Tarun Bharat

वाळपई पोलिसांची मेळावलीत दडपशाही

आयआयटी विरोधी पत्रकार परिषद उधळवली

वाळपई प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील मेळावली येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय आयआयटी प्रकल्पाच्या विरोधाला धार चढू लागली असून दुसऱया बाजूने हा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारी पातळीवरुनही प्रयत्न सुरु झाले आहेत. काल बुधवारी सकाळी मेळावली येथील श्री जल्मी देवस्थानात परवानगी घेऊन तसेच महामारीच्या नियमांचे पालन करुन आयोजित केलेली ग्रामस्थांची पत्रकार परिषद वाळपई पोलिसांनी उधळून लावली. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेकडून झाल्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

 पत्रकार परिषद घेणाऱया चार जणांना अटक केल्याची वार्ता संपूर्ण गोव्यामध्ये पसरल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त झाला. त्यामुळे त्या चार जणांना अटक केली नसून या संदर्भात समज देऊन सोडून दिले आहे, असे स्पष्टीकरण पोलिसांकडून नंतर देण्यात आले.

अनेक भूमिपुत्र भूमिहिन होण्याची भीती

मेळावली येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय आयआयटी प्रकल्पासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून त्या परिसरात विरोधाची चळवळ सुरू आहे. या प्रकल्पामुळे अनेक भूमिपुत्रांच्या जमिनीवर गदा येणार असून अनेक भूमिपुत्र भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करून प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या भागातील शतकानुशतकांची समृद्ध जैवविविधताही मोठय़ा प्रमाणात धोक्मयात येण्याची भीती व्यक्त करून यासंदर्भात विरोध होत आहे.

नियमांचे पालन करुन पत्रकार परिषद

आयोजकांच्या सूचनेनुसार सत्तरीतील पत्रकार बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्री जल्मी देवस्थानात दाखल झाले होते. चार जणांकडून पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर बंदोबस्ताह तेथे हजर झाले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने जारी केलेल्या 144 कलमाचे उल्लंघन या पत्रकार परिषदेमुळे होणार नसल्याचे आयोजकांनी त्यांना स्पष्ट केले. मास्क, सामाजिक अंतर पाळून आयोजन केले आहे. मात्र निरीक्षकांनी त्यांना पत्रकार परिषद घेऊ शकत नसल्याचे सांगून पत्रकार परिषद उधळून लावली. एवढेच नव्हे तर आयोजकांना व सदर गावातील युवक शुभम शिवोलकर असे चार जणांना आपल्या गाडीमध्ये घालून वाळपई पोलीस स्थानकावर नेले.

पत्रकार परिषद उधळून नेले पोलीस स्थानकात

वाळपई पोलीस स्थानकावर निरीक्षकांनी त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. गोवा सरकारच्या निर्णयानुसार आयआयटी प्रकल्पाला विरोध करणे म्हणजे सरकारला विरोध होत असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे त्यांच्या जमिनीच्या संदर्भात कागदपत्रे असल्यास कायदेशीर मार्गाने यासंदर्भात लढा देण्यास सांगितले. येणाऱया काळात अशा प्रकारच्या कृतीचा आणखी प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांना पोलिसांनी दिला आणि घरी पाठविले.

यासंदर्भाची वार्ता सत्तरी व गोव्यामध्ये पसरून पत्रकार परिषद घेणाऱया चार जणांना अटक केल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावरुन पसरली. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना निरीक्षक सागर एकोस्कर यांनी सांगितले की पत्रकार परिषद घेणाऱया कुणालाही अटक करण्यात आलेली नसून त्यांना पोलीस स्थानकावर बोलावून समज देण्यात आली आहे.

मेळावली भागात तणावाची परिस्थिती

गेल्या काही दिवसापासून  प्रकल्पाच्या विरोधात या भागांमध्ये विरोधाची धार तीव्रहोऊ लागलेली आहे. बुधवारी सरकारने पोलिसांच्या बळाचा वापर करून या सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे या भागांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोव्यामध्ये पत्रकार परिषद उधळून लावण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न असावा, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये या प्रकल्पाच्या विरोधात गटवार बैठका होत असून कोणत्याही परिस्थितीत  प्रकल्पाला या ठिकाणी थारा देऊ नये, असा ग्रामस्थांचा प्रयत्न सुरु आहे.

नियमांचे पालन करुन पत्रकार परिषद : शिवोलकर

पत्रकार परिषद घेणार असल्याचे आम्ही पोलिसांना सकाळी सांगितले होते. सामाजिक अंतर राखून व चारपेक्षा जास्त जण यामध्ये सहभागी होणार नाही, याची काळजी घेण्यासही त्यांनी आम्हाला सांगितले होते. त्यानुसार पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सरकारने पोलिसी बळाचा वापर करून सर्वसामान्यांचा आवाज दडपण्याचा केलेला प्रयत्न ही खरोखरच खेदाची बाब असल्याचे शिवम शिवोलकर यांनी सांगितले. आम्ही कोणताही नियम मोडलेला नाही. कायदय़ाच्या चौकटीत राहूनच आम्ही ही चळवळ पुढे नेणार असून विजय आमचाच होणार आहे, असेही ते म्हणाले.

 या प्रकल्पाच्या माध्यमातून सरकार या भागातील जमिनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकार सत्य माहिती लपवून ठेवत असून याभागातील दहा लाख नव्हे, तर वीस लाख चौरस मीटर जमीन सरकार आपल्या ताब्यात घेणार आहे. यामुळे याभागातील अनेकांच्या जमिनी सरकारच्या घशात जाण्याची भीती   शिवोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.  याप्रकल्पाला याभागातील नागरिकांचा विरोध कायम असून या प्रकल्पाचे काम कोणत्याही परिस्थितीत सुरू होणारच नाही. यासाठी रक्ताचे पाणी करण्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

नवे साकोर्डा एसईएस स्कूलतर्फे विद्यार्थ्याच्या सोयीसाठी बससेवेचे धाडसी पाऊल

Amit Kulkarni

एफसी गोवाची प्ले-ऑफसाठी दावेदारी आता भक्कम

Amit Kulkarni

महागाईचे चटके देणाऱया भाजपाला घरी पाठवा–लुईझीन फालेरो

Amit Kulkarni

सांकवाळच्या मेटास्ट्रीपजवळ मजुराचा ट्रकचालकाकडून खून

Amit Kulkarni

शेटये कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा

Amit Kulkarni

चोरला घाटात झाडे पडल्याने वाहतूक 2 तास ठप्प

Amit Kulkarni