Tarun Bharat

वित्तीय तूट जून अखेरीस 18.2 टक्के

अनुमानापेक्षा अधिक होण्याची शक्यता, कोरोनाचा परिणाम

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला मोठय़ा प्रमाणात वित्तीय तुटीचा (फिस्कल डेफिसिट) मुकाबला करावा लागणार अशी शक्यता आहे. अर्थसंकल्पात वित्तीय तुटीचे अनुमान वर्षासाठी 18 टक्के ठेवण्यात आले होते. पण तेवढी तूट केवळ जूनच्या अखेरीपर्यंतच झाल्याचे आढळल्याने ती पुढे किती प्रमाणापर्यंत जाईल याची चर्चा आता आर्थिक वर्तुळात होताना दिसून येते.

वित्तीय तूट जून अखेरीस 2,74,245 कोटी रुपयांची आहे. एकंदर वर्षासाठी ती 15,06,812 कोटी रुपयांची असेल असे अनुमान सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ते याहीपेक्षा जास्त होईल, असे जूनअखेरच्या आकडेवारीवरुन वाटत आहे. मात्र वित्तीय तूट हाताबाहेर जाऊ देणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावल्याने ही तूट आली आहे.

जमाखर्चाचे गणित

जून 2021 अखेरपर्यंत केंद्र सरकारच्या तिजोरीत करउत्पन्न आणि इतर उत्पन्नांच्या माध्यमातून 5.47 लाख कोटी रुपये जमा झालेले आहेत. हे प्रमाण अनुमानित जमेच्या 27.2 टक्के आहे. यात कररुपाने मिळालेले 4.12 लाख कोटी, बिगर कर उत्पन्नातून मिळालेले 1.27 लाख कोटी, बिगर कर्ज भांडवली उत्पन्नातून मिळालेले 7,402 कोटी रुपये यांचा समावेश आहे.

याशिवाय केंद्र सरकारला विविध सरकारी आणि सार्वजनिक कंपन्यांकडून लाभांशाच्या (डिव्हीडंड) स्वरुपात 1,17,524 कोटी रुपयांची मिळकत झाली. याच्या विरुद्ध जून अखेरीपर्यंत केंद्र     सरकारने 8.21 लाख कोटी रुपये खर्च केलेले आहेत. यापैकी महसूल खात्यावर खर्च 7.10 लाख कोटी तर भांडवली खात्यावर खर्च 1.11 लाख कोटीचा झालेला आहे.

जमाखर्च हातमिळवणी

सरकारचा खर्च आणि जमा यांची हातमिळवणी योग्य प्रकारे न केल्यास केंद्र सरकारला मोठय़ा प्रमाणात कर्जाची उचल करावी लागू शकते. यातून चलनफुगवटा आणि महागाईच्या दुष्टचक्रात अर्थव्यवस्था अडकू शकते. त्यामुळे कोरोना काळात घातलेले सर्व निर्बंध लवकरात लवकर उठविण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

सकारात्मक बाजू

अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असणे ही सकारात्मक बाजू मानली जात आहे. तसेच जून मध्ये लॉकडाऊन असतानाही वस्तू-सेवा कराचे (जीएसटी) उत्पन्न 1 लाख कोटीच्या वर होते. साहजिकच अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होत असल्याचे ते लक्षण मानले गेले. जुलैची जीएसटी आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. तथापि, महत्वाच्या उद्योग क्षेत्रांमध्ये आता अधिक गजबज दिसू लागली असल्याने येत्या काही महिन्यांमध्ये सध्याचे मळभ दूर होईल अशी आशा तज्ञांना वाटते.

Related Stories

विणकरांच्या खात्यात जमा होणार 5 हजार रुपये

Patil_p

कलम 370 परत लागू होणे अशक्य!

Patil_p

बापूंचा फोटो चलनी नोटांवरून काढून टाका- तुषार गांधी

Abhijeet Khandekar

कुंभमेळ्यानंतर उत्तराखंडमध्ये कोरोनाचा कहर

Archana Banage

चीनच्या सीमेवर लष्कराचे नवे नेतृत्व

Amit Kulkarni

गुवाहाटीत 14 दिवस पूर्ण लॉकडाऊन

Patil_p
error: Content is protected !!