Tarun Bharat

वाहतूक पोलिसांना पावत्या फाडण्याचे टार्गेट

प्रतिनिधी/ सातारा

सध्या सातारा शहर व परिसरात वाहतूक पोलिसांनी गाडय़ा तपासण्यांची मोहीम तेज केलीय. मात्र ती तशी करण्याचे नेमके कारण पोलिसांकडे नाही. तरीही नाक्यानाक्यावर वाहतूक पोलीस दुचाकी, चारचाकी गाडय़ा अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची पाहणी करत आहेत. काही नसले की दंड ओघाने आलाच. मात्र यामध्ये नागरिकांचा वेळ वाया जात आहे आणि दंड भरावा लागल्याची चीडही मनात रहात आहे. मात्र वाहतूक पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांनीच दररोज 100 तरी पावत्या फाटल्याच पाहिजेत असे टार्गेट दिले असल्याची माहिती समोर येत असून हा प्रकार तातडीने बंद करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

एखाद्या वाहनचालकाने रस्त्यांच्या नियमांची पायमल्ली केली तर त्याला अडवून त्याची चौकशी करणे, त्याला दंड करणे हे सर्व ठीक आहे. मात्र सध्या सातारा शहरात तुम्ही दुचाकी, चारचाकी घेवून जात असला आणि चौकात वाहतूक पोलीस असले तर तुम्हाला ते नक्कीच अडवणार. मग तुम्ही नियम मोडलेला असो वा नसो. त्यांनी शिट्टी मारली की थांबायचे. रस्त्याच्या कडेला गाडी घ्यायची आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. एखादे देखील कागदपत्र जवळ नसले की गुपचूप गुन्हेगारासारखा दंड भरायचा आणि चरफडत तुमची कामे करण्यास निघून जायचे असा प्रकार सध्या साताऱयात सुरु आहे.

पोवईनाका, बसस्थानक परिसर, राधिका रोड चौक, मोळाचा ओढा, बाँबे रेस्टारंट, अंजठा चौक, जिल्हा परिषद चौक या ठिकाणी सध्या सातारकर हा प्रकार अनुभवत आहेत. सर्वच वाहनधारक आपल्या कामाच्या गडबडीत चाललेले असतात. मात्र त्यांना अडवून वाहतूक पोलीस सध्या वेठीसच धरत आहेत. वाहनचालकाने कोणतेही चूक केलेली नसते. रस्त्याचे नियम मोडलेले नसतात मात्र केवळ वाहतूक पोलीस थांब म्हणत आहेत ना ? मग संपले. थांबायचे आणि पुढचे सगळे सोसायचे असा हा सर्व प्रकार सुरु आहे.

वास्तविक रस्त्यावर त्या दर्जाचा अधिकारी तिथे उपलब्ध नसेल तर वाहतूक पोलिसांना कागदपत्रे पाहण्याचा अधिकार नाही. तुम्ही नियम मोडला असला तर दंडास पात्र आहे. पण रस्त्याचे कोणतेही नियम मोडलेले नसताना केवळ दंडात्मक कारवाई सुरु आहेत. यासाठी वाहतूक शाखेच्या वरिष्ठांनी कर्मचाऱयांना दररोज 100 तरी पावत्या फाटल्या पाहिजेत असे टार्गेट दिल्याचे सांगण्यात येत असून हा  सर्व भुर्दंड सातारकरांना सहन करावा लागत आहे.

500 रुपयांची फोडणी बसणारच

कास रस्त्यावर हॉटेल निवांतजवळ तसेच साताऱयात प्रवेश करण्यासाठी असलेल्या सर्व मार्गावर किमान चार चार वाहतूक पोलीस उभेच असतात. कास रस्त्यावर फिरायला येणाऱयांना किमान 500 रुपयांची फोडणी ठरलेलीच आहे तर महामार्गावर हेल्मेट नाही म्हणून 500 रुपये ठरलेलेच आहेत. यामध्ये त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक मशीन्स असताना वाहतूक पोलीस मात्र पावत्या फाडण्यालाच प्राधान्य देत आहेत. बर या पावत्या वाहतूक नियम मोडल्याच्या नाहीत तर मास्क लावला नाही, अर्धवट लावलाय अन हायवेला हेल्मेट असा प्रकार वाहतूक शाखा व सातारा तालुका पोलिसांकडून सुरु असल्याच्या नागरिक तक्रारी करत आहेत.

वाहतूक सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष

या टार्गेटच्या नादात वाहतूक पोलीस फक्त आलेल्या वाहनधारकास थांबवून त्याची पावती कशी फाडायची याकडे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे आजुबाजूला कोण नियम मोडून गेला. वाहतूक कोंडी झाली. कोणी हळूच सटकून टिबलसीट गेला याकडे देखील त्यांचे लक्ष नसते. कामाच्या वेळी कोणाला थांबण्यास वेळ नसल्याने काय झाले सायेब, मग हे नाय, ते नाय, अगदी शेवटी मग हेल्मेट नाय असे करत पावत्या फाडायच्या एवढास ध्यास घेवून काम सुरु आहे.

एसपीमॅडम याकडे लक्ष द्याल काय सातारकर नागरिक तसे शिस्तीत वागतात. मात्र अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी त्यांच्या नशिबी पुजलेले असते. त्यातून वाट काढत सर्वजण प्रवास करत असतात. आता बऱयापैकी डिजीटल युग असल्याने वाहनांची कागदपत्रे देखील डिजीटल झालीत पण ती अधिकार नसताना पाहण्याचा उद्योग वाहतूक पोलीस करत आहेत. त्यांना वाहतूक सुरळीत रहावी व शहरातील रस्ते सुरक्षित व्हावेत यासाठीच काम करण्याचा आदेश द्या. अन्यथा सध्या पावत्या फाडू म्हणून वाहतूक पोलिसांची ओळख आहे व झालीय ती नष्ठ केली पाहिजे.

Related Stories

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस

datta jadhav

पुणे पदवीधरसाठी रयत क्रांतीतून डॉ. चौगुले यांना उमेदवारी

Archana Banage

सातारा शहर शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे अनावरण

Patil_p

‘त्या’ खड्डयाप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

datta jadhav

आज शरद पवारसाहेब साताऱयात

Patil_p

चिंताजनक : महाराष्ट्रात ‘ब्लॅक फंगस’ चे 7,998 रुग्ण; 729 मृत्यू

Tousif Mujawar