Tarun Bharat

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही रांगोळीचे अस्तित्व कायम

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रांगोळी-रंगांची आवक वाढली : विविध प्रकारचे छाप-साहित्य उपलब्ध

प्रतिनिधी / बेळगाव

रंगवल्ली या संस्कृत शब्दावरून रुढ झालेला शब्द म्हणजे रांगोळी. रांगोळीचा उगम कधी झाला याची फारशी माहिती नाही. परंतु रांगोळी या शब्दामागे कला, रंग, उत्सव, समाधान, पावित्र्य अशा सर्व भावना निगडीत आहेत, हे नक्की. कोणत्याही मंगलप्रसंगी, उत्सवावेळी रांगोळी घालण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. मुख्य म्हणजे आजच्या आधुनिक आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा ही कला आपले अस्तित्व टिकवून आहे.

पूर्वीच्या काळी धान्याचा व फुलांचा उपयोग करून रांगोळी काढली जात असे. प्राचीन मराठी वाङ्मयातही रांगोळीचा उल्लेख आढळून येतो. आकृती प्रधान आणि वल्लरी प्रधान हे रांगोळीचे मुख्य दोन प्रकार. बिंदू, रेखा, कोन, वर्तुळ, त्रिकोण, चौकोण अशा भूमितीच्या आकृतींचा वापर करून रांगोळी काढली जाते. दक्षिण भारत, राजस्थान, महाराष्ट्र येथे आकृती प्रधान रांगोळी काढली जाते तर फुले, पत्री, पशुपक्षी यांना महत्त्व असलेली वल्लरी प्रधान रांगोळी ओडिसा, बंगाल, बिहार येथे काढली जाते.

दररोज सकाळी घराच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळी रेखाटण्याची परंपरा आजही कायम आहे. वारानुरूप रांगोळी काढली जाते. सोमवारी कासव, मंगळवारी गणपती, बुधवारी गरुड, गुरुवारी कमळ, शुक्रवारी देवीची सुचिन्हे तर रविवारी सूर्य देवतेचे चित्र काढले जाते. रांगोळी ही केवळ एक कला नाही तर ती अभिव्यक्तीचे साधनही आहे. ठरवून घेतलेल्या चौकोणामध्ये ठिपके, रेषा, आकार, परस्परांना जोडून तयार केलेली कलाकृती म्हणजे रांगोळी होय. रांगोळी विविध स्वरुपात काढता येते. त्यासाठी विविध माध्यमही वापरले जाते. सण, उत्सव व मंगलप्रसंगी चुनखडीच्या शुभ्र चुर्णाने, तांदळाच्या पिठीने रांगोळी काढली जाते.

रांगोळीला अल्पना, मांडवा, सोनारेखा, साथीओ, मुग्गु, कोलम आणि रांगोळी अशा नावाने ओळखले जाते. प्रामुख्याने रांगोळीमध्ये निसर्ग प्रतिमांचा समावेश प्रामुख्याने दिसतो. झाड, पक्षी, पशु, चंद्र, सूर्य, तारे, फुले, पाने, शंख, चक्र, गदा, पद्म यांचा आविष्कार रांगोळीत दिसतो आणि एकप्रकारे रांगोळीशीच जवळ जाणाऱया म्हणजेच गौरी प्रतिमा रेखाटताना याचाच वापर केला जातो.

मोठय़ा रांगोळी काढण्याचे प्रमाण वाढले

अलीकडच्या काळात मोठय़ा रांगोळी काढण्याचे प्रमाण वाढले आहे. फ्लॅट संस्कृतीमध्ये घरासमोर छोटय़ाशा जागेत रांगोळी काढली जाते. परंतु रस्त्यावर मात्र संस्कार भारती रांगोळीचे प्रकार पहायला मिळतात. दिवाळीची चाहुल लागताच संध्याकाळी मोठमोठय़ा रांगोळी रेखाटल्याने रस्ते सुशोभित होतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रांगोळी आणि रंगांची आवक वाढली आहे. 10 रुपयाला तीन छोटे माप असा दर आहे. याशिवाय रांगोळी काढणे सोपे जावे यासाठी विविध प्रकारचे छाप, रांगोळीचे पेन आणि बरेचसे साहित्य उपलब्ध झाले आहे.

नोकरदार असोत किंवा गृहिणी असोत प्रत्येक महिलेला साधारणतः रांगोळी रेखाटणे आवडते. जागेनुरूप त्यांचा आकार लहान-मोठा असू शकतो. परंतु रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक आहे. ही भावना आजही कायम आहे. रांगोळीची जितकी बारीक रेष रेखाटली जाते तितकी ती गृहिणी किंवा महिला कलाकुसरीमध्ये पारंगत आहे, असेही मानले जाते.

Related Stories

रेल्वेची उलट गणती अन् प्रवाशांची फजिती!

Amit Kulkarni

ब्रह्मदेव मंदिरात चोरीचा प्रयत्न

Omkar B

कुडचीत आशा कार्यकर्त्यांवर हल्ला

Patil_p

उचगाव-बसुर्ते मार्गावर गतिरोधकाची गरज

Amit Kulkarni

कक्केरीतील ‘त्या’ खुनामागे सासऱयाचाच हात असल्याचे उघडकीस

Patil_p

संतिबस्तवाड भागात रात्री सिंगल फेज वीजपुरवठ्याची मागणी

Amit Kulkarni