

प्रतिनिधी /बेळगाव
माजी मंत्री आर. एल. जालाप्पा यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी कामकाजाला सुरुवात होताच सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी दुखवटय़ाचा ठराव मांडला. त्यानंतर जालाप्पा यांचे गुणगान करण्यात आले.
देवराज अर्स यांच्यानंतर मागासांचे नेतृत्व जालाप्पा यांनी केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळा ठसा उमटविणारे होते. सहकार, राजकारण, शेतीसह वेगवेगळय़ा क्षेत्रात त्यांचा हातखंडा होता. सहकारमंत्री असताना त्यांनी सहकारी कायद्यात अनेक बदल केले आहेत. गृहमंत्री असताना त्यांना फौजदारी खटल्याला सामोरे जावे लागले. या संकटातूनही ते तावूनसुलाखून निघाले. दोनवेळा कोरोना होऊनही त्यातून ते बाहेर पडले होते, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आर. एल. जालाप्पा यांच्याशी असलेल्या मैत्रीला उजाळा दिला. जालाप्पा हे प्रदीर्घ काळ सार्वजनिक जीवनात होते. ते 97 वर्षांचे दीर्घायुष्य जगले. तुम्ही शतायुषी होणार, असे मी त्यांना म्हणायचो. म्हातारपणाच्या वेदना खूप असतात. आपल्याला शतायुषी व्हायचे नाही, असे ते म्हणत होते. शेवटी तसेच झाले. त्यांचे राजकीय जीवन खुले किताब होते. ते दीनदुबळय़ांचे कैवारी होते, असे त्यांनी म्हटले.
कायदा व संसदीय व्यवहारमंत्री माधुस्वामी यांनी जालाप्पा यांचा राजकीय जीवनपट उलगडून दाखविला. रशिद खून खटला घडला, त्यावेळी जालाप्पा गृहमंत्री होते. मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांनी तातडीने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची घोषणा केली. त्याचा मोठा धक्का जालाप्पा यांना बसला. त्यांनी विनाविलंब राजीनामा दिला. ते नि÷tर मात्र, तितकेच कनवाळू होते. दीनदलित व गोरगरिबांच्या हिताचा विचार करायचे. यावेळी डॉ. जी. परमेश्वर, कुमार बंगारप्पा, जी. टी. देवेगौडा, वेंकटरमणाप्पा, शिवलिंगेगौडा आदींनीही श्रद्धांजली वाहिली. एक मिनीट मौन पाळून जालाप्पा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विधानपरिषदमध्येही श्रद्धांजली
चारवेळा खासदार आणि चारवेळा आमदार झालेले आर. जालाप्पा यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती बसवराज होरट्टी यांनी काम सुरू करण्यापूर्वीच श्रद्धांजलीच्या ठरावाचे वाचन केले. त्याला सभागृहाचे मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी अनुमोदन दिले. याचबरोबर सर्वांनी अनुमोदन देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी आर. जालाप्पा हे शिक्षणप्रेमी आणि प्रामाणिक राजकारणी होते. ते चारवेळा लोकसभेवर निवडून आले तर चारवेळा आमदार झाले. सहकार क्षेत्रामध्येही त्यांनी मोठे कार्य केले आहे. याचबरोबर सामाजिक कार्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात श्रद्धांजली वाहण्यात आली.