मुंबई \ ऑनलाईन टीम
विधानसभा अध्यक्षाची निवड विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच होईल, अशी माहिती महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसंच, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असं देखील थोरात म्हणाले. नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची जागा रिकामीच होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे.
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला होणार आहे. नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नसल्याचे देखील त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं. म्हणाले,शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना पक्षात बंद करण्याची गरज नाही. ते महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांना भेटणे गैर काही नाही, असं थोरात म्हणाले. तर महामंडळाचे वाटप लवकरच होईल. सर्व कार्यकर्त्यांना त्यातून संधी मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

