करडवाडी/प्रतिनिधी
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लोक आर्थिक मंदीचा सामना करत असून त्यातच महावितरण कढून वाढीव वीज बिल आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या घडलेल्या प्रकारात वेळीच लक्ष घालून वाढीव आलेले वीज बिल कमी करावे अन्यथा आंदोलन करू अशी मागणी शिव ग्रामीण व शहरी विकास सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री यांनी केली. यावेळी महावितरण चे उप कार्यकारी अभियंता दिगंबर पोवार यांच्याकडे वाढीव बिलासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली.
यावेळी म्हाब्री यांनी, फेब्रुवारी २०२० पूर्वी घरगुती स्थिर आकार ९० रुपये होता पण लॉकडाऊन च्या काळातच घरगुती स्थिर आकार १०० रुपये करण्यात आला. अर्थातच बिलामध्ये वाढ झाली. सद्याच्या काळात कोरोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून लोक आर्थिक टंचाईचा सामना करत आहेत त्यातच महावितरणने स्थिर आकार ९० रुपये वरून १०० रुपये वर नेऊन ठेवला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा. अशी मागणी केली.
दरम्यान वाढीव वीज बिलाने त्रस्त झालेले नागरिक तक्रार देण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात दररोज येत आहेत तरी वाढीव वीज बिल कमी करून सर्वांना दिलासा द्यावा अशी मागणी भागातील नागरिकांमधून होत आहे. यावेळी नवनाथ तेली, जावेद गवंडी, शुभम स्वामी, विवेक एकल, अमीर शेख, सुशांत भोसले, सूरज म्हाब्री, प्रसाद कुलकर्णी, सतीश कोराणे, आदी उपस्थित होते.


previous post