Tarun Bharat

वास्कोत आजपासून दामोदर भजनी सप्ताह

प्रतिनिधी/वास्को

वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताहाला आजपासून प्रारंभ होत आहे. उद्या सोमवारी दुपारी या सप्ताह उत्सवाची सांगता होईल. या उत्सवाच्या 122 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच हा उत्सव भाविकांच्या अनुपस्थितीत होणार आहे. प्रथमच देवदर्शन व उत्साह या उत्सवात वर्ज्य असेल. उत्सव आयोजन समितीचे मोजकेच कार्यकर्ते चोवीस तासांच्या भजनी सप्ताहाचा विधी पार पाडतील.

122 वर्षांपूर्वी प्लेग साथ रोखली जावी म्हणून घातले होते साकडे

वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताहाचा उगम 122 वर्षांपूवी एका साथीच्या आजाराच्या फैलावामुळेच झाला होता. आज जशी कोरोनामुळे माणसे दगावली जात आहेत. त्याचपद्धतीने त्या काळी वास्कोत प्लेगच्या साथीमुळे माणसे दगावली जात होती. त्यामुळे समाजात भीती पसरली होती. ही रोगराई रोखली जावी या भावनेने त्या काळातील वास्कोतील धुरीणांनी जांबावलीच्या दामोदराला साकडे घातले होते. त्याच देवाने दिलेला प्रसाद वास्कोत आणण्यात आला व श्रीफळरूपी प्रसादाची पूजा -अर्चा सुरू करण्यात आली. तो दिवस म्हणजेच आजच्या दामोदर भजनी सप्ताहाचा दिवस. चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाची परंपरा त्याच दिवसापासून सुरुवात झाली होती. ही प्रथा गेल्या 122 वर्षांपासून चालू आहे. ती अखंड संस्कृती परंपरा बनलेली आहे. पूर्वीच्या काळी अल्प लोकसंख्या होती. आजच्या सारखा विकासही नव्हता. जसा-जसा सामाजिक विकास होत गेला तसा-तसा वास्कोतील हा उत्सवही उभारी घेऊ लागला. मागच्या पन्नास वर्षात या भजनी सप्ताह उत्सवाचे स्वरूप अनेकपटीने पालटले. संपूर्ण गोव्यात आणि शेजारील राज्यांतही या उत्सवाचे फार अप्रुप आहे. फार मोठय़ा उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. भजन, दिंडय़ा, गायनाच्या मैफीली हे या उत्सवाचे वैशिष्टय़. संगीत कलेचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी पडत असते. गोव्यातील जत्रोत्सवात भरणारी सर्वात मोठी फेरी या भजनी सप्ताहात भरते. लाखो लोक या उत्सवाचा आनंद घेत असतात.

मंदिराच्या समोर पत्र्यांचे कुंपण

यंदा मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर निर्बंध आलेले आहेत. या उत्सवाच्या उत्साहात यंदा प्रथमच खंड पडलेला आहे. अखंड भजनासाठी ध्वनिफितीचा आधार घेण्यात येत आहे. या उत्सवानिमित्त होणारे सर्वच कार्यक्रम रद्द करणे भाग पडलेले आहे. भाविकांचा उत्साह वाढवणारे गायन, भजन, दिंडय़ा, पार, गोपाळ काला असे काही यंदा दिसणार नाही. एवढेच नव्हे तर भाविकांना यंदा देवदर्शनही दुर्लभ झालेले आहे. मंदिराच्या समोर पत्र्यांचे कुंपण घालण्यात आलेले असून उत्सवानिमित्त कुणी गर्दी करणार नाही याची खबरदारी पोलीस घेणार आहेत. यंदाचा भजनी सप्ताह उत्सव हा केवळ धार्मिक व पारंपरिक विधी पुरताच मर्यादित असून प्रारंभापासून समाप्तीपर्यंत आयोजन समितीचे मोजकेच कार्यकर्ते साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करणार आहेत. आज दुपारी जोशी कुटुंबीयांतर्फे श्री दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून यंदाच्या भजनी सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. उद्या सोमवारी दुपारी समुद्रात श्रीफळ अर्पण करून या उत्सवाची सांगता होईल.  यंदा भाविकांना देवदर्शन घेता येणार नसल्याने आधुनिक माध्यमांच्या उपयोगाने भाविकानी घरीच राहून देवदर्शन घ्यावे, असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

वाहतूक नियम तोडणाऱया 25 हजार वाहनचालकांना दंड

Amit Kulkarni

दुहेरी नागरिकत्वाचा अहवाल पाठवा

Patil_p

’इफ्फी’ म्हणजे भाजपसाठी ’इंटरनल फिक्सिंग पॅस्टिवल’

Amit Kulkarni

ताजमहल निविदेद्वारे बांधला होता का?

Amit Kulkarni

लीज हस्तांतरप्रकरणी सरकार, खाण कंपन्यांना नोटीस

Amit Kulkarni

गोव्याचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर देशात सर्वाधिक

Amit Kulkarni