Tarun Bharat

विजय आमचाच, आमिषाला बळी पडू नका!

Advertisements

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांचे शेतकऱयांना आवाहन

प्रतिनिधी /बेळगाव

राजकीय दबावाखाली, दडपशाही आणि हुकूमशाही करत हा रस्ता केला जात आहे. रस्ता करू दे मात्र विजय हा शेतकऱयांचाच असणार आहे. हे प्रत्येक शेतकऱयांनी ध्यानात ठेवावे. या काळात कोणत्याही आमिषाला शेतकऱयांनी बळी पडू नये. योग्य वेळ येताच रस्ता करण्यामध्ये जे सामील आहेत त्यांना धडा मिळणार आहे. फक्त सावध रहा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी केले आहे.

झिरोपॉईंट हा कोठे आहे? हे न्यायालयात दाखविणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने त्याबाबतचा आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे. मात्र त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारे आपले म्हणणे मांडले नाही किंवा कागदपत्रे हजर केली नाहीत. असे असताना अचानकपणे हा रस्ता करण्यास सुरुवात केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. हा न्यायालयाचा अवमान आहे. यामुळे भविष्यात शेतकऱयांचा विजय निश्चित आहे. मात्र एकजूट आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता शेतकऱयांनी लढा लढण्याची गरज आहे.

संपूर्ण देशाचा झिरोपॉईंट नाशिकमध्ये

देशाचा कोणत्याही प्रकारचा सर्व्हे करायचा असेल तर झिरोपॉईंटपासूनच करावा लागतो. तो झिरोपॉईंट नाशिक येथे आहे. नाशिक येथील झिरोपॉईंटप्रमाणे बेळगाव येथील झिरोपॉईंट हा बेळगाव फिश मार्केटजवळ आहे. मात्र आता नव्याने अलारवाड क्रॉसजवळ झिरोपॉईंट असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सर्व काही गौडबंगाल आहे. तेव्हा त्याविरोधातही आम्ही लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्महत्या करू नका-सुजित मुळगुंद

लोकशाहीमार्गाने आतापर्यंत शेतकऱयांनी हा लढा लढला आहे. बेकायदेशीररित्या जे कामकाज सुरू आहे ते राजकीय षडयंत्र आहे. झिरोपॉईंटबाबतही दिशाभूल करण्यात आली आहे. त्यानंतरच हा रस्ता सुरू करण्यात आला आहे. मात्र या प्रकाराकडे सरकारने का दुर्लक्ष केले आहे? याचा विचार करण्याची वेळ साऱयांवर आली आहे. काही असो मात्र शेतकऱयांनी आत्महत्या किंवा आत्मदहन करू नये, अन्यायाविरोधात एकजुटीने लढा लढण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी केले आहे.

ब्रिटिश ज्याप्रकारे देशातील काही जनतेला सामावून घेऊन आणि विश्वासात घेऊन इतर जनतेवर अन्याय करत होते, त्याचप्रकारे या सरकारने आमच्यातीलच काही जणांना घेऊन इतर गोरगरीब जनतेवर अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ब्रिटिश राजवटच सुरू असून त्याविरोधात लोकशाहीमार्गानेच लढा लढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानभरपाई एकाला तर जमीन दुसऱयांचीच!

रस्त्यात जमिनी गेलेल्या शेतकऱयांना नुकसानभरपाई नाही तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱयांना नुकसानभरपाई दिली गेली आहे. असा प्रकार सर्रास ठिकाणी घडला आहे. काही अतिउत्साही असलेल्या शेतकऱयांनी रक्कम मिळत असल्याने ती उचलली आहे आणि जमीनही त्यांची वाचली आहे. त्यामुळे ते शेतकरी नामानिराळेच आहेत. मात्र हलगा-मच्छे बायपासमध्ये ज्या शेतकऱयांची जमीन रस्त्यात गेली ते मात्र नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू असून हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस येत आहे.

अधिकारी काय करतील हे सांगता येत नाही. या रस्त्यासाठी चारवेळा नोटीफिकेशन काढण्यात आले तर रस्त्याची जागाही बदलण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱयांनी दहा वर्षांपूर्वीच रक्कम घेतली आहे. मात्र त्यांची जमीन या रस्त्यामध्ये गेलीच नाही. त्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. एका वकिलाने ही करामत केल्याचेही बोलले जात आहे. स्वतःची जमीन वाचविण्यासाठी काही जणांनी हा डावदेखील केल्याचे आता उघडकीस येत आहे.

हलगा-मच्छे बायपासमध्ये जमीन गेली आहे, त्या शेतकऱयांना नुकसानभरपाईच  मिळाली नाही. सर्व्हे करण्यामध्ये किती सावळागोंधळ झाला आहे हे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी म्हणतात अनेक शेतकऱयांना आम्ही नुकसानभरपाई दिली. मात्र नेमकी नुकसानभरपाई कोणाला दिली, हे त्यांनादेखील माहीत नाही. खरोखरच अंदाधुंदी कारभार बेळगावमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱयांना अर्ज करण्याचे आवाहन

हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. आपल्या जमिनीमध्ये जेसीबी किंवा रोलर काम करत असताना त्याचा फोटो, याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱयांचा फोटो घ्यावा व तक्रार अर्ज तयार करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे कामकाज हे बेकायदेशीर सुरू आहे. त्यामुळे आता त्याविरोधात न्यायालयीन लढा लढायचा आहे. त्यासाठी तयारी करावी लागणार आहे. प्रत्येकाने अर्ज द्यायचा आहे. राजू मरवे किंवा रमाकांत बाळेकुंद्री यांच्याकडे अर्जाद्वारे संपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हलगा-मच्छे बायपासविरोधात रयत संघटनेचे निवेदन : न्यायालयाचा अवमान करून रस्ता करणे योग्य नाही

हलगा-मच्छे बायपास सुपीक जमिनीतून केला जात आहे. शेतकऱयांच्या उभ्या पिकांतून हा रस्ता करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे नोटिफिकेशननुसार रस्ता करण्यात येत नाही. दुसऱयाच सर्व्हे क्रमांकामधून रस्ता करण्यात येत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. तेव्हा जी मनमानी सुरू आहे ती तातडीने थांबवावी आणि शेतकऱयांना जगू द्यावे, असे निवेदन रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.

पोलीस संरक्षणात न्यायालयाचा अवमान करत हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. शेतकऱयांना मारबडव, त्यांच्या कुटुंबीयांना मारबडव, एका तरुणाने पेटवून घेतले, अशा घटना घडूनही रस्ताकाम सुरू ठेवणे म्हणजे ही केवळ दडपशाही आहे. शेतकरी जगला तरच देश वाचेल. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करा आणि शेतकऱयाला जगू द्या, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

यावेळी आप्पासाहेब देसाई, मारुती कडेमनी, सुभाष धायगोंडे, नामदेव धुडूम, दुंडाप्पा पाटील, फकीर सदावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

बेंगळूर: एफएसएल लॅबमधील कर्मचार्‍याला कोरोना लागण : लॅब सील

Archana Banage

किरकोळ बाजारात काही भाज्यांच्या दरात वाढ

Patil_p

कुर्ली हालसिद्धनाथांच्या सेवेत नवीन सोन्या अश्व दाखल

Omkar B

वॉर्ड क्र.21 मध्ये स्वच्छता कर्मचाऱयांचा सत्कार

Amit Kulkarni

मानवी कवटी-हाडे प्रयोगशाळेकडे

Amit Kulkarni

कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा आजपासून सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!