Tarun Bharat

विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे

अध्याय अकरावा

भगवंतांनी उद्धवाला सांगितलेल्या मुक्त लक्षणांचा आपण अभ्यास करत आहोत. तो जरी देहात वावरत आहे असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्याला देहभान नसतं. कारण सर्वसामान्य लोकांची आणि त्याची विचारसरणी वेगवेगळी असते. सर्वसामान्य लोकांच्या देहाच्या हालचाली काही तरी हेतू, उद्दिष्ट मनात ठेवून होत असतात पण मुक्तपुरुष स्वतःच्या विचाराने कोणतीही गोष्ट करत नसल्याने त्याला समोर काय दिसतंय, कुणाची कोणती हालचाल चाललीये याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्याने स्वतःचा देह ईश्वराचे हवाली केलेला असतो. ईश्वरी इच्छेनुसार त्याचा देह हालचाल करताना आपल्याला दिसतो पण मनाने तो एका जागी स्वस्थ बसून ईश्वर चिंतन करत असतो. तेच त्याचे सहजासन होय. इतरांना डोळय़ासमोर निरनिराळय़ा वस्तू दिसत असतात पण मुक्तपुरुषाची नजर केवळ सर्वव्यापी ईश्वराचा वेध घेत असते. तो कायम ईश्वरी अस्तित्वाचा अनुभव घेत असल्याने त्याला रोजच्यारोज ईश्वरी अनुभूतीचे स्नान घडत असते. त्यामुळे त्याला कोणत्याही तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावे लागत नाही उलट तो स्वतःच इतका पुण्यवान असतो की, तीर्थेच त्याच्या दर्शनाला धावतात. त्याला इतरेजन काहीही बोलत असले तरी त्याला केवळ त्यातून नारायण नारायण असा ध्वनी ऐकू येत असतो. तसेच वास चांगला असो वा वाईट त्याला केवळ ईश्वरी अस्तित्व जाणवत असतं. पानात वाढलेल्या पदार्थात त्याला ईश्वर दिसत असतो आणि ते पदार्थ प्रत्यक्षात न खाताच त्याला त्यांची चव जाणवत असते. त्यातून तो परमानंद अनुभवत असतो. साऱया पदार्थांच्या गोडीमध्ये जी गोडी असते, ती गोडीच तो स्वतः झालेला असतो. यामुळे तो ज्या ज्या रसाचा पदार्थ खातो, तेथे तेथे त्याला तीच गोडी अनुभवास येते. वाचताना हे वर्णन अतिशयोक्तीपूर्ण किंवा अशक्मय वाटेल पण जर योगीपुरुषांच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्यातील घटना वरील वर्णनाशी जुळणाऱया आढळतात. तुकाराम बुवांच्या कीर्तनाच्या मंडपाला लागलेली आग माणिकप्रभूंनी दूरच्या गावी असूनसुद्धा सहजी विझवली किंवा साईबाबानी दूर कोठेतरी भक्ताचे आगीत पडणारे पोर वरच्यावर उचलून धरले. अशा घटनांमागचा कार्यकारण भाव सहजी लक्षात येतो. अशा एक ना अनेक घटना सांगता येतील. या सगळय़ामागची कारणमीमांसा अशी की, ज्याप्रमाणे ईश्वर सर्वव्यापी आहे त्याप्रमाणे मुक्तपुरुषही सर्वव्यापी असतो. थोडक्मयात तो निराकार ईश्वराचं सगुण रूप होऊन वावरत असतो. त्यांच्या स्पर्शाची कमाल अशी असते की, त्यांना थंड हवा लागल्याबरोबर तिचा थंडपणाच नाहीसा होतो. किंवा उष्ण पदार्थांनी त्यांना स्पर्श केला, तर उष्णाचे उष्णत्वच नाहीसे होते. हेच त्याच्या स्पर्शाचे लक्षण होय. म्हणून कित्येक योगी महात्मे थंडी, वारा, ऊन, पाऊस या कशाकशाची पर्वा न करता वर्षानुवर्षे तपश्चर्या करत असतात. ते जेथे असतात तेथील वातावरणातील घातक पदार्थांची तीव्रता ते क्षणात नाहीशी करतात. मऊ आणि कठिण थंड आणि उष्ण या सर्वांची वैशिष्टय़े तो स्वतःच होऊन राहिलेला असल्यामुळे त्याला त्यातील त्रासदायक घटकांचे भान नसते. उन्हाळा अग्नीला भाजत नाही. थंडी हिमालयाला बाधत नाही त्याप्रमाणे त्रासदायक घटकांची माळ मुक्तांच्या गळय़ांत पडत नाही. स्पर्श, स्पर्श करणारे आणि स्पर्शाचा विषय, अशी त्रिपुटीही राहात नाही. कारण सारे तो स्वतःच होऊन राहतो. त्याला दगडातील देवही जाणवतो. भिंतीवर निरनिराळय़ा रंगांची चित्रे काढलेली असतात. तरी त्याच्यावर जेथे जेथे हात लावावा तेथे तेथे भिंतच असते त्याप्रमाणे तो जेथे जेथे स्पर्श करेल तेथे तेथे त्याला ईश्वरी अस्तित्व जाणवते. आता त्याचे बोलणे कसे असते ते पाहू. तो मोठय़ा प्रेमाने एखादी सुरस कथा सांगू लागला, अथवा लौकिक काही बोलू लागला, तर त्याच्या समाधिमुदेमध्ये अंतर पडत नाही. तो बोलत असताही त्याचे मौन मोडत नाही. बोलत असतानाही मौन न मोडणे हे सगळय़ात असून कशातही नसल्याची खूण आहे. देही असून विदेहीपणा तो हाच होय.

क्रमशः

Related Stories

या श्रमिकांनो, परत फिरा रे।।।…

Patil_p

गोऱयांपुढची ‘गोम’

Amit Kulkarni

कृषी सहकारितेची नवी व्यवस्था

Patil_p

पूर्वीं देखिला न ऐकिला

Patil_p

हवामान बदल परिषदेत आफ्रिकेतील देशांना मदत

Patil_p

तेजपूर्ण दिवाळी

Patil_p