Tarun Bharat

विद्यार्थी आधार नोंदणीत सिंधुदुर्ग अव्वल

‘स्टुडंट पोर्टल’ला 97.19 टक्के नोंदणी पूर्ण : 11 मेपर्यंतची माहिती

प्रतिनिधी / ओरोस:

शासनाच्या स्टुडंट पोर्टलवर पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड करण्याच्या प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग 97.19 टक्के कामकाजासह राज्यात अव्वल ठरला आहे. 11 मे 2021 पर्यंतच्या कामकाजाची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे.

विविध शासकिय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देता यावा. तसेच पहिली ते बारावीपर्यंत संबंधित विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून आहे किंवा नाही, याची माहिती एका क्लीकवर उपलब्ध व्हावी, यासाठी स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक नोंद करण्याचे आदेश जून 2013 मध्ये देण्यात आले होते.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांची आधार माहिती या प्रणालीवर अपलोड केली जात आहे. आधार नंबरच्या अद्ययावतीकरण कामकाजासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत प्रत्येक पंचायत समिती स्तरावर आधार नोंदणी संच उपलब्ध करून देण्यात आले होते. सद्यस्थितीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर हे काम थांबविण्यात आले आहे. मात्र तरीही 11 मे 2021 पर्यंतची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हय़ात बारावीपर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 862 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी 1 लाख 7 हजार 750 विद्यार्थ्यांची आधार नोंदणी संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. केवळ 3 हजार 112 विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी आहे. त्यामुळे एकूण 97.19 टक्के काम पूर्ण करीत सिंधुदुर्गने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक वर्धा (95.92 टक्के), तर भंडारा जिल्हा (95.91 टक्के) तृतीय क्रमांकावर आहे.

राज्यभरात 2 कोटी 15 लाख, 86 हजार 332 विद्यार्थी बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असून यापैकी 1 कोटी 64 लाख 86 हजार 668 विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. 76.38 टक्के काम झाले आहे. राज्याच्या या टक्केवारीपेक्षाही कमी टक्के काम झालेल्या जिल्हय़ातील शिक्षणाधिकारी यांना खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वांच्या प्रयत्नांचे यश – आंबोकर

जिल्हय़ातील शिक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळे तसेच सरल प्रणाली समन्वयक महेश शिंगाडे या सर्वांच्या प्रयत्नाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. केवळ 3,112 विद्यार्थी या प्रक्रियेपासून अद्याप दूर आहेत. त्याबाबतची कारण मिमांसा शोधली जाणार आहे. नेमकी अडचण काय आहे, हे लक्षात घेऊन 100 टक्के नोंदणीबाबतचे मायक्रो प्लानिंग केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

मालवणात घनकचऱयावर शास्रोक्त बायोमायनिंग प्रकल्प

NIKHIL_N

रत्नागिरीत उद्यापासून ८ दिवस कडक लॉकडाऊन

Archana Banage

संचारबंदीमुळे ‘लर्निंग फ्रॉम होम’ संकल्पना

NIKHIL_N

मंडणगड तालुकावासीय जपताहेत माणुसकी!

Patil_p

रेडय़ाच्या हल्ल्यात मालकाचा जागीच मृत्यू

Patil_p

जिल्हा रूग्णालयासमोर कारला अपघात, वृद्धा ठार

Patil_p