाटकाचे आजवर 5 हजाराहून अधिक प्रयोग झाले आहेत.

ज्या मातीने ओळख दिली त्या जन्मभूमीत परत जाऊन तेथील कलाकारांना एकत्रित करून काहीतरी करावे, अशी पहिल्यापासून इच्छा होती. वयाची 62 वर्षे मुंबईत व त्यातील 50 वर्षे नाटय़क्षेत्रात गेली. त्यामुळे उतरत्या वयात माडबन येथील घरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत जानशी येथील 100 वर्षे जुन्या गोपाळकृष्ण प्रासादिक नाटय़ मंडळाशी संपर्क आला आणि तेथून  ‘विठ्ठल विठ्ठल’ची वाटचाल सुरू झाली.

वस्त्रहरण प्रमाणेच ‘विठ्ठल विठ्ठल’ची सुरूवातही एकांकिकेतून झाली. तालीम सुरू असताना एक एक भाग सुचत गेला आणि आता हे नाटक म्हणून रंगमंचावर सादर होणार आहे. स्थानिक कलाकारांना घेऊन नाटक करण्याचे पाहिलेले स्वप्न गोपाळकृष्ण नाटय़ मंडळामुळे साकार होत असल्याचे गवाणकर यांनी सांगितले. या नाटकातील सर्व कलाकार जानशी, मिठगवाणे परिसरातील आहेत. नाटकाचे दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, गीतकार, प्रकाश योजना आदी सर्व स्थानिक मंडळींचेच असल्याचे गवाणकर यांनी सांगितले.

प्रबोधन आणि मनोरंजन याचा मिलाफ असलेल्या या नाटकात पुंडलिक नावाच्या विठ्ठल भक्ताची कहाणी आहे. शासकीय सेवेत असलेल्या पुंडलिकासमोर पैशाचे कुरण असतानाही तो सचोटी आणि प्रामाणिकपणे काम करत असतो. मात्र त्याचे हे वागणे घरच्यांना पटत नाही. वाममार्गाने पैसा मिळवावा यासाठी घरातील मंडळींकडून पुंडलिकवर दबाव टाकला जातो. त्यामुळे तो विठ्ठलाकडे धाव घेत आपली व्यथा सांगतो. विठ्ठल स्वतः प्रकट होऊन आता तुझ्यासमोर चोरी केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. असे सांगतो. प्रामाणिक पुंडलिकासमोर पेचप्रसंग निर्माण होतो. यातून पुंडलिक कसा मार्ग काढतो, याची मनोरजक कहाणी नाटकात असल्याचे गवाणकर यांनी सांगितले.

या नाटकाचे दिग्दर्शन जैतापूर हायस्कूलचे शिक्षक प्रसाद पंगेरकर यांनी केले आहे. नेपथ्य सुप्रसिध्द नेपथ्यकार बाबा पार्सेकर, संगीत दिग्दर्शन प्रशांत मेस्त्राr, संगीत साथ सौरभ भोगले, विजय लिंगायत, प्रकाश योजना विशाल तिवरामकर, गीत रचना प्रसाद पंगेरकर, नृत्य दिग्दर्शन शांभवी सुतार यांनी केले आहे. राजेंद्र तांबे, दिनेश वाडेकर, सुनिल धनावडे, अथर्व धनावडे, प्रकाश परांजपे, मंदार परांजपे, प्रणय ठुकरूल, शुभम तांबे, प्रसाद पंगेरकर, ऋतुजा मेस्त्राr, स्वरा मेस्त्राr विविध भूमिका साकारणार आहेत. मार्गदर्शक म्हणून प्रकाश ऊर्फ आबा परांजपे  काम पाहणार आहेत.

या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 19 फेब्रुवारी रोजी जानशी येथे होणार आहे. गवाणकर यांचे मित्र प्रसिद्ध गझल आणि भावगीत गायक सुनील परूळेकर यांनी एकदा ‘विठ्ठलानेच भक्ताला सांगितले चोरी कर.. तर काय होईल.. असा प्रश्न गवाणकर यांना केला होता. या एका वाक्यावरून हे नाटक सुचल्याचे गवाणकर यांनी सांगितले.

Related Stories

जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचा अजब नमुना

Patil_p

अक्षरशः ढगफुटी, तीन तालुक्यांत पूर

NIKHIL_N

शिक्षक दिन ‘काळा दिवस’ म्हणून पाळणार!

NIKHIL_N

सांबराच्या शिंगांची तस्करी करणारे सिंधुदुर्गातील दोघे गजाआड

Archana Banage

तुझ्या नातीक सांग फोन करू नको म्हणान..!

NIKHIL_N

झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर अपघात

Anuja Kudatarkar