प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील प्रसिध्द श्री दामोदर भजनी सप्ताह यंदाही मागच्या वर्षाप्रमाणेच साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना महामारी अद्यापही ओसरलेली नसल्याने श्री दामोदर भजनी सप्ताह कार्यकारी समिती व उत्सव समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत असा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षाप्रमाणेच यंदाही कुठल्याही विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही.
उद्योजक प्रशांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सदर निर्णय घेण्यात आला. राज्यातील कोरोनाचे संकट अजुनही पूर्णपणे दूर झालेले नसल्याने यंदाचा सप्ताह मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे ठरले. सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना यंदा बगल देण्यात आलेली आहे.
श्री दामोदर भजनी सप्ताहाचे हे 122 वे वषं असून येत्या 14 ऑगस्ट रोजी यंदाचा सप्ताह साजरा होणार आहे. मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे. सप्ताहाच्या निमित्ताने दरवर्षी भरणारी फेरी यंदा दुसऱया वर्षीसुद्धा भरणार नाही. मंदिराबाहेर फुले विक्रेत्यांनाही यंदा मज्जाव केला जाणार आहे. मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही यासाठी समितीतर्फे उपजिल्हाधिकारी, मुरगाव नगरपालिका व वास्को पोलीस स्थानकाना निवेदन दिले जाणार आहे. सप्ताहाच्या दिवशी मंदिराकडे वेगवेगळय़ा भागातू विविध समाजातर्फे आणले जाणारे पारही यंदा नसतील. त्याऐवजी पार समित्यांना मंदिरामध्ये येण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. 24 तास अखंडितपणे चालणाऱया साखळी भजनाला बगल देण्यात आलेली असून त्याऐवजी वेगळय़ा पद्धतीने मंदिरामध्ये 24 तास भजन चालू ठेवण्याबाबत समिती विचार करीत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही श्री दामोदर भजनी सप्ताहाची सुरवात पांरपारिक गजर तसेच एका अभंगाने करण्यास दोन्ही समितीच्या पदाधिकाऱयांनी मान्यता दिली आहे.
यावेळी केंद्रीय समितीचे सचिव विनायक घोंगे, उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर, सचिव संतोष खोर्जुवेकर, खजिनदार विष्णू गारूडी तसेच कृष्णा सोनुर्लेकर, दामु कोचरेकर, हेमंत फडते, रघुनाथ खोबरेकर, आत्माराम नार्वेकर, वामन चोडणकर व नरेंद्र गुरव उपस्थित होते. यंदा नवीन उत्सव समितीची निवड न करता जगदीश दुर्भाटकर यांच्या नेतृत्वाखालील दोन वर्षापूर्वीचीच समिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
उत्सव समितीने जांबावलीच्या देवाचे घेतले दर्शन
दरम्यान, भजनी सप्ताह उत्सव समितीच्या पदाधिकाऱयांनी शनिवारी सायंकाळी जांबावली येथे जाऊन श्री दामोदर देवाचे दर्शन घेतले. दरवर्षी दामोदर भजनी सप्ताहापूर्वी उत्सव समिती जांबावलीला जाऊन श्री दामोदर देवाला सांगणे करून उत्सवाच्या तयारीला लागते. उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर यांच्यासह उपाध्यक्ष कृष्णा सोनुर्लेकर, सचिव संतोष खोर्जुवेकर, खजिनदार विष्णू गारूडी, कार्यकारी समितीचे सचिव विनायक घोंगे, दामू कोचरेकर, नरेंद्र गुरव, हेमंत फडते, शलैश गोवेकर, शेखर खडपकर, भरत कोलगावकर, प्रकाश गावस, नंदादीप राऊत, दीपक नार्वेकर, दाजी साळकर आदी उपस्थित होते.