Tarun Bharat

‘वादळग्रस्तां’च्या भरपाईत भरीव वाढ

घराच्या नुकसानीपोटी 95 हजारावरून दीड लाख भरपाई : पीक भरपाईतही वाढ

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

नैसर्गिक चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये बाधित झालेल्या नागरिकांना मालमत्तेच्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून वाढीव मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता पूर्णत: घर पडलेल्या नागरिकांना 95 हजारावरून दीड लाख रुपये, अंशत: पडझड झालेल्या घरांना 6 हजारावरून 15 हजार रु., पिकाच्या नुकसानीपोटी हेक्टरी 18 हजारावरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शिवाय कपडे, भांडी, दुकानांच्या नुकसानीपोटीही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्हय़ासह रत्नागिरी, रायगड आणि मुंबईला बसला. रायगड जिल्हय़ाला सर्वाधिक फटका बसला. तसेच इतर जिल्हय़ांनाही फटका बसला. त्यामध्ये काही घरे पूर्णत: नष्ट झाली. काही घरांची पडझड झाली. कपडे, भांडी, पिकाचेही नुकसान झाले. फळझाडांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून रायगड जिल्हय़ाला 100 कोटी, रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ाला 25 कोटी रुपये जाहीर केले. त्यानंतर चक्रीवादळात बाधित लोकांच्या मालमत्तेच्या नुकसानीपोटी वाढीव मदत मिळावी, अशी मागणी होती. त्यानुसार नैसर्गिक चक्रीवादळाचा तडाखा बसून बाधित झालेल्या लोकांना विशेष बाब म्हणून वाढीव मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याप्रमाणे नव्या वाढीव मदतीचा शासन निर्णय जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

 पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी 95 हजार 100 रुपये एवढी मदत देण्याचा प्रचलित दर आहे. मात्र नैसर्गिक चक्रीवादळातील बाधित लोकांना पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. अंशत: म्हणजे 15 टक्क्यांपर्यंत पडझड झालेल्या घरांसाठी तसेच कच्च्या घरांसाठी, नष्ट झालेल्या झोपडीसाठी सहा हजाराची मदत दिली जात होती. ती आता 15 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

 कपडय़ांच्या नुकसानीपोटी प्रति कुटुंब अडीच हजार रुपये दिली जात होती. पाच हजार रुपयांपर्यंत भरपाईत वाढ करण्यात आली. घरगुती भांडी, वस्तू नुकसानीपोटी अडीच हजार रुपये दिले जात होते. तेही प्रति कुटुंबास पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. दुकानदार व टपरीधारकांच्या नुकसानीपोटी नुकसानीच्या 75 टक्के किंवा 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टर 18 हजार रुपये दिले जात होते. त्यात वाढ करून दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 50 हजार रुपयांपर्यंत वाढ करून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.  चक्रीवादळातील बाधित लोकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर लाभार्थी निश्चित करून त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

नोकऱया जाण्याच्या भीतीने युवक-युवती तणावाखाली

NIKHIL_N

सेवानिवृत्त शिक्षिका इंदिरा भागवत यांचे निधन

Anuja Kudatarkar

वाशी फळबाजारामध्ये 24 हजार हापूस पेटय़ांची आवक

Patil_p

तरुण भारतच्या पत्रकार जान्हवी पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

Archana Banage

रक्तपेढीला पलंग बेडची देणगी

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाचा विळखा

Archana Banage