उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर : मांदेचे आमदार दयानंद सोपटे यांच्याकडून स्वागत,तुयेचे पंच नीलेश कांदोळकर यांचा विरोध
प्रतिनिधी / पेडणे
शेळ मेळावली येथील नियोजित आयआयटी प्रकल्पावरून सरकार कोंडीत आल्यानंतर हा प्रकल्प सरकारने तेथून आता तो पेडण्यात येण्यासाठी महसूल खात्याने पुढाकार घेतला असून तसा प्रस्ताव दिल्याचे समजले असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. हा प्रकल्प होण्याअगोदर यातून किती रोजगार निर्मिती होणार, एकूण त्या प्रकल्पाला जागा किती संपादित केली जाईल तसेच हा प्रकल्प कुठल्या पंचायत क्षेत्रात होणार याबाबतची सर्व माहिती जनतेला द्यावी, अशी मागणी आता पेडणे तालुक्मयात जोर धरत आहे.
पेडण्यात आणलेले प्रकल्प अगोदर पूर्ण कराः नीलेश कांदोळकर


पेडणे तालुक्मयात सध्या अनेक प्रकल्प आले असून यात सर्वांत मोठा प्रकल्प म्हणजे मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ , त्यानंतर आयुष इस्पितळ व त्यानंतर तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटी व तुये येथील औद्योगिक वसाहत असून या वसाहतीसाठीसुद्धा सरकारने सुमारे चार लाख अधिक जागा परत एकदा घेऊन येथील शेतकरी आणि अन्य जमीनदारावर अन्याय केला आहे. त्याच धर्तीवर सरकार आता परत एकदा तुये येथे हा आयआयटी प्रकल्प आणत असून हा प्रकल्प आणण्यापूर्वी सरकारने या अगोदर पेडण्यातील गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी चे प्रकल्प पूर्णत्वास आले नाही ते पूर्णत्वास न्यावेत त्यानंतरच हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी तुये पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सदस्य नीलेश कांदोळकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीपाशी बोलताना केली.
तुये पंचायत क्षेत्रातच हे प्रकल्प का? : कांदोळकर
नीलेश कांदोळकर म्हणाले की, तुये पंचायत क्षेत्रात अनेक प्रकल्प सरकारने आणले आहेत. त्यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प. इलेक्ट्रॉनिक सिटी गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी बंदच आहे. यातून इथे अनेकांना रोजगार मिळणार असे सांगण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या प्रकल्पाला चालना दिली होती. मात्र त्यानंतर गेली चार वर्षे या प्रकल्पाबाबत कुठल्याच हालचाली झाल्या नाही. या प्रकल्पात अनेक इच्छुक असलेल्या कंपन्या अजूनही आल्या नसल्याने नागरिकांना रोजगाराच्या संधी अजूनपर्यंत उपलब्ध झाल्या नाही, मात्र जमीनदारांची व शेतकऱयांच्या मोठय़ा प्रमाणात जमिनी या प्रकल्पासाठी हडप केली आहे. नियोजित भव्य इस्पितळ गेली चार वर्षे तसेच आहे. इस्पितळासाठी करोडो रुपये खर्च केले. मात्र हे इस्पितळ गेले चार वर्षे बंद असल्याने इथेही सरकारने दुर्लक्ष केल्याचे नीलेश कांदळकर यांनी सांगितले.
तुये येथे आयआयटी प्रकल्प आणण्याचा प्रस्ताव सरकारच्या महसूल खात्याने पाठवल्याची माहिती काही वर्तमानपत्रांतून आल्यानंतर हा प्रकल्प पेडणे तालुक्मयात आणण्या अगोदर पेडणे तालुक्मयातील अनेक प्रकल्प आहेत ते सरकारने अगोदर पूर्ण करावेत. तसेच तुये येथील इलेक्ट्रॉनिक प्रकल्पाला अजून चालना मिळाली नाही. यासाठी मोठय़ा प्रमाणात जमीन घेण्यात आली. तो अगोदर पूर्ण करुन त्यातून रोजगारनिर्मिती स्थानिकांना द्यावी व नंतरच नव्याने प्रकल्प आणावेत, अशी जोरदार मागणी कांदोळकर यांनी केली आहे.
शेतकऱयांनी शेती कुठे करावी ?
सरकार शेतकऱयांच्या लाखो चौरस मीटर जमीन कवडीमोल किमतीला घेऊन त्या खासगी कंपनीच्या घशात घालण्याचे काम सरकार सध्या करत असून पेडण्यात आता जमीन शेतकऱयांना राहिली नाही. तुये पंचायत क्षेत्रातच सरकार हे प्रकल्प का आणत आहे. या ठिकाणी असलेल्या शेतकऱयांच्या जमिनी या अगोदरच सरकारने ताब्यात घेतलेले आहे व या पंचायत क्षेत्रात आता जमीन राहिली नाही. शेतकऱयांनी जमीन नसल्याने शेती कुठे करावी? सरकार मात्र सांगत आहे की कृषिप्रधान देश , शेती संस्कृती वाढावी , शेती करावी मात्र या ठिकाणी आता प्रकल्प आणून या जमिनी सर्वांच्या सरकारने ताब्यात घेतलेले आहे. जर हा प्रकल्प अन्य तालुक्मयाच्या ठिकाणी किंवा अन्य पंचायत क्षेत्रात सरकार तसेच अन्य तालुका ठिकाणी नेत असल्यास आपली काही हरकत नाही असे नीलेश कांदोळकर म्हणाले.
सरकारने महसूल विभागाकडे तुये येथे आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी फाईल पाठवलेली आहे. पेडणे तालुक्मयातील मांदे मतदारसंघातील तुये पंचायत क्षेत्रातील नियोजित आयआयटी प्रकल्पाजवळ आता सरकारने भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱया शैक्षणिक क्षेत्रातील उच्च दर्जाचा आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविला, अशी चर्चा आहे.
आयआयटी म्हणजे काय ?
भारतीय तंत्रज्ञान संस्था या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली आयआयटी देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानली जाते. आजच्या घडीला देशात एकूण 23 आयआयटी कार्यरत आहेत. आयआयटीच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ऍप्टटिय़ूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते.
आयआयटी प्रकल्प पेडण्यात भावी पिढीसाठी वरदान : दयानंद सोपटे


मांदेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, आपल्या मतदारसंघात भारतातील उच्च शैक्षणिक क्षेत्रातील आयआयटी प्रकल्प येत आहे तर आपण त्याचे स्वागत करतो. शिक्षण क्षेत्रातील हे क्रांतिकारक पाऊल आहे. हा प्रकल्प आला तर आपण त्याचे स्वागत करीन. शिवाय जनतेलाही त्याची योग्य ती माहिती देणार असल्याचे सांगितले. अशा चांगल्या प्रकल्पाचे आपण सदोदित आमदार या नात्याने स्वागत करणार असल्याचे सांगितले. भावी पिढीच्या भवितव्यासाठी व त्यांना चांगले शिक्षण आमच्या पेडणे तालुक्मयात तसेच गोमंतकीय जनतेला या तालुक्मयात मिळावे यासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. सध्या गोव्यात असा प्रकल्प नसून आमचे विद्यार्थी भावी शिक्षणासाठी इतर राज्यात जातात. त्यामुळे अनेकांना आर्थिकदृष्टय़ा अडचण भासते, पेडणे तालुक्मयात हा प्रकल्प झाला तर गोव्यातील जनतेला आणि खास करून पेडण्यातील जनतेला मोठा लाभ होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्मितीच्या संधी मिळणार आहे.
आयआयटी प्रकल्पाचे स्वागत : बाबू आजगावकर


या विषयी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता कोणताही प्रकल्प आणण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेऊन आणायला हवा. जसा मोप विमानतळ आणला व जनता रस्त्यावर उतरून हा प्रकल्प मार्गी लावला तसा तो करायला हवा. कोणताही प्रकल्प जनतेच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. कोणतेही प्रकल्प आणण्यापूर्वी अगोदर पाणीपुरवठा प्रश्न सोडवायला हवा व प्रकल्प होण्यापूर्वी या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार किती मिळणार यासंबंधी सरकारने स्पष्टीकरण द्यावे.