Tarun Bharat

विमानतळाला बॅ. नाथ पैंचे नाव देण्याचा प्रस्ताव देणार!

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती : उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर चिपीत केली पाहणी

प्रतिनिधी / परुळे:

चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या नऊ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व हवाईमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱया उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी चिपी विमानतळाची पाहणी केली.

लोकांना काय सुविधा द्याव्या लागतील, याची माहिती घेत तशा सूचना त्यांनी अधिकाऱयांना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक यांच्यासह जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या.

या विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देणार, असे एका प्रश्नाला उत्तर देताना सामंत यांनी सांगितले. विमानतळाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नऊ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होत असल्याने याठिकाणी नवीन आणखी काय-काय करावे लागेल, लोकांना काय सुविधा द्याव्या लागणार, याचा आढावा घेण्यासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी प्रयत्न

चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा, यासाठी आपले प्रयत्न आहेत. इंटरनॅशनल एअर फ्लाईट येथून जावे, यासाठी प्रथम डोमॅस्टिक विमानतळ सुरू होणे आवश्यक आहे. नऊ तारिखला विमानतळाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जगाच्या नकाशावर सिंधुदुर्ग टुरिझमचे नाव येईल

सिंधुदुर्गवासियांचे गेल्या कित्येक वर्षांचे विमान सेवेचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होत आहे. यामुळे जगाच्या नकाशावर सिंधुदुर्गचे नाव येईल. साहजिकच जगाच्या नकाशावर सिंधुदुर्ग टुरिझमचे नाव येईल. साहजिकच पुढील काळात काही प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, असे सामंत म्हणाले. विमानतळाच्या कामाचा स्वत: खासदार राऊत यांनी पाठपुरावा केला. तसेच अपूर्ण कामांसाठी ते पाठपुरावा करीत आहेत, असे ते म्हणाले.

अधिकाऱयांना सूचना

उद्घाटनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱयांना सामंत यांनी सूचना दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनाही सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या.

विमान उड्डाणासाठी विमानतळ सज्ज

विमान उड्डाणासाठी विमानतळ सज्ज झाला असून पूर्ण तयारी आय. आर. बी. ने केलेली आहे, असे सामंत यांनी सांगून दूरध्वनी, वीज, पाणी या समस्या दूर झाल्या आहेत. यापूर्वी धावपट्टीबाबत तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर झाल्या आहेत. खासदार राऊत यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला, हे कोणी विसरू शकत नाही, असे ते म्हणाले.

आम्हाला कुणाबद्दल ऍलर्जी नाही!

विमानतळाच्या उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित राहवे. आम्हाला कोणाबद्दल ऍलर्जी नाही आणि इतरांनाही कोणाबद्दल ऍलर्जी असू नये, असे सामंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. कोण काय म्हणते, याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला श्रेयवादात पडायचे नाही, असे सांगत विमानसेवेचे शेडय़ुल लवकरच जाहीर होईल, असे ते म्हणाले.

Related Stories

जिल्हय़ात विलगीकरणात 236 व्यक्ती

NIKHIL_N

कोनशी – दाभिल उपसरपंच पदी अर्जुन उर्फ नाना सावंत

Anuja Kudatarkar

तांबोळीचे स्वरधारा भजन मंडळ प्रथम

Anuja Kudatarkar

दाभोलीचे शिक्षक प्रशांत चिपकर जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात कोरोना बळींची संख्या 9

Patil_p

कणकवलीतील मल्हार पुलासाठी 6 कोटी मंजूर

NIKHIL_N
error: Content is protected !!