वार्ताहर / पंढरपूर, तुळजापूर
वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. यामुळे श्री विठ्ठलाचे दर्शन भाविकांसाठी ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समिती सदस्यांच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
सुरुवातीच्या कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता १७ मार्च २०२० ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत भाविकांना विठ्ठलचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ नोव्हेंबर २०२० पासून भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुन्हा राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर व मंदिर समितीच्या अधिपत्याखालील पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवतांची मंदिरे ५ एप्रिल २०२१ (रात्री ८.००) ते शुक्रवार ३० एप्रिल, २०२१ (रात्री ११.५९) या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहेत.
श्री विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता मंदिरात दैनंदिन पूजा चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.


विठ्ठल मंदिराबरोबरच श्री तुळजाभवानी मंदिरातही दर्शन बंद
विठ्ठल मंदिराबरोबरच श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी रात्री आठ वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात येत असल्याचे परिपत्रक मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी प्रसिद्ध केले आहे.
दैनंदिन नित्योपचार पूजा या पुर्वी प्रमाणे महंत पुजारी व मानकर यांच्या हस्ते होणार आहेत सदर साथीच्या आजारांचे गांभीर्य विचारात घेता भाविकांची श्रीदेवीची वरील नितांत श्रद्धा इतकीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे या उद्देशाने सदरचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासन आदेशाप्रमाणे संयुक्तरीत्या घेण्यात आला आहे. भाविकांनी महाराष्ट्र शासन व माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना संसर्ग रोग मंदिर प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती केली आहे. तसेच या काळात भाविकांनी श्री देवींचे ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान मंदिर प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

