Tarun Bharat

विद्यार्थ्यांनी दिलेल्या राख्या सीमेवर जाऊन सैनिकांना बांधणार

Advertisements

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे उद्गार, आमोणेच्या आदर्श ग्रामात ‘एक राखी सैनिकांसाठी’ कार्यक्रम

प्रतिनिधी /काणकोण

आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱया सैनिकांना आमोणे, पैंगीण येथील विद्यार्थ्यांच्या व अन्य लोकांच्या भावना आणि विश्वास दाखविण्यासाठी आपण स्वतः सीमेवर जाऊन यंदा सैनिकांना राख्या बांधणार आहे. यापुढे पैंगीणच्या प्रत्येक घरातून एक राखी या सैनिकांसाठी तयार व्हावी, असे उद्गार हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आमोणे, पैंगीण येथील बलराम निवासी शाळेत बोलताना व्यक्त केले.

आमोणे येथील आदर्श ग्रामात बलराम शिक्षणसंस्था आणि चैतन्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एक राखी सैनिकांसाठी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल आर्लेकर उपस्थित होते. या समारंभाच्या व्यासपीठावर माजी मंत्री तसेच बलराम शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष रमेश तवडकर, निवृत्त सैनिक अनंत जोशी, श्रीस्थळचे सरपंच दत्ता गावकर, माजी सरपंच गणेश गावकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर आणि संस्थेचे सचिव जानू तवडकर उपस्थित होते.

शाखा प्रमुख ते संघ कार्यकर्ता असा प्रवास करताना भाजपात आपण ओढलो गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जबाबदारी सोपविलेली आहे ती निभावणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. कार्यकर्ता जरी स्वकर्तृत्वावर पुढे येत असला, तरी लोकांचे पाठबळ त्याला कारणीभूत ठरते. राज्यपालपद हे शोभेचे पद न मानता दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल. सैनिकी शिक्षण घेतल्यास शिस्त आणि जबाबदारी वाढत असते. म्हणून प्रत्येकाने किमान दोन वर्षे तरी सैनिकी शिक्षण घ्यायला हवे, असे मत आर्लेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

राखीमुळे प्रेम, भावना आणि आपुलकी वाढत असते. म्हणून राखी बांधून घेतल्यानंतर जबाबदारी वाढत असते, असे सांगून जोशी यांनी सर्व राख्या सीमेवरील सैनिकांना बांधल्या जातील, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आपल्या संस्थेचे ध्येय असून आपल्या शिक्षणसंस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रूजावी यासाठी मागच्या सात वर्षांपासून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे रमेश तवडकर यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सुपूर्द

राज्यपालपदी नेमणूक झाल्याबद्दल यावेळी आर्लेकर यांचा रमेश तवडकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. समई प्रज्वलित करून आणि भारतमातेच्या तसबिरीला पुष्पमाला अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यालयातील गानवृंदाने स्वागतगीत सादर केले. बलराम शिक्षणसंस्थेच्या बलराम निवासी शाळा, बलराम डे केअर, बलराम उ. मा. विद्यालय, अन्य प्राथमिक शाळा, चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय, श्री मल्लिकार्जुन चेतन मंजू देसाई महाविद्यालय, सेंट सॅबेस्त्यांव हायस्कूल, मोखर्ड येथील विशेष मुलांची शाळा, सरकारी विद्यालय, सादोळशे आणि तालुक्यातील अन्य शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या यावेळी राज्यपाल आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

त्यापूर्वी बलराम शिक्षणसंस्थेतील शिक्षिकांनी आर्लेकर, तवडकर, जोशी तसेच व्यासपीठावरील अन्य मान्यवरांना राख्या बांधल्या. सविता तवडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन स्वाती नाईक आणि गीता गावकर यांनी केले. तर जानू तवडकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला काणकोण तालुक्याच्या विविध भागांतून आर्लेकर यांचे समर्थक उपस्थित होते. राज्यपालपदी वर्णी लागल्यानंतर ते पहिल्यांदाच या मतदारसंघात आले होते. त्यामुळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी आर्लेकर यांनी श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई आणि अन्य सदस्यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

Related Stories

दर आठवडय़ाला शाळांचे मूल्यांकन

Patil_p

विकास, रोजगारासाठी काँग्रेसला विजयी करा

Patil_p

प्रतिभा, महीमा जातीच्या हळद,आल्याच्या लागवडीने सत्तरी तालुक्मयातील मळे फुलणार

Amit Kulkarni

मंत्री काब्राल यांच्याकडून अभियंत्यांची कानउघडणी

Amit Kulkarni

म्हापसा वासीयांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला- सुधीर कांदोळकर

Amit Kulkarni

साबांखा मंत्र्यांचा कंत्राटदाराला दणका

Omkar B
error: Content is protected !!