Tarun Bharat

वादळी वारा, पावसामुळे वास्को परिसरात पडझड

दिवसभर वीज पुरवठा खंडित : लोकांमध्ये वादळाची भीती

प्रतिनिधी / वास्को

वादळी वारा व जोरदार पावसामुळे वास्को परिसरात रविवारी दिवसभरात मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. कोसळणारी झाडे, घरात घुसणारे पाणी आणि खंडित वीज पुरवठय़ामुळे लोकांची दाणादाण उडाली. अग्निशामक दलाचीही पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत धावाधाव सुरुच होती. सुदैवाने रात्री उशिरापर्यंत विशेष नुकसानीची घटना कुठेही घडली नाही.

शुक्रवारी रात्रीपासूनच वास्को परिसरात वादळी वारे व जोरदार पावसामुळे पडझडीला सुरुवात झाली होती. मात्र शनिवारी दिवसभरात पावसाचे आगमन झाले नव्हते. संध्याकाळनंतर पाऊस कोसळला. मात्र या पावसाने लगेच विराम घेतला. रात्री उशिरा पुन्हा पाऊस सुरु झाला. पाऊस आणि वादळी वारा या प्रकाराने रविवारी पहाटेपर्यंत जोर धरला. रविवारी रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱयासह जोरदार पाऊस कोसळत राहिला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने दैनंदिन व्यवहारावर जास्त परिणाम झाला नाही. मात्र वादळी पावसाच्या भीतीने आणि वादळामुळे निर्माण झालेल्या पडझडीमुळे लोकांची तारांबळ उडाली. अग्निशामक दलालाही धावाधाव करावी लागली. अग्निशामक दलाने सतत व्यस्त राहून उदभवणाऱया अडचणी दूर केल्या. काही ठिकाणी पोलीस व समाज सेवकांनीही अडचणी दूर करण्यासाठी कष्ट घेतले. वीज खात्यानेही आपल्यापरीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडितच होता.

वास्कोत मोठय़ा प्रमाणात पडझड मात्र गंभीर घटना नाही

शुक्रवारी रात्री पहिल्याच वादळी वाऱयात चिखळीतील महामार्गावर गुलमोहर कोसळला होता. शनिवारी दुपारी ओरुले वास्को भागात एक माड तेथील रस्त्यावर कोसळला. शनिवारच्या दिवसभराच्या आणि मध्यरात्रीच्या विश्रांतीनंतर पुन्हा पडझडीच्या घटनांना सुरुवात झाली. अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 3 वा.पासून संध्याकाळी 6 वा.पर्यंत 75 जागांवर अग्निशामक दलाला धाव घ्यावी लागली. ही धावाधाव रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. वास्को परिसरात रविवारी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अनेक मध्यम झाडे व मोठे वृक्षही कोसळले. वास्को शहरासह हेडलॅण्ड सडा, वाडे, मेरशीस वाडे, चिखली व इतर भागात या घटना घडल्या. काही ठिकाणी घरांवर तर काही ठिकाणी वाहनांवर वृक्ष कोसळले. तर काही वृक्ष मोकळ्य़ा रस्त्यांवर कोसळले. काही घरे दुकाने व इमारतींच्या शेडचे पत्रे उडून जाण्याच्याही बऱयाच घटना घडल्या. या घटनांमध्ये किरकोळ नुकसानीच्या घटनांचा जास्त समावेश आहे. वादळी वाऱयाबरोबर जोरदार पावसानेही कहर केल्याने काही ठिकाणी घरादारापर्यंत पाणी येण्याच्याही घटना घडल्या. ठिकाठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्याने वीज पुरवठा मात्र काही ठिकाणी रात्री व पहाटेपासून तर काही ठिकाणी सकाळपासून खंडित झाला. सध्याच्या वादळाच्या तडाख्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे.

मुरगाव बंदरातून खनिजवाहून बार्जेस भरकटल्या

मुरगाव बंदरातील मोरींग डॉल्फीनवर नांगरण्यात आलेल्या दोन खनिजवाहू बार्जेस नांगर तुटून भरकटल्याने शिरदोनच्या किनाऱयाजवळ पोहोचल्या. या बार्जेसमध्ये खनिज माल नव्हता. भरकटलेल्या बार्जेसवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पाच चालकांनी केला मात्र वादळी वाऱयामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी शिरदोन किनाऱयाजवळ या बार्जेस पुन्हा नांगरुन त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या. वादळाच्या भीतीने वास्कोतील खारबीवाडा ते चिखलीतील सांत जसिंतो बेटापर्यंत नांगरण्यात आलेल्या कर्नाटकातील सुमारे 150 मासेमारी ट्रॉलर्स सर्व मच्छीमाऱयांसह सुरक्षित आहेत.

दाबोळीतील हवाई वाहतूक खंडित दरम्यान, वादळी हवामानाच परिणाम दाबोळीतील हवाई वाहतुकीवरही झाला. मुसळधार पाऊस व वादळी वाऱयामुळे दाबोळी विमानतळावरुन होणारी हवाई उड्डाणे आणि विमानाचे दाबोळीच्या धावईपट्टी उतरणेही रद्द करण्यात आले. विमानतळावरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येणाऱया, जाणाऱया सर्वच हवाई सेवा रविवारी रद्द करण्यात आल्या.

Related Stories

राज्यातील 175 पंचायतींवर प्रशासक

Amit Kulkarni

म्हादई प्रश्नावर गोव्यासाठी हा ‘सेटबॅक’ : सरदेसाई

Amit Kulkarni

ग्रामस्थ-सरकार यांच्यातील दुवा बना : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

क्रिकेटपटूंनी वैयक्तिक आणि सांघिक ध्येयांवर लक्ष केंद्रित ठेवावेः भास्कर पिल्ले

Patil_p

वाहने चोरणारी टोळी गजाआड

Patil_p

उसळणाऱया गर्दीमुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती

Patil_p
error: Content is protected !!