Tarun Bharat

वादळात कोसळलेले झाड पुन्हा झाले उभे!

मनोज पवार/ दापोली

तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील इळणे गावात निसर्ग चक्रीवादळात पूर्णपणे कोसळलेले वावळ्याचे झाड पुन्हा उभे राहिले आहे. हे झाड गावातील भैरी जोगेश्वरी देवस्थानच्या समोरच असल्याने हा दैवी चमत्कार असल्याचे ग्रामस्थ मानत आहेत. पुन्हा उभे राहिलेले हे चमत्कारिक झाड पाहण्यासाठी दापोली तालुक्यातून जनतेची गर्दी होत आहे.

  3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा  दापोली तालुक्याला चांगलाच फटका बसला. या चक्रीवादळात इळणे गावाचीदेखील वाताहात झाली. या गावात भैरी जोगेश्वरी देवीचे प्राचिन मंदिर आहे. हा संपूर्ण परिसर केसरी नदीच्या किनारी असणाऱया पवई केसरी पंचक्रोशी या रजिस्टर संस्थेच्या अंतर्गत येतो. या मंदिरा समोर सुमारे 80 वर्षे जुने वावळ्याचे झाड होते. हे झाड निसर्ग चक्रीवादळात मुळासकट भुईसपाट झाले. देवळा नजीकच्या सुलभ शौचालयावर हे झाड पडले. कित्येक दिवस हे झाड पडलेल्या अवस्थेत होते.

 कटर बंद पडले!

  त्यानंतर ग्रामस्थांनी एक दिवस श्रमदान करून मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी तीन कटरच्या सहाय्याने मंदिर परिसरात पडलेली झाडे बाजूला गेली. शेवटी हे वावळ्याचे झाड तोडायला घेतले. मात्र हे झाड एवढे कडक होते की काही फांद्या व झाडाचा वरचा भाग कापल्यानंतर तीनही कटर झाड बंद पडले. शेवटचा कटर बंद पडल्यानंतर काम अर्धवट ठेऊन सायंकाळी सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी गेले. दुसऱया दिवशी सकाळी ग्रामस्थ उर्वरित झाड कोपण्यासाठी पुन्हा आले असता त्यांना आदल्या दिवशी आपणच तोडलेले झाड चक्क उभे राहिलेले दिसले. 

चमत्कार पहायला मोठी गर्दी

  हा चमत्कार पाहण्यासाठी गाव लोटला. हा हा म्हणता ही बातमी पंचक्रोशीत व संपूर्ण तालुक्यात पसरली. आज या उभ्या राहिलेल्या खोडाला पालवीदेखील फुटली आहे. वादळात पडल्यानंतरही पुन्हा उभे राहिलेले हे झाड पाहण्यासाठी दापोली तालुक्यातून अनेक भक्त गर्दी करत आहेत. हा भैरी जोगेश्वरी देवीचा चमत्कार असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 

गागाभट्टांच्या वंशजांनी केली देवीच्या मूर्तीची स्थापना

  भैरी जोगेश्वरी देवस्थान परिसरामध्ये भैरी जोगेश्वरी, अन्नपूर्णा, लक्ष्मीनारायण, उजव्या सोंडेचा गणपती, महादेव व पेटकरीन मंदिर अशी सहा मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे पांडवकालीन असल्याची माहिती गावचे पाटील व पुजारी श्रीधर खांबे व श्याम चिलबे यांनी दिली. सर्व मंदिरांच्या भिंती जाड मोठय़ा कातळाच्या असल्याने त्या कोणीही हलवू शकत नाही. आपण केवळ एका मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय या परिसरात मोठय़ाप्रमाणात ‘विरघळ’ सापडत असल्याचेदेखील ते म्हणाले. परिसरामध्ये एक तोफ असून ही तोफ काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. ती त्यांनी चिपळूण येथे जाऊन पुन्हा परत आणली. भैरी जोगेश्वरी मंदिराची स्थापना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला त्या गागाभट्ट यांच्या वंशजांनी केल्याची माहितीही त्यांनी दिली. 

अन्नपूर्णा देवीचे राज्यातील दुसरे मंदिर

   महाराष्ट्रामध्ये अन्नपूर्णा देवीची दोन मंदिरे असून त्यापैकी एक मंदिर या परिसरात आहे. हनुमान जयंतीच्या दुसऱया दिवशी येथे मोठा उत्सव होतो व परिसरामध्ये रथ फिरवला जातो.

Related Stories

प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयात सिंधुदुर्गही

NIKHIL_N

जिह्यात आतापर्यंत 4 टक्के रूग्ण कोरोनाबाधित

Patil_p

आमदार वैभव नाईकांची अवस्था ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी’!

NIKHIL_N

राजापूर-चव्हाणवाडी येथील 40 वर्षीय इसमाचा खून ?

Abhijeet Khandekar

सोमवारपर्यंत कामावर आल्यास एसटी कर्मचाऱयांचे निलंबन मागे घेणार

Patil_p

आता जमीन मोजण्यासाठी ‘ईटीएस’ मशीनचा वापर

Patil_p
error: Content is protected !!