Tarun Bharat

वास्कोत शांततापूर्ण तणाव : कडक बंदोबस्त

Advertisements

श्रीराम नवमी शोभायात्रेवर दगडफेकीनंतर तणाव : पोलीस स्थानकासमोर दोन्ही गटात संघर्ष : तीन वेगवेगळे गुन्हे नोंद

प्रतिनिधी/वास्को

श्रीराम नवमीदिनी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर अज्ञाताने दगडफेक केल्याच्या कारणावरून वास्कोतील बायणा परिसरात रविवारी निर्माण झालेला तणाव निवळला आहे. पोलिसांना हे प्रकरण हाताळण्यास यश आलेले असून या प्रकरणी वास्को पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे नोंद केलेले आहेत. या गुन्हय़ांमध्ये गुंतलेल्या संशयित आरोपींची गय केली जाणार नसल्याचे वास्कोचे पोलीस उपअधीक्षक सलिम शेख यांनी म्हटले आहे.

रविवारी रात्री इस्लामपूर बायणा भागात श्रीराम नवमी शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीनंतर तेथील मशिदीजवळ वातावरण तंग बनले होते. दगडफेक केल्याच्या संशयाने त्या ठिकाणी एकाला मारहाणही झाली होती. मात्र, पोलिसांनी लगेच घटनास्थळी हजर होऊन सर्वांना पांगवल्यामुळे अनुचित प्रकार टळला होता. मात्र, इस्लामपूर भागातील नागरिकांमध्ये बराच तणाव होता. बायणा किनारी शोभायात्रेची सांगता झाल्यानंतर काही लोक आपापल्या घरी परतले. परंतु रात्री उशिरा वास्को पोलीस स्थानकासमोर दोन्ही गटातील लोक मोठय़ा संख्येने जमा झाले होते. त्यांनी परस्परांविरोधात तक्रारी नोंद केल्या आहेत. पोलिसांनीही दोन गटातील हा वाद समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न मध्यरात्रीपर्यंत केला. मात्र, मध्यरात्रीपर्यंत तणाव वाढतच गेला. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंद केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत वास्को पोलीस स्थानकासमोर जमाव होता. मात्र, आता तणाव निवळला आहे.

दगडफेक, मारहाण प्रकरणी गुन्हे नोंद

पोलीस उपअधीक्षक सलिम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोभायात्रा सुरळीतपणे पार पडावी यासाठी पूर्ण काळजी घेतली होती. वास्को शहरात अन्य धर्मियांचा कार्यक्रम होता. त्यात काही अडथळा येऊ नये यासाठी रामनवमीच्या शोभायात्रेला वेगळा मार्ग देण्यात आला होता. याच मार्गावरील इस्लामपूर भागात श्रीरामनवी शोभायात्रेवर दगडफेकीचा प्रकार घडला. त्यामुळे शोभायात्रेतील लोक त्या वस्तीत धावले. तेथे धावणाऱया एका युवकाला पकडून मारहाण केली. तेथील मशिदीसमोर तणाव निर्माण झाला.

गुन्हय़ांमध्ये गुंतलेल्या सर्वांवर कारवाई होणार

अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली. रात्री उशिरा दगडफेक प्रकरणी तक्रार नोंद झाली. तसेच यात्रेच्या सांगतेनंतर आपल्या घरी परतताना त्याला मारहाण झाल्याची तक्रारही नोंद झालेली आहे. शिवाय मशिदीसमोर जमाव करून गोंधळ घालून नमाज पठणात व्यत्यय आणल्याप्रकरणीही तक्रार आल्याने पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. या गुन्हय़ांमध्ये जे जे लोक गुंतलेले आहेत त्या सर्वांना अटक करण्यात येईल. त्यासाठी सीसीटीव्ही व अन्य साधनांचा आधार घेतला जाईल. कुणाचीच गय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेकडे तडजोड केली जाणार नाही. सर्वावर कारवाई होईल असे उपअधीक्षक सलिम शेख यांनी म्हटले आहे.

पोलीस तपास करून योग्य ती कारवाई करतील : आमदार साळकर

श्रीरामनवमी शोभायात्रेवर दगडफेकीची घटना घडल्याने रविवारी रात्री तणाव निर्माण झाल्याने वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर तसेच माजीमंत्री जुझे फिलीप डिसोजा व अन्य नेते पोलीस स्थानकावर दाखल झाले होते. आमदार दाजी साळकर यांनी घडलेल्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी हाती घेतलेला असल्याचे स्पष्ट करून पोलीस योग्य ती कारवाई करतील. तपास होण्यापूर्वीच अधिक बोलणे योग्य होणार नाही. दोन्हीकडच्या तक्रारींची पडताळणी करून पोलिस आरोपींना शोधून काढतील. गोव्यात असे प्रकार कधी घडलेले नाहीत व यापुढेही घडू नयेत, असे आमदार दाजी साळकर म्हणाले.

