वृत्तसंस्था /विज्क ऍन झी (हॉलंड)
टाटा स्टील मास्टर्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथीने ग्रॅण्डमास्टर ग्रेनडेलुसचा पराभव करत पूर्ण एक गुण मिळविला तर दुसऱया एका लढतीत भारतीय ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंदला अझरबेजानच्या मॅमेडॅरोव्हकडून पराभव पत्करावा लागला.
आठव्या फेरीतील एका पटावर झालेल्या लढतीत विदित गुजराथीने ग्रेनडेलुसचा 34 व्या चालीत पराभव करत पूर्ण एक गुण वसूल केला. या विजयामुळे विदितने पाच गुणांसह अनिष गिरीसमवेत पाचव्या स्थानावर आहे. आठव्या फेरीतील अन्य एका लढतीत अझरबेजानच्या मॅमेडॅरोव्हने प्रग्यानंदचा पराभव केला. या विजयामुळे आता ग्रॅण्डमास्टर कार्लसन आणि मॅमेडॅरोव्ह हे प्रत्येकी 5.5 गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. कार्लसन आणि सॅम शेंकलँड यांच्यातील सामना 35 चालीनंतर बरोबरीत राहिला. प्रज्ञानंदने 2.5 गुणांसह आठव्या फेरीअखेर 13 वे स्थान मिळविले आहे. चॅलेंजर विभागात भारताचा ग्रॅण्डमास्टर अर्जुन इरीगेसीने आठव्या फेरीतील लढतीत डेन्मार्कच्या बिजेरीचा पराभव करत 7 गुणांसह आघाडीवर आहे. भारताच्या सुर्यशेखर गांगुली नवव्या स्थानावर आहे.