Tarun Bharat

वास्को खारवीवाडा भागात अतिक्रमणांविरूध्द पालिकेची कारवाई, स्थानिकांकडून हंगामा, कारवाईला आक्षेप

प्रतिनिधी /वास्को

वास्को खारवीवाडा भागातील अठरा अतिक्रमणांविरूध्द मुरगाव पालिकेने बुधवारी कारवाई सुरू केली असता, या भागात मोठा हंगामा झाला. स्थानिक लोकांनी या कारवाईला आक्षेप घेतला. पालिकेला ही कारवाई अर्ध्यावरच आटोपती घ्यावी लागली. आमदार संकल्प आमोणकर यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करून सदर अतिक्रमणे वाचवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

खारवीवाडा किनाऱयाजवळील रस्त्याच्या बाजुला व रस्त्यापासून दूर असलेल्या एकूण 18 घरांच्या अतिक्रमणांविरूध्द पालिकेने बुधवारी दुपारी ही कारवाई हाती घेतली होती. 7 घरांविरूध्दची कारवाई पालिकेने पूर्ण केली. या कारवाई दरम्यान स्थानिक घरमालक व इतरांनी बराच हंगामा केला. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करून ती रोखण्याची मागणी त्यांनी केली. आमदार संकल्प आमोणकर तसेच माजी महसुलमंत्री जुझे फिलीप डिसोजा घटनास्थळी हजर झाले. त्यांनी यावेळी कारवाईबाबत नाराजी व्यक्त करून योग्य तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली.

उपलब्ध माहितीनुसार सदर 18 घरांविरूध्द कॅप्टन ऑफ पोर्टचीही तक्रार होती. काही खासगी जमीनीवरही अतिक्रमण झालेले आहे. न्यायालयाने या अतिक्रमणांविरूध्द निर्णय देताना घरांचा अतिक्रमीत भाग पाडण्याचा आदेश दिलेला आहे. मात्र, ही कारवाई कधी होईल हे लोकांना माहित नव्हते. कारवाईसंबंधी घरमालकांना नोटीसाही देण्यात आलेल्या नव्हत्या. तरी काही लोकांनी आपला अतिक्रमीत भाग पाडण्याची तयारी स्वतःच केली होती. परंतु काल बुधवारी दुपारी अचानक पालिकेचे कामगार पोकलीनसह या कारवाईसाठी हजर झाले व त्यांनी घरांचा भाग पाडण्यास सुरवातही केली. त्यामुळे या भागात गोंधळ माजण्यास सुरवात झाली. या कारवाईसाठी मोठय़ा संख्येने पोलीस संरक्षणही देण्यात आले होते. त्यामुळे 18 पैकी 7 अतिक्रमणे पाडणेही पालिका कामगारांना शक्य झाले. तर इतर अतिक्रमणे तात्पुरत्या काळासाठी वाचलेली आहेत. या अतिक्रमणांविरूध्दच्या कारवाईसंबंधी स्थानिक लोक पालिका मुख्याधिकाऱयांशी चर्चा करणार आहेत.

या कारवाईसंबंधी माहिती मिळताच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर घटनास्थळी हजर झाले. त्यांनी या कारवाईसंबंधी नाराजी व्यक्त केली. कारवाई करण्यात येत असलेली घरे ही मच्छीमारांची घरे असून ती वाचवण्याची मागणी आमोणकर यांनी केली. अद्याप नवीन सरकार स्थापन झालेले नाही. मात्र, मच्छीमारांना गोव्यात सर्वत्र त्रास होऊ लागलेला आहे. खारवीवाडय़ावरील घरांच्या कारवाईच्या मागे एमपीटीच असून सरकार आणि पालिकेचेही त्यांना सहकार्य असल्याचे आमदार आमोणकर यांनी म्हटले आहे. एमपीटीपासून सबंध गोव्यालाच धोका असून स्थानिक लोक एमपीटीच्या कारवाया सहन करणार नसल्याचे आमदार आमोणकर यांनी म्हटले आहे. माजीमंत्री जुझे फिलीप डिसोजा यांनीही ही कारवाई अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येवर योग्य तोडगा काढावा अशी मागणी केली आहे.

Related Stories

लसीकरणात गोव्याचा पहिल्या तीन राज्यात समावेश

Amit Kulkarni

गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार

Patil_p

खारफुटी संहाराची गंभीर दखल

Amit Kulkarni

पंक्चरमुळे लॉकडाऊन ऑक्सिजनवाहू टॅकरला गावकरने दिला मदतीचा हात

Amit Kulkarni

फातोडर्य़ात आज ओडिशा एफसीची लढत फॉर्ममधील हैदराबादशी

Amit Kulkarni

कोनाडीचे माजी पंचसदस्य मनोहर आंबेकर यांचे निधन

Omkar B