Tarun Bharat

विजयी प्रारंभ करण्यास भारतीय महिला उत्सुक

कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी : उद्या भारताची सलामीची लढत वेल्सविरुद्ध

वृत्तसंस्था /पोश्चेफस्ट्रूम

एफआयएच कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक स्पर्धेला शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असून कर्णधार सलिमा टेटेसह तीन ऑलिम्पियन्सचा संघात समावेश असलेला भारतीय संघ विजयी प्रारंभ करण्यास सज्ज झाला आहे. भारताची सलामीची लढत शनिवारी 2 रोजी वेल्सविरुद्ध होणार आहे.

सलिमा टेटेव्यतिरिक्त मिडफिल्डर शर्मिला देवी व स्ट्रायकर लालरेमसियामी यांनी वरिष्ठ संघातून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. भारताचा ड गटात समावेश असून शनिवारी वेल्सविरुद्ध पहिला सामना झाल्यानंतर रविवारी बलाढय़ जर्मनीविरुद्ध दुसरा सामना होईल. त्यानंतर मंगळवारी शेवटचा गटसाखळी सामना मलेशियाविरुद्ध झाल्यानंतर 8 एप्रिलपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. उपांत्य सामने 10 एप्रिल रोजी व अंतिम लढत 12 एप्रिल रोजी होणार आहे. भारताने चार वेळा या स्पर्धेत भाग घेतला असून 2013 मध्ये केलेली कांस्यपदकाची कमाई ही त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. मागील आवृत्तीसाठी भारताला पात्रता मिळविता आली नव्हती. सध्याचा फॉर्म व मानांकनाचा विचार केल्यास भारतीय संघ आपल्या गटातून जर्मनीसह उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची अपेक्षा आहे. नेदरलँड्स हा आजवरचा सर्वात यशस्वी संघ ठरला असून त्यांनी तीनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्यांचा अ गटात समावेश असून विद्यमान विजेते अर्जेन्टिना गट क मध्ये आहेत. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे जवळपास सर्वच संघांना पुरेशी तयारी व आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा सराव नसल्याने ते कशी कामगिरी करतात ते पहावे लागेल.

ही स्पर्धा डिसेंबर 2021 मध्ये होणार होती. पण दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा प्रकोप झाल्यामुळे ती स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली. भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळण्यास उत्सुक झाले असून संघाच्या भावना व्यक्त करताना सलिमा टेटे म्हणाली की, खेळाडूंमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली असून या क्षणासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे. स्पर्धा लांबणीवर पडल्याच्या कालावधीचा पुरेपूर उपयोग करून घेत आम्ही उत्तम सराव केला असून येथे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास आम्ही सज्ज झालो आहोत,’ असे ती म्हणाली. 2018 मध्ये झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिलांना ऐतिहासिक रौप्यपदक मिळाले होते, सलिमा टेटे या संघाची कर्णधार होती.

येथे सहभागी झालेल्या संघात उपकर्णधार इशिका चौधरी, गोलरक्षक बिचू देवी खरिबम, बचावपटू अक्षता आबासो ढेकळे व संगीता कुमारी यांचाही समावेश आहे.

संघांची गटवारी

  • गट अ : कॅनडा, नेदरलँड्स, अमेरिका, झिम्बाब्वे
  • गट ब : इंग्लंड, आयर्लंड, द.आफ्रिका
  • गट क : अर्जेन्टिना, ऑस्ट्रिया, कोरिया, उरुग्वे
  • गट ड : भारत, जर्मनी, मलेशिया, वेल्स.

Related Stories

दिनेश कार्तिकऐवजी मॉर्गनकडे नेतृत्व सोपवा!

Patil_p

आंध्रप्रदेश, झारखंड, विदर्भ विजयी

Patil_p

फुटबॉलपटू अनिरूद्ध थापा कोरोनाबाधित

Patil_p

गांगुली यांच्यावर लवकरच दुसरी ‘अँजिओप्लॅस्टी’

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर औपचारिक विजय

Patil_p

मेरी कोम दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

Patil_p