Tarun Bharat

विधानपरिषद निवडणुकीत भाजप, काँग्रेस समबल

दोन्ही पक्षांना प्रत्येकी 11 तर निजदला केवळ दोन जागांवर विजय

प्रतिनिधी/ बेंगळूर

तिन्ही पक्षांना प्रतिष्ठेची असलेल्या विधानपरिषदेच्या 25 जागांवरील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असलेल्या या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 11 जागा मिळाल्या आहेत. तर निजदला 2 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपला काठावर बहुमत हुकले आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी 20 आणि निजदचे 6 तसेच इतर आणि अपक्ष उमेदवार मिळून 90 जण रिंगणात होते.

याआधी रिक्त झालेल्या 25 जागांमध्ये भाजपच्या 6, काँग्रेसच्या 14, निजदच्या 4 आणि एक अपक्ष सदस्याचा समावेश होता. निवडणुकीत भाजपने 11 जागा पटकावत विधानपरिषदेतील संख्याबळात 5 ने भर घातली आहे. तर काँग्रेसला तीन जागा गमवाव्या लागल्या असून 11 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर निजदला 2 जागांवर विजय मिळविता आला. तर लखन जारकीहोळी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

भाजप बहुमताच्या उंबरठय़ावर

75 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानपरिषदेत बहुमतासाठी 38 हा जादुई आकडा आहे. भाजपने या निवडणुकीत 11 जागा मिळविल्याने या पक्षाची विधानपरिषदेतील सदस्यसंख्या 37 इतकी झाली आहे. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यात हा पक्ष अपयशी ठरला आहे. तर काँग्रेसचे विधानपरिषदेतील सदस्यबळ 29 वरून 26 पर्यंत तर निजदचे सदस्यबळ 12 वरून 10 पर्यंत खाली आले आहे.

राज्यातील बेळगाव-चिकोडी, उडुपी-मंगळूर, म्हैसूर-चामराजनगर, विजापूर-बागलकोट, हुबळी-धारवाड या द्विसदस्यीय मतदारसंघांमध्येही निवडणूक झाली होती. यापैकी बेळगाव-चिकोडी आणि म्हैसूर-चामराजनगर मतदारसंघ वगळता उर्वरित ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला आहे. तर बेळगाव-चिकोडीत भाजपचे महांतेश कवटगीमठ यांना पराभूत व्हावे लागले असून काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. तर म्हैसूर-चामराजनगरमध्ये अटीतटीच्या लढतीत निजद उमेदवार मंजेगौडा यांनी भाजप उमेदवाराला शह दिला आहे. येथे काँग्रेस उमेदवाराला प्रथम प्राधान्याची तर निजद उमेदवाराला द्वितीय प्राधान्याची मते मिळाली आहेत.

हासन, बेंगळूर शहर, चित्रदुर्गसह यापूर्वी काँग्रेसकडे असणाऱया जागा भाजपने मिळविल्या असल्या तरी तुमकूर, धारवाड, कोलारसह इतर ठिकाणी भाजपजवळ असणाऱया जागा काँग्रेसने मिळविल्या आहेत. काँग्रेसला दणका देण्यासाठी निजदने भाजपला अनेक ठिकाणी छुपा पाठिंबा दिला होता. तथापि, हा डाव निजदवर बुमरँगप्रमाणे उलटला आहे.

जुने म्हैसूर भागात निजदला दणका

जुने म्हैसूर भाग निजदचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे निजदश्रेष्ठींनी सावध भूमिका घेत या भागातच आपले उमेदवार उभे केले होते. तथापि, हासन आणि म्हैसूर-चामराजनगर वगळता कोठेही या पक्षाचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. मागीलवेळी तुमकूर, म्हैसूर, कोलार, मंडय़ा या जिल्हय़ांमध्ये निजदचे उमेदवार विधानपरिषदेवर निवडून आले होते. मात्र, म्हैसूर वगळता या  ठिकाणी निजदला दणका बसला आहे. तर हासनमध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि आमदार एच. डी. रेवण्णा यांचे पुत्र सुरज रेवण्णा निवडून आले आहेत.

विधानपरिषदेतील बलाबल…

(एकूण सदस्यसंख्या 75, बहुमतासाठी 38)

भाजप             37

काँग्रेस             26

निजद             10

अपक्ष 1

सभापती 1 (निजद)

भाजपला मिळालेल्या जागा व उमेदवार

बेंगळूर शहर – गोपीनाथ रेड्डी

मडिकेरी – सुजा कुशालप्पा

शिमोगा – डी. एस. अरुण

चित्रदुर्ग – के. एस. नवीन

बळ्ळारी – वाय. एम. सतीश

कारवार – गणपती उळवेकर

चिक्कमंगळूर – एम. के. प्राणेश

उडुपी-मंगळूर – कोटा श्रीनिवास पुजारी

गुलबर्गा-यादगीर – बी. जी. पाटील

हुबळी-धारवाड – प्रदीप शेट्टर

विजापूर-बागलकोट – पी. एच. पुजार

काँग्रेसला मिळालेल्या जागा व उमेदवार

बिदर – भीमराव पाटील

तुमकूर – राजेंद्र

कोलार – एम. एल. अनिलकुमार

विजापूर-बागलकोट – सुनीलगौडा पाटील

हुबळी-धारवाड – सलीम अहमद

रायचूर-कोप्पळ – शरणगौडा पाटील बय्यापूर

मंडय़ा – दिनेश गुळीगौडा

म्हैसूर-चामराजनगर – डी. तिम्मय्या

उडुपी-मंगळूर – मंजुनाथ भंडारी

बेळगाव-चिकोडी – चन्नराज हट्टीहोळी

बेंगळूर ग्रामीण – एस. रवी

निजदला मिळालेल्या जागा व उमेदवार

हासन – सुरज रेवण्णा

म्हैसूर-चामराजनगर – मंजेगौडा

विजयी अपक्ष उमेदवार

बेळगाव-चिकोडी – लखन जारकीहोळी

Related Stories

शेअर बाजाराची आठवडय़ाची सुरूवात घसरणीने

Patil_p

सॅनिटायझरच्या बाटलीवर लग्नपत्रिका

Patil_p

जागतिक पुस्तक दिनाच्या विशेष तारखेविषयी जाणून घ्या

Patil_p

नोकरी जाणार? वानखेडेंचे सूचक ट्विट

datta jadhav

अमित शहांनी गोमंतकियांची माफी मागावी : काँग्रेस

Abhijeet Khandekar

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav