Tarun Bharat

वाढीव वीज बिले रद्द करण्यासाठी दापोलीत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

प्रतिनिधी / दापोली

चक्रीवादळा नंतर आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांच्याविरोधात व जुलै महिन्याचे वादळग्रस्त नागरिकांचे वीज बिल रद्द करण्याचे आश्वासन देऊन देखील रद्द न झाल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीच्या वतीने दापोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांनी लाईट बिलांचा मास्क बनवून अनोख्या पद्धतीने चुकीची बिले देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध केला.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चातील कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर येऊन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी वीज बिलांचा मास्क बनवला होता. वीज बिलांचा मास्क घातलेले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते तहसील कार्यालयावर धडकल्यावर तेथे त्यांनी वाढीव बिलांची विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच सदर चुकीची बिले देणाऱ्या अधिकार्‍यांचा निषेध केला.
या मोर्चाला तहसीलदार वैशाली पाटील या सामोर्‍या गेल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनीच्या वतीने बोलताना माजी आमदार संजय कदम यांनी महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले.
यावेळी चुकीची आलेली जी वीज बिल आहेत ती माझ्या निदर्शनात आणून द्या, आपण वैयक्तिकरित्या यात लक्ष घालून सदर बिल दुरुस्त करून देऊ, असे आश्वासन तहसीलदार वैशाली पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
यावर बोलताना जर येत्या आठवडाभरात ही बिले दुरुस्त करून देण्यात आली नाहीत व जुलै महिन्यात वीज नसतानाचे वीज बिल देखील ग्राहकांच्या माथी मारण्यात आले तर राष्ट्रवादी त्यांच्या पद्धतीने सर्वांचा समाचार घेईल, असा गर्भित इशारा माजी आमदार संजय कदम यांनी प्रशासनाला दिला. तसेच जोपर्यंत प्रशासन वीज बिले दुरुस्त करून देत नाही तोपर्यंत कोणत्याही नागरिकाने वीज बिल भरू नये, असे आवाहन देखील आमदार माजी आमदार संजय कदम यांनी उपस्थितांना केले. यावेळी पंचायत समिती सभापती रउफ हजवानी यांच्यासह राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य सरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Stories

मतिमंद विद्यालयाला अन्नधान्यासह शैक्षणिक व क्रिडा साहित्य

Anuja Kudatarkar

कोकणात तोंड, जीभ, स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक

Patil_p

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सुधारित,अंतिम अंदाजपत्रक मंजूर

Archana Banage

जिल्हय़ातील 182 विकासकामांना जिल्हाधिकाऱयांकडून मंजुरी

NIKHIL_N

लेप्टोस्पायरोसीससाठी 222 गावे जोखीमग्रस्त

NIKHIL_N

निकृष्ट दर्जाचे झेंडे इन्सुली ग्रामपंचायतीकडून परत

Anuja Kudatarkar