Tarun Bharat

वारणेचा इथेनॉल निर्मितीत राज्यात उच्चांक : वीजनिर्मितीतून ७ कोटी युनिटस निर्यात

चेअरमन आ. विनय कोरे यांची माहिती

वारणानगर / प्रतिनिधी

येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये कमी क्षमता असणाऱ्या इथेनॉल प्रकल्पात प्रतिदिनी १ लाख १ हजार लिटरचे महाराष्ट्रात उच्चांकी उत्पादन घेतले असून वीजनिर्मिती प्रकल्पातून ७ कोटी युनिटस निर्यातीचा टप्पा पार करणारा वारणा साखर कारखाना हा महाराष्ट्रात अव्वल ठरला असल्याची माहिती वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी आमदार कोरे म्हणाले, देशात साखरेचे प्रचंड उत्पादन होत असल्याने केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करावी यासाठी प्रतिलिटर ६३ रुपये ४५ पैसे हा दर ऑईल कंपन्यांनी कारखान्यांना दिला. त्याचा फायदा घेत वारणाने चालू गळीत हंगामात ९२ लाख लिटरची ऑर्डर घेतली होती वारणेची प्रतिदिनी स्थापित ६० हजार लिटर उत्पादन क्षमता असताना आहे. त्या प्राप्त परिस्थीतीवर चांगले व्यवस्थापन करून गेले आठ दिवस प्रतिदिन ९० हजार लिटर पेक्षा अधिक उत्पादन केले. आज तब्बल १ लाख १ हजार लीटरचे उच्चांकी उत्पादन करण्याचा इतिहास घडविला आहे. हंगाम समाप्तीपर्यंत १ कोटी ४० लाख लिटरर्स इथेनॉल उत्पादनाचा टप्पा पार करण्याचा मानस आहे. या कामगिरीमुळे ६० हजार क्षमता असणाऱ्या प्रकल्पात उच्चांकी उत्पादन करणारा महाराष्ट्रातील पहिला इथेनॉल प्रकल्प ठरला असल्याचे श्री.कोरे यांनी सांगितले.

वारणेने महाराष्ट्रात वीजनिर्मिती व निर्यातीत उच्चांकी कामगिरी या गळीत हंगामात केली असून साखर उद्योग क्षेत्रात उच्चांकी वीज निर्मीतीत वारणा कारखाना अव्वल ठरला आहे. या चालू गळीत हंगामात ७ कोटी युनिट्स वीज निर्यातीचा टप्पा पूर्ण केला असून गळीत हंगाम व त्यानंतर सुमारे १० कोटी युनिटस निर्यातीचा टप्पा पूर्ण करण्याचा मानस आहे.

या प्रकल्पात असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व यंत्रणेच्या जोरावर तांत्रिक क्षमता अचूक साधून १ टन ऊसापासून उच्चांकी वीजनिर्मिती व निर्यात करणारा वारणा हा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना असल्याचे आमदार कोरे यांनी सांगितले. वारणाने ३० कोटी रूपये हातात शिल्लक ठेवून चालू गळीत हंगामाचा प्रारंभ केला होता. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी आणि वाहतूकदार यांची गेल्या पंधरावड्यापर्यंतची उस बीले वेळेत आदा केलेली आहेत.
वारणा हा सहकारातील आदर्श कारखाना आहे आणि तो राहणार आहे वारणेमुळे सर्व घटकांची प्रगती झाली वारणा कुटुंबाचे हे नाते यापूढेही जपूया व वारणा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असे आवाहन कोरे यांनी केले. या पत्रकार परिषदेस तात्यासाहेब कोरे नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन.एच. पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, आदी उपस्थित होते.

Related Stories

विद्यापीठाचा विद्यार्थी न्यायमुर्ती अभिमानास्पद गोष्ट

Kalyani Amanagi

महाविकास आघाडीची सहा मते फुटली, शिवसेनेला कात्रजचा घाट, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी

Rahul Gadkar

भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट, भारताचे 4, चीनचे 7 जवान किरकोळ जखमी

datta jadhav

दोन भारतीय मच्छीमार नौकेवरील १६ खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात, ७ जण पालघरमधील

Archana Banage

नाशिक : शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर जिल्हा रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

कोल्हापूर : नेसरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Archana Banage