Tarun Bharat

“विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक जिथल्या तिथे हिशोब करतात”

सामनातून शिवसेनेची डरकाळी
मुंबई/प्रतिनिधी

शिवसेना आज ५५ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीवर आणि देशातील सध्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. तसंच अग्रलेखात शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्याचा उल्लेख टाळत शिवसेनेनं भाजपला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं कौतुक करत भाजप आणि केंद्रातील सरकारवर निशाणाही साधला आहे.

दरम्यान, “महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत. शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील!,” असा विश्वास अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त सामना अग्रलेखातून पक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीवर आणि देशातील सध्या राजकीय व सामाजिक स्थितीवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. “शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन म्हणजे उत्साह, बुलंद गर्जना आणि प्रचंड गर्दी असा एकंदरीत थाटमाट असतो. पण ‘कोरोना’ महामारीने या सगळ्यांवर सलग दुसऱ्या वर्षीही पाणी ओतले आहे. संपूर्ण देशाचीच स्थिती कोरोनामुळे गंभीर, तितकीच नाजुक बनली आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आज फक्त निराशा किंवा वैफल्यच दिसत आहे. उद्योग क्षेत्राला फटका बसल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार गमावला आहे. नोकऱ्याच गेल्याने त्याचा परिणाम शेवटी कष्टकऱ्यांच्या ‘चुली’वर झाला. लोकांच्या चुली विझताना दिसत आहेत. शिवसेनेने स्थापनेपासून लोकांच्या चुली पेटविण्याचा महायज्ञच आरंभला होता. शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत हक्काची रोजीरोटी मिळावी, त्याला सन्मानाने जगता यावे यासाठीच झाली,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

गेल्या दीड वर्षात अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. हा चिंतेचा आणि संकटाचा विषय बनला आहे. देशाचा व राज्यांचा खजिना फक्त कोरोनाशी लढण्यातच खर्ची पडला आहे. महाराष्ट्राने अनेक संकटे छाताडावर घेतली. अनेक लढाया पचवल्या. राजकीय, सामाजिक लढ्यांत असंख्य बलिदानेही दिली, पण कोरोनाची पहिली लाट, मग दुसरी लाट, आता म्हणे तिसरी लाटही दारावर धडका देत आहे.

सगळ्या संकटांवर आणि मृत्यूच्या तांडवावर महाराष्ट्राने जितक्या लवकर नियंत्रण मिळवले तेवढे ना केंद्राला जमले, ना इतर राज्यांना करता आले. गंगेत तरंगणारी प्रेते, गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा, सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले. देशाची प्रचंड मानहानी झाली. पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला. तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच. दरम्यान शिवसेनेने सामनातून यासह अन्य मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.

Related Stories

व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या अथवा दहा हजाराची तातडीची मदत करा

Archana Banage

पुणे विभागातील 4.94 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक

datta jadhav

एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

Archana Banage

शासनाकडून ‘एचआरसीटी चेस्ट’ तपासणी दर निश्चित

Archana Banage

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; 30,535 नवे रुग्ण; 99 मृत्यू

Tousif Mujawar