Tarun Bharat

वाळके खून प्रकरणी तिघांना बिहारमधून अटक

प्रतिनिधी/ पणजी

मडगाव येथील ज्वेलर स्वप्नील वाळके खून प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) पोलिसांनी बेगूसराय बिहार येथे जाऊन तेथील पोलिसांच्या सहकार्याने तिघांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेतला असून लवकरच संशयितांसह पोलीस गोव्यात दाखल होतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी काल गुरुवारी दिली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये सनी कुमार (मुंगेरीगंज बिहार), राहुल कुमार (विष्णूपूर बिहार) तसेच कुंदन कुमार (बेगुसराय बिहार) यांचा समावेश आहे. वाळके खून प्रकरणात ज्या पिस्तूलाचा वापर झाला होता ते पिस्तूल बिहारमधून आणले होते, असे संशयित मुस्तपा यांनी उलटतपासणीच्या दरम्यान उघड केले होते. बेकायदेशीर पिस्तुलांचा पुरवठा करणाऱयांचा पत्ता मिळाल्यावर सीआयडी पोलिसांनी आपला मोर्चा बिहारला वळविला होता. तेथील पोलिसांच्या सहकार्याने संशयितांना अटक केली आहे.

संशयितांना घेऊन लवकरच पोलीस गोव्यात

संशयित सनी कुमार याला मंगळवारी तो राहत असलेल्या ठिणावरूनच उचलले होते. नंतर बुधवारी राहुल कुमार याला अटक केली. तिसरा संशयित कुंदन कुमार याला बेगूसराय (बिहार) पोलिसांनी बेकायदेशीर मद्य व्यवसायात अटक केली. वाळके खून प्रकरणात कुंदन कुमार याचा समावेश असल्याने गोवा पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. सीआयडी निरीक्षक फिलोमेना कॉस्त व त्यांची टीम लवकर संशय़ितांना घेऊन गोव्यात दाखल होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मडगावात 2 सप्टेंबर रोजी केला खून

मडगाव येथे 2 सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या झालेल्या भयानक हल्ल्यात संशयित मुस्तफा शेख याने स्वप्नील वाळके यांच्यावर गोळी झाडून तसेच नंतर चाकूने हल्ला करून वाळके यांचा खून केला होता. अवघ्या काही तासातच गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ओंकार पाटील व एव्हेंडर रॉड्रीग्स यांना अटक केली होती तर मुख्य संशयित मुस्तफा शेख याला शरण येण्यास भाग पाडले होते.

पिस्तुलामुळे पोलिसांनी गाठले बिहार

सुरुवातील या तक्रारीचे तपासकाम मडगाव पोलीस करीत होते. मात्र लगेचच ही तक्रार गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्यासाठी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम तयार करून तपासकामाला सुरुवात करण्यात आली होती. तिन्ही संशयित पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी संशयितांची उलटतपासणी केली आणि त्यांच्याकडून बरीच माहिती मिळविली. पुरावेही गोळा केले आहेत. बिहारमध्ये जाऊन सनी कुमार, राहूल कुमार व कुंदन कुमार यांना अटक करण्यात आली.

Related Stories

आमदार अपात्रता सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही

Amit Kulkarni

चतुर्थीच्या माटोळी बाजाराला गावठी चिबुड, दोडकी यंदा कमीच

Amit Kulkarni

आठशे पर्यटकांसह क्रूझ पर्यटक जहाज मुरगाव बंदरात दाखल

Amit Kulkarni

आमदार पात्रताप्रकरणी सर्वोच न्यायालयात आव्हान

Amit Kulkarni

मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार

Patil_p

वेळसांवच्या किनाऱयावर वास्कोतील युवतीचा खून, मित्राला अटक

Omkar B