Tarun Bharat

विमानकोंडीमुळे रत्नागिरीचा अथर्व अडकला सिंगापूरात…!

परराष्ट्रमंत्र्यांना साकडे, प्रतिसादाची अपेक्षा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोरोनाविरुद्धच्या लढय़ाचा एक भाग म्हणून विमानोड्डाणावरही प्रतिबंध आहेत. याचा फटका परदेशात शिक्षणासाठी, पर्यटनासाठी किंवा व्यवसयानिमित्त गेलेल्या अनेक भारतीयांना बसत आहे. सध्या भारतातील सुमारे 150 विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले असून त्यामध्ये रत्नागिरीच्या अथर्व मयेकर या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा समावेश आहे.

  रत्नागिरीचा अथर्व अजय मयेकर हा फिलीपिन्समधील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. कोरोनामुळे येथील महाविद्यालय तब्बल एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फिलीपन्सिमध्ये कोरोनाचा प्रसारही वेगाने होत असल्याने तो भारतात परतत होता. अथर्वप्रमाणेच सुमारे 150 भारतीय विद्यार्थीही फिलीपिन्स व मलेशियातून मायदेशी परतत असताना विमानांची उड्डाणेच रद्द झाल्याने ते सर्वजण मध्येच अडकले आहेत.

  अथर्वने फिलीपिन्समधून प्रवास सुरु केला तेव्हा विमानोड्डाणे सुरळीत सुरु होती. मात्र प्रवासात असतानाच कोरोना प्रतिबंध रोखण्यासाठी विमान वाहतुकीबाबतचे काही कठोर निर्णय घेतले गेले. यामुळे अथर्वला सहप्रवाशांसोबत मलेशियामध्ये उतरण्यात आले. तेथून त्यांचा मार्ग बदलून त्यांना सिंगापूरमार्गे एअर इंडियाद्वारे भारतात पोचण्याचा पर्याय देण्यात आला. यानुसार ते सिंगापूरला आले. मात्र सिंगापूर ते भारत दरम्यान कोणतीही हवाई वाहतूक सध्या सुरु नसल्याने हे विद्यार्थी विमानतळावरच अडकले आहेत. अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना ट्वीट करुन आपली समस्या कथन केली आहे.

    रत्नागिरीत राहणाऱया मयेकर कुटुंबाचा अथर्व हा मुलगा वैद्यकीय †िशक्षणासाठी फिलीपिन्समध्ये राहतो. याबाबत अथर्वची आई मनीषा यांच्याशी सपर्क केला असता त्यांनी सांगितले कि अथर्वची पहिल्या वर्षाची वार्षिक परीक्षा सुरु होती. एक पेपर शिल्लक असतानाच कोरोना प्रतिबंधाचा भाग म्हणून कॉलेज बंदची घोषणा झाली. तेथील कोरोनाचा फैलाव व सुटी  यामुळे  मूले मायदेशी परतू लागली. त्यांचा पहिला गट आठ दिवसापूर्वी भारतात आला. अथर्व बरोबर आणखी काही मुले दुसऱया गटात होती. ती मुले भारताच्या दिशेने जाणारी विमाने रद्द करण्यात आल्याने सिंगापूरमध्ये अडकली आहेत. सुमारे 150 मुले या गटात आहेत. 16 मार्चला रात्री त्यांनी प्रवास सुरु केला होता. मलेशिया येथे या मुलांना सिंगापूर येथील चंगी विमानतळाकडे जाण्यास सांगण्यात आले. तेथे मुले पोहचली मात्र तेथुनही भारताकडे येणारी विमाने उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

   विद्यार्थ्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना ट्विट करुन या अडचणीची कल्पना दिली. त्यांच्याकडून तातडीने प्रतिसाद मिळेल अशी मुलांसह पालकांना अपेक्षा आहे. त्यांनी तेथील परिस्थितीचे व्हिडीओही सोशल मिडियावर शेअर केले आहेत, असे मनीषा यांनी सांगितले. अथर्वचे वडील डॉ. अजय हे येथे ख्यातनाम वैद्यकीय व्यवसायिक आहेत. अथर्वचे शालेय शिक्षण रत्नागिरीतील जी.जी.पी.एस व त्यानंतर गोगटे कॉलेजला झाले. त्यानंतर पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी फिलीपिन्सला गेला. अथर्व सुरक्षितपणे लवकर भारतात परतावा अशी अपेक्षा हितचिंतक व मित्रमंडळी करत आहेत.

Related Stories

जिल्हय़ात कोरोनानंतर आता स्वाईन फ्लू

tarunbharat

आणखी 58 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

NIKHIL_N

सावंतवाडी शहरामध्ये प्लॅस्टिक कचरा निर्मूलन मोहीम

Anuja Kudatarkar

मान्सूनसरींची आनंदवार्ता ! १० दिवस आधीच मान्सून धडकणार

Rahul Gadkar

जिल्हा बँकेस ‘बँको ब्ल्यू रिबन 2020’ पुरस्कार

NIKHIL_N

खेडच्या भोसले यांच्या वाझे कनेक्शनने जिल्ह्यात खळबळ

Patil_p