Tarun Bharat

वादळामुळे राज्यात तब्बल 40 कोटींचे नुकसान

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : नुकसानीचा आकडा अजून वाढण्याची शक्यता सर्वाधिक नुकसानी वीज खात्याची

प्रतिनिधी / म्हापसा

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात अंदाजे चाळीस कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काल बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बार्देश तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. त्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना वरील माहिती दिली.

मरड-म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा, अतिरिक्त जिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, उपजिल्हाधिकारी विरा नाईक, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, वीज खात्याचे साहाय्यक अभियंता नॉर्मन आताईद, पालिका मुख्याधिकारी क्लेन मदेरा, अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव, पालिका अभियंता सुभाष आमोणकर, गट विकास अधिकारी शिवप्रसाद नाईक, पोलिस उपनिरीक्षक आशिष परब, सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता केनावडेकर आदींसह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

इतर राज्यांतून आणणार मनुष्यबळ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या चक्रीवादळामुळे गोव्यात वीज खात्याची सर्वाधिक हानी झाली. अनेक खांब तसेच वीज तारा तुटून पडलेल्या आहेत. याची दुरुस्ती करून पूर्ववत करण्यासाठी राज्यात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यासाठी बाहेरील राज्यांतून मनुष्यबळ आणले जाणार आहे. वीज खांबांवर चढणारे कामगार गोव्यात नसल्यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यात विलंब लागणार आहे. येत्या दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याची तयारी ठेवली आहे. वीज खात्याचे सर्व अभियंते, लाईन मन व इतर कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी दिवस लागणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बार्देशात 135 घरांवर झाडे कोसळली

बार्देश तालुक्यामध्ये 135 घरांवर झाडांची पडझड झाल्यामुळे मोठी हानी झाल्याचे लक्षात आले आहे. उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांना आपण आपत्कालीन व्यवस्थेच्या फंडातून तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱयांकडे आपत्कालीन व्यवस्था फंड नसल्याने आपण त्यांना मागणी करण्यास सांगितले आहे. 135 घरांशिवाय आणखी तक्रारी असल्यास तात्काळ मामलेदार कार्यालयाकडे मदतीसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला केले आहे.

जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी यंत्रणा सक्रिय

वीज खात्याचे सर्व अभियंते, कर्मचारी अग्निशामक दलाचे जवान, पोलीस व लोकप्रतिनिधी या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. रस्त्यावर उतरून काम करीत असल्यामुळे  जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी टंचाई झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाला जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू नका, असा आदेश आपण अधिकाऱयांना दिला आहे.

कोरोना बळींच्या मृतदेहाबाबत नियमांनसुसार निर्णय

कोरोनाच फैलाव राज्यात वाढत असल्यामुळे जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्या संदर्भात वाढ होणार आहे का? असा प्रश्न केला असता येत्या शनिवारी याबाबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांबाबत विचारणा केली असता याबाबतचा निर्णय कोरोनाच्या नियमानुसार घेतले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.

संचारबंदीबाबत शनिवारी घेणार निर्णय

सध्या चालू असलेल्या संचारबंदीचा सर्व संबंधितांकडून आढावा घेऊन ती पुढे वाढवायची की नाही, याचा निर्णय सरकार शनिवारी घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दरम्यान आमदार, मंत्री तसेच इतर संबंधित संचारबंदीचा कालावधी एका आठवडय़ाने वाढवावा, अशी मागणी करीत असल्याचे समोर असून ती आणखी वाढणार अशी चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहून तसेच जिल्हाधिकारी, आरोग्य खाते, व इतर संबंधितांशी संपर्क साधून बैठका घेऊन संचारबंदीचा कालावधी वाढवायचा की नाही हे ठरविले जाणार आहे.

वादळातील मृताच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत सुपूर्द

 गोव्यात झालेल्या चक्रीवादळात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे रु. 4 लाखांची मदत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केली आहे. गोव्यात चक्रीवादळाचे 3 बळी गेले असून त्यांच्या कुटुंबाला ही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे. वादळात बळी गेल्याबद्दल डॉ. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दुःख प्रकट केले असून त्यांच्या कुटुंबियांबाबत सहानुभूती दर्शविली आहे. अंजुणा बार्देश येथील शितल महादेव पाटील यांचा वादळात बळी गेला. त्यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत म्हणून रु. 4 लाखचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींकडून जिल्हाधिकाऱयांना सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्यातील जिल्हाधिकारी यांच्यात मंगळवारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती देताना सांगितले, पंतप्रधानांनी सर्व जिल्हाधिकाऱयांच्या कामाचे कौतुक केले.  जिल्हाधिकाऱयांना गरजेनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. धोरणात्मक बदल केल्याची माहिती मुख्यमंत्र्याना देण्याची सूचना पंतप्रधानांनी त्यांना दिली. स्थानिक स्तरावर प्रतिबंधक क्षेत्र (कंटेनमेंट झोन) जाहीर करून चाचण्यांची व्याप्ती वाढविणे आणि जनतेला योग्य व परिपूर्ण माहिती देणे तसेच लस घेण्यासंदर्भात जागृती करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी सूचना केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

Related Stories

अधिवेशनासाठी दोन हजारांवर प्रश्न

Patil_p

गोव्यातील प्रत्येक घराला 31 मार्च पर्यंत शौचालय, वीज व पाणी पुरवठा

Patil_p

प्रेमप्रकरणातून घडला सांतिइस्तेव्ह-माशेल इसमाचा खून

Amit Kulkarni

दिनेश गुंडूराव आज गोव्यात

Amit Kulkarni

कुडचडेतील आपले कार्यालय यापुढेही खुले राहणार

Amit Kulkarni

रेनकोट, छत्र्या मार्केटमध्ये दाखल

Patil_p