Tarun Bharat

वास्कोत मासळी मार्केटबाहेरील मासेविक्रीविरूद्ध आजपासून पालिकेची कारवाई,

प्रतिनिधी/ वास्को

वास्को शहरात विविध ठिकाणी होणारी मासे विक्री आजपासून बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मासळी मार्केट वगळता कुठेही मासे विक्री करू देणार नसल्याचे आश्वासन वास्कोचे आमदार व मुरगावच्या नगराध्यक्षांनी मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांना दिलेले असून आज मंगळवारपासून या आश्वासनाची कार्यवाही होणार आहे. कोरोना बेरोजगारीच्या पाश्वभूमीवर वास्कोत सर्वत्र मासे विक्री व्यवसाय तेजीत आलेला आहे.

मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्या महिला व या मासळी मार्केटपासून जवळच्याच अंतरावर असलेल्या गाडय़ांवरील घाऊक मासे विक्री तसेच लमाणी माहिलांकडून ठिकठिकाणी होणारी मासे विक्री हा वास्कोत सतत वादाचा विषय बनलेला आहे. अधूनमधून हा विषय उफाळून येत असतो. मागच्या सात आठ वर्षांत मासळी मार्केटमधील पारंपरीक मासे विक्रेत्या महिलांनी मार्केट बाहेरील मासे विक्रीविरूध्द अनेकदा आवाज उठवलेला आहे. निषेधार्थ मासळी मार्केट बंदही ठेवलेले आहे. पालिका मंडळ, मुख्याधिकारी व स्थानिक आमदारांवर मासे विक्रेत्यांनी या प्रश्नावर वारंवार दबाव आणलेला आहे. परंतु गाडय़ांवरील घाऊक मासे विक्री व लमाणी महिलांकडून ठिकठिकाणी होणारी मासे विक्री तात्पुरता काळ सोडल्यास कधीच बंद होऊ शकलेली नाही. मासे विक्रेत्यांना आतापर्यंत तात्पुरतेच समाधान लाभलेले आहे. गेल्या महिन्याभरात हा वाद पुन्हा उफाळून आलेला आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर ठिकठिकाणी मासे विकीला उधाण

मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोना संसर्गाने आरोग्याच्या संकटाबरोबरच आर्थिक संकटही निर्माण केले. अनेकांचे रोजगार गेल्याने कुटुंबांची आर्थिक गुजराण करण्यासाठी अनेक जण शहर व परीसरात फळ भाजी व मासे विक्री करण्यासाठी रस्त्यावर आले. आर्थिक संकट लक्षात घेऊन पालिका तसेच पोलिसांनीही अशा प्रकाराविरूध्द कधी कारवाई केली नाही. सहानुभुती लाभल्याने अशा व्यवसायांमध्ये अधिकच वाढ झाली. त्यात वास्को शहर व परीसरात मासे विक्रीचे अड्डे बऱयाच ठिकाणी निर्माण झाले. काही प्रस्थापीत मासे विक्रेत्यांनीही या संधीचा लाभ घेण्यास सुरवात केली. वास्कोतील मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांशी सतत वाद राहिलेल्या खारवीवाडा येथील गाडय़ांवरील मासे विक्रीही तेजीत आली. या विक्रेत्यांनी मोठमोठी मासळी स्वच्छ करून व कापून देण्याचीही सोय उपलब्ध केली. शिवाय शहरात सर्वत्र मासे विक्रेत्या लमाणी महिलांनीही उच्छाद मांडला. कोरोनाने निर्माण केलेल्या आर्थिक संकटामुळे ठिकठिकाणी सुरू झालेले हे व्यवसाय भलतेच वळण घेऊ लागल्याचे दिसून आले. याचा परीणाम शहरातील मासळी मार्केटमधील मासे विक्रीवर होऊ लागला. त्यामुळे मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्या महिलांनी या प्रकाराविरूध्द स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा व मुरगाव पालिकेकडे पुन्हा तक्रार करण्यास सुरवात केली होती.

मार्केटबाहेरील मासे विक्री आजपासून रोखण्याचे आश्वासन

गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नावर मार्केटमधील मासे विक्रत्यांना शांत करणाऱया  आमदारांनी व शासकीय अधिकाऱयांनी काल सोमवारी या प्रश्नावर पुन्हा बैठक घेतली. मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार कार्लुस आल्मेदा, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेवक फॅड्रीक हेन्रीक्स तसेच उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, मुख्याधिकारी अरविंद बुगडे, पोलीस निरीक्षक निलेश राणे व मासे विक्रेत्या महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. या बैठकीत वास्को शहरात मासे विकीवरून सध्या निर्माण झालेली परिस्थिती मासे विक्रेत्यांनी मांडली. व होणारा बेकायदा प्रकार रोखण्याची मागणी केली. त्यांनी आमदार कार्लुस आल्मेदा यांना यासंबंधी कारवाईची मागणी करणारे निवेदनही यावेळी सादर केले. त्यामुळे आज मंगळवारपासून वास्को शहरात मासळी मार्केट वगळता इतर कुठेही मासे विक्री करू देणार नसल्याचे आश्वासन मुरगाव पालिका नगराध्यक्ष व आमदार आल्मेदा यांनी मासे विक्रेत्यांना दिले. या आश्वासनला अनुसरून आजपासून शहरात सर्वत्र होणारी मासे विक्री रोखण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पालिकेने आतापर्यंत दाखवलेली शिथीलता आजपासून बंद होणार आहे.

पंधरा दिवसांत नवीन मासळी मार्केटसाठी पायाभरणी

गेल्या चाळीस वर्षांपासून रखडत राहिलेला मासळी मार्केटचा प्रश्न सोडवण्यासाठी मासे विक्रेत्या महिलाही सहकार्य करणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत वास्को शहरात आता असलेल्या मार्केटच्या जागी नवीन मासळी मार्केट उभारण्यासाठी पायाभरणी करण्यात येणार असून मार्केटमधील मासे विकेत्यांसाठी तात्पुरत्या काळासाठी दुसरीकडे शेड उभारून देण्यात येणार आहे. त्यासाठी आज मंगळवारी शहरात पाहणीही करण्यात येणार आहे.

Related Stories

कोरोना : 456 बाधित, 16 बळी

Amit Kulkarni

तुयेचा तन्मय खर्बे ‘तडका’ हिंदी चित्रपटात चमकला

Amit Kulkarni

‘लोकमान्य’मध्ये गुंतवणूकदारांना मोठी संधी

Omkar B

उसगांव येथे खुर्च्या-सोफा स्टील कंपनीला आग

Patil_p

गोव्यात काँग्रेसला खिंडार; ११ पैकी ८ आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश?

Archana Banage

संगीत क्षेत्रात रामनाथकर बुवांचे नाव अग्रस्थानी राहील

Amit Kulkarni