नेत्यांकडून बायणातील घटनेचा निषेध

गोवा प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नझीर खान यांनी निष्प्पाप व अपंग मुलाला मारहाण करण्याच्या घटनेचा निषेध केला आहे. दगडफेक झाली असेल किंवा नसेल. परंतु नाहक कुणाला मारहाण करणे योग्य नव्हे. पोलिसांनी या प्रकरणात गुंतलेल्या संशयितांविरूध्द कडक कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

तेढ निर्माणाचे प्रयत्न खपवून घेणार नाही : फळदेसाइ

बायणा येथे रामनवमीनिमित्त हिंदू बांधवांनी काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करून  समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही धर्मांध लोकांनी केला आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही असे राष्ट्रवादी बजरंग दल गोवाचे प्रमुख नितीन फळदेसाई यांनी म्हटले आहे. मिरवणूक शांततेत सुरू असताना दगडफेक करून दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. हिंदू बांधवांच्या संयमामुळे तो प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरला. या समाजविघातक प्रयत्नाचा आम्ही कडक शब्दात निषेध नोंदवत आहोत असेही फळदेसाई यांनी म्हटले आहे.

रामनवमी शोभायात्रेवर दगडफेक झालीच नाही : शेख बशीर अहमद

शोभायात्रेवर दगडफेक झालीच नसल्याचा दावा अखिल गोवा मुस्लीम जमात संघटनेचे अध्यक्ष शेख बशीर अहमद यांनी केला आहे. शोभायात्रेवरील दगडफेकीच्या निमित्ताने यात्रेतील जमावाने बायणा इस्लामपूर येथील मशिदीसमोर हैदोस घातला, असे सांगून त्यांनी संघटनेतर्फे निषेध केला आहे.

रविवारी रात्री बायणा ईस्लामपूर भागात घडलेल्या घटनेसंबंधी पत्रकार परिषदेत बोलताना शेख बशीर अहमद यांनी सांगितले की गोवा राज्य शांततेसाठी ओळखले जाते. इथल्या लोकांना शांती प्रीय आहे. मात्र, काही बाहेरील लोक इथली शांतता बिघडवू पाहत आहेत. रविवारी रात्री या लोकांनी मशिदीसमोर येऊन हैदोस घातला. नमाजाच्या वेळी व्यत्यय आणला. अल्पवयीन मुलाला नाहक मारहाण करण्यात आली. त्यांच्याविरूध्द कडक कारवाई व्हायलाच हवी. रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक झाली ही अफवा आहे. या यात्रेचा मार्ग का बदलला, हेसुध्दा आश्चर्यकारक आहे. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

मुस्लीम समाज संघटनेचे पदाधिकारी नियाजी शेख, रियाज कद्री व अब्दुल वहाब यावेळी उपस्थित होते. नियाजी शेख यांनी काही गोव्याबाहेरील लोक इथली शांतता व भाईचारा बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. समाजमाध्यमातूनही गैर प्रचार होत असल्याचे ते म्हणाले. मात्र, इथल्या पोलीस व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून तेच या प्रकरणाचा योग्य तपास करतील असे त्यांनी नमूद केले. रियाज कद्री यांनी गोव्यात असा प्रकार प्रथमच घडलेला असल्याचे सांगून गोव्यात आता चुकीच्या गोष्टी होऊ लागल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्यात असे प्रकार घडू नयेत. गोव्याची शांती बिघडू नये. भाईचारा कायम राहावा असे आम्हाला वाटते असे कद्री म्हणाले.

Related Stories

खनीज वाहूक ट्रकांना मिळणात सरकारी कर सवलत

Amit Kulkarni

सारमानस येथे फेरीबोटीतून वृध्द मांडवीत कोसळला

Patil_p

लोकांचा विश्वासघात करण्याची ताकद माझ्यात नाही

Amit Kulkarni

कुडचडेवासियांचा स्वाभिमान जागा झाल्याचे निकालातून स्पष्ट

Amit Kulkarni

वाळपई नगरपालिकेची आर्थिक कसरत

Amit Kulkarni

‘हाऊज बिल्डींग ऍडवान्स’ विषयावर गोवा फॉरवर्डचा लेखा संचालकांना घेराव

Patil_p
error: Content is protected !!