Tarun Bharat

विमानसेवेसाठी ऑनलाईन बूकिंग सुरू

Advertisements

1 ऑक्टोबरपासून विमानतळ काऊंटवर बूकिंग : सिंधुदुर्ग स्टेशन मॅनेजर समीर कुलकर्णी यांची माहिती

अलायन्स एअरचे 70 आसनी विमान सेवेत : मुंबईहून 11.35 वा. मार्गस्थ,

1 वा. चिपी येथे पोहोचणार : 1.25 वा. चिपीतून मार्गस्थ,

2.50 वा. मुंबईला पोहोचणार : उद्घाटनादिवशीचे प्रवासी भाडे येते 2,520, जाते 2,621 रु.

प्रतिनिधी / कुडाळ:

चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून नऊ ऑक्टोबरपासून रोज विमान प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. रोज मुंबई-सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग-मुंबई असे एक अलायन्स एअर म्हणजे एअर इंडियाचे 70 आसनी विमान सेवेत असेल, अशी माहिती अलायन्स एअरचे सिंधुदुर्ग स्टेशन मॅनेजर समीर कुलकर्णी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवारपासून www.airindia.in या एअर इंडियाच्या वेबसाईटवर बूकिंग सुरू झाले आहे, तर एक ऑक्टोबरपासून चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर काऊंटर बूकिंग सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग-मुंबई या मार्गावर सुरुवातीला एअर इंडिया सेवा चालविणार असून केंद्र शासनाने या विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश केला आहे.

           रोज एक विमान

कुलकर्णी म्हणाले, अलायन्स एअर या विमान कंपनीने सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू करण्याची जबाबदारी घेतली असून सध्या रोज मुंबई ते सिंधुदुर्ग व परत मुंबई असे विमान असेल. मुंबई ते सिंधुदुर्ग या फ्लाईटचा नंबर 9I-661 असून सकाळी 11.35 वाजता मुंबई येथून निघून दुपारी 1 वाजता सिंधुदुर्ग-चिपी येथे पोहोचेल, तर परत प्रवासाच्या सिंधुदुर्ग-मुंबई फ्लाईटचा नंबर 9I-662 असून ते दुपारी 1.25 वाजता चिपी येथून निघून दुपारी 2.50 वाजता मुंबईत पोहोचेल. हे फ्लाईट सत्तर आसनी असून 2ƒ2 ची आसने असतील.

            उद्घाटना दिवशीचे प्रवासी भाडे

उद्घाटनादिवशी म्हणजे नऊ ऑक्टोबर रोजी मुंबई-सिंधुदुर्ग या फ्लाईटचे तिकीट 2,520 रु. असेल, तर सिंधुदुर्ग-मुंबईसाठी तिकीट 2,621 रु. असेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. इतर दिवसांचे तिकीट कमी-जास्त होऊ शकते, असे स्पष्ट करतानाच कायम याच तिकीट दरात मुंबई-सिंधुदुर्ग व परतीचा प्रवास करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

             सिंधुदुर्गात येण्याचा वेळ वाचणार

सध्या महामार्गावरून मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यासाठी साधारणपणे साडेनऊ तास लागतात. मात्र, विमान सेवेमुळे सिंधुदुर्गात येण्यास 1 तास 25 मिनिटे एवढाच वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रवासातील खूप वेळ वाचणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग विमानतळ हा मालवण व वेंगुर्ले या दोन बंदरांच्यामध्ये किनारपट्टी भागात असून भविष्यात पर्यटकांना किनारे, मंदिरे तसेच किल्ल्यांना भेटी देण्यासाठी तो जवळचा ठरणार आहे. तसेच नॉर्थ गोवा भागातील लोकांनाही सिंधुदुर्ग विमानतळ जवळचा ठरणार आहे. चिपीतून वेंगुर्ले तसेच मुंबई-गोवा महामार्गाने नॉर्थ गोवा जवळ असल्याचे ते म्हणाले.

               दिल्ली, बेंगलोरशी कनेक्टिंग सेवा

सिंधुदुर्ग-मुंबई या विमानाने मुंबईला गेल्यावर तिथून दिल्ली, बेंगलोर, कोलकात्ता, हैद्राबाद, चेन्नई येथे विमानाने जाण्यासाठी कनेक्टिंग विमानसेवा आहे. त्यामुळे ही विमानसेवा सोयीची ठरणार आहे. अन्य भागात जाणाऱया प्रवाशांना हे फायद्याचे ठरणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

             गुरुवारपासून ऑनलाईन बूकिंग सेवा

गुरुवारपासून एअर इंडियाच्या www.airindia.in या वेबसाईटवरून विमानाच्या तिकिटांचे बूकिंग सुरू करण्यात येईल. सिंधुदुर्ग विमानतळ गुरुवारी सायंकाळपर्यंत देशाच्या एअरपोर्ट मॅपवर येईल. बूकिंगसाठी सिंधुदुर्गचा कोड  SDW असा असेल. सिंधुदुर्ग कोड टाकला, तरीही बूकिंग होईल, असे ते म्हणाले.

         एक ऑक्टोबरपासून विमानतळावर काऊंटर बूकिंग

सिंधुदुर्गसह कोकणातील जे कर्मचारी अलायन्स एअरमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे काम करतात, त्यातील काही कर्मचाऱयांची बदली सिंधुदुर्ग एअरपोर्टवर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. कर्मचारी बदलीवर आल्यावर साधारणपणे 1 ऑक्टोबरपासून चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर अलायन्स एअरचा तिकीट बूकिंग काऊंटर सुरू करण्यात येईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

                चार्टर्ड फ्लाईट बूकिंगची सुविधा

एखादी संस्था, व्यक्तींना सत्तर आसनी चार्टर्ड फ्लाईट बूकिंग करून बाहेर जायचे असेल, तर तशी व्यवस्था सिंधुदुर्ग विमानतळावरून अलायन्स एअरच्यावतीने करण्यात येईल, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. सिक्युरिटीचे दिलीप देसाई व अभिषेक परमार उपस्थित होते.

                 तिकीट दराबाबत सिंधुदुर्गवासियांचा भ्रमनिरास?

मुंबई-सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्ग-मुंबई हा प्रवास रोज पहिल्या दिवसाच्या तिकीट दरांप्रमाणे कायम करता येणार नाही. ‘उडान’मध्ये हा विमानतळ असला, तरी रोज असा तिकीट दर नसणार. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार. त्यामुळे सर्वसामान्य सिंधुदुर्गवासीयांचा भ्रमनिरास होणार आहे.

Related Stories

मेघनाद धुरी मत्स्य पॅकेजच्या दुसऱया टप्प्यासाठी पाच कोटी मंजूर

NIKHIL_N

मेर्वीत पुन्हा एकदा बिबटय़ाचा वासरावर हल्ला

Patil_p

अनंत कळणेकर यांचे निधन

NIKHIL_N

मालवणात पुन्हा ट्रॉलर लुटण्याचा प्रकार

NIKHIL_N

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत निरवडे-बांद्यात करिष्मा

Ganeshprasad Gogate

विद्यार्थ्यांना अर्धवट शिजलेला भात, दर्जाहीन पोषण आहार वाटप

Patil_p
error: Content is protected !!