Tarun Bharat

वारंवार बारगळणाऱया अविश्वास ठरावांचे सत्तानाटय़

Advertisements

प्रतिनिधी/ सांखळी

राज्यात भाजपची सत्ता असूनही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील सांखळी पालिका भाजप आपल्या ताब्यात ठेऊ शकत नाहीत या वैफल्यग्रस्ततेतून सत्ताधारी गटावर वारंवार अविश्वास ठराव दाखल करण्यात येत आहेत. मात्र प्रत्येकवेळी ते बारगळणारेच ठरत आहेत, ही भाजपसाठी मोठी शोकांतिका ठरली आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी व्यक्त केली आहे.

भाजपच्या नगरसेवकांनी अशाप्रकारे अविश्वासाचे खेळ खेळण्यात वेळ घालविण्यापेक्षा सांखळीच्या विकासाकडे लक्ष द्यावे, जनतेला आमच्याकडून अपेक्षित असलेला विकास करण्यावर भर द्यावा, असे आवाहन यांनी केले आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव जिंकल्यानंतर काल ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात सत्ता कुणाचीही असो. परंतु परमेश्वर आमच्या पाठीशी आहे. याचा प्रत्यय दोनवेळा विरोधकांनी घेतलेला आहे. अविश्वास दाखल करणाऱयांना दोन्ही वेळा शरमिंदा व्हावे लागले आहे. त्यातून जनतेच्या नजरेतूनही ते उतरले आहेत. या नगरसेवकांचा बोलविता धनी कोण आहे आणि तो वारंवार कसा तोंडघशी पडत आहे ते आता सर्वश्रूत झाले आहे. अविश्वास ठरावावरील चर्चेपूर्वीच एका नगरसेवकास कोरोनाची बाधा होणे व ठराव बारगळणे या प्रकारातून त्या गटात दैवी आशीर्वाद नसल्याचे स्पष्ट होत आहे. कपट हेतूने आखलेले कारस्थान देवालासुद्धा मान्य नसल्याचेही याद्वारे स्पष्ट झाले आहे, असेही पार्सेकर पुढे म्हणाले.

सांखळी पालिका अस्थिर करण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वी झाले. कित्येक आमिषेही दाखविण्यात आली. परंतु आम्ही एकसंघ आहोत. त्यांच्या आमिषांना भूलणारा, बळी पडणारा एकही सदस्य आमच्यात नाही. त्यामुळे भाजपने यापुढे ही पालिका आपल्या ताब्यात येईल अशी स्वप्ने पाहू नये. त्या फंदातही पडू नये. यश न येणारे प्रयत्न करून स्वतःचा आणि आमचाही वेळ वाया घालविण्यापेक्षा शक्य असेल तर सांखळीच्या विकासाकडे लक्ष द्यावे. विधानसभा निवडणुकीस केवळ सहा महिने बाकी आहेत. निदान त्या शिल्लक काळात तरी सांखळीचा आणि उर्वरित मतदारसंघाचा थोडातरी विकास करण्याकडे भाजपने लक्ष द्यावे, असा सल्ला पार्सेकर यांनी दिला आहे.

13 नगरसेवकांच्या या पालिकेत सत्ताधारी गटात नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ, धर्मेश सगलानी, कुंदा माडकर, राजेंद्र आमशेकर, ज्योती ब्लेगन व अंसिरा खान यांचा समावेश आहे तर भाजप गटात शुभदा सावईकर, रश्मी देसाई, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर व ब्रह्मा देसाई हे सहा नगरसेवक आहेत. या विरोधकांनी यापूर्वी उपनगराध्यक्षांवर अविश्वास दाखल केला होता. गत शुक्रवारी त्यावर चर्चा होणार होती. परंतु एक सदस्य ऐनवेळी आजारी पडल्यामुळे एकही विरोधी नगरसेवक उपस्थित राहिला नाही. परिणामी अविश्वास ठराव बारगळला.

त्याच प्रकाराची पुनरावृत्ती दुसऱया दिवशी झाली. नगराध्यक्ष पार्सेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या ठरावावर शनिवारी चर्चा होणार होती. त्यावेळीही एकही विरोधक उपस्थित न राहिल्याने तोही ठराव बारगळला. हे सर्व परमेश्वरी संकेत आहेत. विरोधकांसाठी सांखळीश्वराचा इशारा आहे, त्याची चेष्टा केल्यास परिणाम भोगावे लागतील. त्याचबरोबर सरकार आमची जेवढी सतावणूक करेल तेवढेच आम्ही जास्त कठोर बनणार आहोत, असेही पार्सेकर म्हणाले.

Related Stories

गोवा डेअरीच्या 12 जागांसाठी तब्बल 38 उमेदवार रिंगणात

Amit Kulkarni

किनारी व्यवस्थापन आराखडय़ात गंभीर चुका

Amit Kulkarni

आठव्या विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य शपथबद्ध

Amit Kulkarni

माटोळी बाजार भरण्याचे काणकावासीयांकडून स्वागत

Patil_p

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंद

Patil_p

मडगावात उद्या स्केच प्रदर्शन

Amit Kulkarni
error: Content is protected !!