Tarun Bharat

वांगी ग्रामपंचायतीस केंद्राचा ‘हा’ पुरस्कार जाहीर

वांगी /वार्ताहर

वांगी (ता.कडेगाव) या ग्रामपंचायतीस केंद्र शासनाचा सन २०१९-२० या वर्षाचा “पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार” जाहीर झाला असल्याची माहिती सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी दिली. केंद्र शासनाने त्याबाबत वांगी ग्रामपंचायतीस सूचित केले आहे. ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीस पुरस्कार मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून १७ व सांगली जिल्ह्यांतून एकमेव वांगी ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.

वांगी ग्रामपंचायत राज्य व केंद्र शासनाच्या योजना अतिशय प्रभावीपणे राबवत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार हा ऑनलाईन पद्धतीने सुरू असून संपूर्णतः ई-गव्हर्नर्स प्रणाली राबवणारी ही ग्रामपंचायत आहे. शासनाच्या योजनांच्या सोबत ग्रामस्थांच्यासाठी स्व. पतंगराव कदम ग्राम आरोग्य संजीवनी योजना, संत तुकाराम वैकुंठ गमन योजना, करवसुली प्रोत्साहन योजना, शालेय योजना, मुलींचे शुभकार्य तसेच दुःखद कार्यात मोफत टँकर अश्या अनेक लोकाउपयोग योजना ग्रामपंचायतीने राबवल्या आहेत. खिंडार मुक्त गाव या उपक्रमा अंतर्गत जवळपास शंभर वर्षांपासून गावात असणारे खिंडार ग्रामपंचायतीने काढत ग्रामपंचायतीने गावास खिंडार मुक्त करत त्या जागा मोकळ्या केल्या आहेत.

कोरोना काळात मोफत आर्सेनिकम-३० या गोळ्यांचे वाटप करणारी पहिली ग्रामपंचायत आहे. या सर्व बाबींचा विचार करता ग्रामपंचायतीस केंद्र शासनाने अतिशय प्रतिष्ठित असा मानला जाणारा “पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार” देऊन सन्मानित केले आहे. रोख रक्कम ११.५० लाख, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या शुभहस्ते दिल्ली येथे सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाने पुरस्कार वितरण सोहळा कधी संपन्न होईल हे कळवले नाही. लवकरच त्याबाबत ग्रामपंचायतीस सूचित करण्यात येणार असल्याचे सरपंच डॉ.विजय होनमाने यांनी सांगितले. वांगी ग्रामपंचायतीस हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री ना.डॉ.विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, युवक नेते शांताराम कदम, डॉ.जितेश कदम यांच्यासह परिसरातील सरपंच व पदाधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.

Related Stories

प्रभाग क्र. १६ मधील कणसे गल्ली येथे नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ

Archana Banage

समस्या सुटत नसतील तर बिस्तारा बांधा, चालते व्हा..! सांगलीत नागरिक आक्रमक

Abhijeet Khandekar

वसगडे-नांद्रे मार्गावर झाड कोसळले; राज्यमार्गाची वाहतुक ठप्प

Rahul Gadkar

अन् भाजपा प्रदेशाध्यक्षांना गटारीचे महत्त्व कळाले…

Archana Banage

बेमुदत शाळा बंद आंदोलन तूर्त स्थगित : रावसाहेब पाटील

Archana Banage

पिकविम्याचा प्रश्न मंत्री जयंत पाटील यांच्या दरबारात

Archana Banage