Tarun Bharat

विजय पै यांचा तृणमूलला रामराम

प्रतिनिधी /पणजी

गोवा तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस विजय पै यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा सादर करून पक्षाला रामराम ठोकला. आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी पदत्याग केला. निवडणूक निकालानंतर राजीनामा देणारे ते पहिलेच उच्चपदस्थ पदाधिकारी ठरले आहेत.

पक्षाचे स्थानिक अध्यक्ष किरण कांदोळकर यांना पाठविलेल्या पत्रात श्री. पै यांनी ’मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वासहीत सरचिटणीस पदाचाही राजीनामा देत आहे’, असे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीस केवळ तीन महिने असताना गोव्यात दाखल झालेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाने मोठा गाजावजा करत संपूर्ण गोवा ढवळून काढला होता. त्यांच्या भुलभुलैयास आकर्षित होऊन अनेक प्रस्थापित राजकारणी तसेच असंख्य हवसे, गवसे, नवसे मोठय़ा प्रमाणात पक्षात दाखल झाले होते. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र गोमंतकीयांनी या सर्वांना नाकारले व पक्षाची पुरती दैनावस्था झाली.

स्वबळावर निवडणूक लढणे शक्य नसल्याची जाणीव झाल्यानंतर तृणमुलने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती केली होती. त्यात मगो पक्षाने दोन ठिकाणी विजय प्राप्त केला. तृणमुलला मात्र खातेही उघडणे शक्य झाले नाही. मगो ने आता भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर तृणमूल अस्तित्वहीन बनला आहे.

दरम्यान, काल राजीनामा दिलेले विजय पै हे पक्षाचे एक संस्थापक सदस्य होते. त्यांच्यासह यतीश नाईक, लवू मामलेदार यांनीही पक्ष गोव्यात आणण्यात महत्वाचे योगदान दिले होते. परंतु नाईक व मामलेदार यांनी निवडणुकीपूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मामलेदार यांनी त्याचे कारण नमूद करताना तृणमूल गोमंतकीयांमध्ये धार्मिक पातळीवर फूट पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. पक्ष सोडण्याबद्दल विचारले असता, ’अनेक गोष्टी खटकल्या होत्या. त्यामुळे खरे तर निवडणुकीपूर्वीच राजीनामा देणार होतो, परंतु काही दिवस वाट पाहिली’, असे पै यांनी सांगितले.

Related Stories

आपची पणजीत डेंग्यू विरोधी अनोखी मोहीम

Amit Kulkarni

कुंकळळी पालिकेच्या नगरध्यक्षांना पदावरून हटवा

Patil_p

जुने गोवेतील कचरा प्रकल्प होऊ देणार नाही

Patil_p

डिचोली तालुक्मयात नवीन 4 कोरोना रूग्ण

Patil_p

काणकोणातील फिरत्या मासेविक्रीस आक्षेप

Omkar B

गोवा डेअरीवर फळदेसाई गटाची बाजी

Amit Kulkarni
error: Content is protected !!